एका बाजूला कान्हेरीशी तर दुसरीकडे जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमधील नक्षीकामाशी थेट नातेपरंपरा सांगणारी मागाठाणे लेणी पुरातत्त्वीयदृष्टय़ा महत्त्वाची नाहीत, असा निष्कर्ष पुरातत्त्व संचालनालायने तब्बल तीन वर्षांपूर्वीच काढला असून सध्या लेण्यांची अवस्था दयनीय आहे. ही लेणी वाचविण्यासाठी कार्यरत सर्वानीच या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची भेट घेतली. मात्र, दलितांची मते हवीत पण बुद्धठेव्याची जपणूक नको, असाच अनुभव त्यांच्याही बाबतीत आल्याने कार्यकर्ते निराश झाले आहेत. या संदर्भातील सविस्तर लेख ‘लोकप्रभा’ने या खेपेस ‘कव्हरस्टोरी’ म्हणून प्रकाशित केला आहे.
मागाठाणेच्या या बौद्ध लेण्यांचा सर्वात पहिला उल्लेख इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात निर्मिती झालेल्या कान्हेरीच्या लेणी क्रमांक २१ मध्ये आढळतो. याशिवाय ५०च्या दशकात एम. एन. दीक्षित यांनी केलेल्या शोधप्रबंधामध्येही या लेण्यांचे अजिंठा परंपरेशी असलेले नाते उकलण्यात आले आहे. तर जगप्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ वॉल्टर स्टिंक यांनी ७०च्या दशकात लिहिलेल्या व त्या वेळेस गाजलेल्या ‘अिजठा ते वेरुळ’ शोधप्रबंधामध्येही लेण्यांवर सविस्तर मांडणी केली आहे. असे असतानाही पुरातत्त्व खात्याने ही लेणी पुरातत्त्वदृष्टय़ा महत्त्वाची नाहीत, असे अहवालात म्हटले आहे. आता ही लेणी गगनचुंबी इमारतींच्या गर्दीत हरवत चालली आहेत. त्यांची अवस्था दयनीय असली तरी त्यामध्ये अजिंठय़ाशी परंपरा सांगणारी असलेली तोरणे ही आजही खूप महत्त्वाची आहेत. सध्याच्या अवस्थेतही त्याचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकते, असे राज्याचे माजी पुरातत्त्वसंचालक आणि विख्यात पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांनी सांगितले. तर पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. सूरज पंडित म्हणाले की, पश्चिम भारतात अजिंठय़ाशी नातेपरंपरा सांगणारी लेणी मोजकीच आहेत. त्यामुळे अवस्था दयनीय असली तरीही या लेण्यांचे महत्त्व कमी होत नाही. किंबहुना त्यामुळे ही लेणी तातडीने संरक्षित स्मारक म्हणून जाहीर व्हायला हवीत, अन्यथा एक खूप मोठा बुद्धठेवा आपण गमावू.
सविस्तर लेख वाचा ‘लोकप्रभा’मध्ये
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा