पराग तांडेल हा ठाण्यात कळवा खाडीनजीकच्या विटावा या मच्छीमारबहुल गावात वाढलेला तरुण शिल्पकार. मुंबईप्रमाणेच बडोद्यातही शिल्पकलेचं शिक्षण घेतल्यावर गेली दहाएक र्वष तो कलाकृती प्रदर्शित करतो आहे. त्याच्या कलाकृतींमध्ये खाडीतले कमी होत जाणारे मासे, प्लास्टिकचा (किंवा रबरी चपला वगैरेंचा) कचरा, असे विषय आलेले आहेत. पर्यावरणाकडे कार्यकर्त्यांसारखं न पाहता, माणूस आणि कलावंत म्हणून पाहण्याची दृष्टी पराग तांडेलकडे आहे. बदलता समाज आणि संवेदनशील माणसाचं मन यांचा संबंध कसा असतो, सामाजिक बदलांचा माणसावर कसा परिणाम होतो, याचाही वेध परागनं वेळोवेळी अगदी स्वत:तून घेऊन शिल्पांमधून किंवा रेखाचित्रांमधून मांडलेला आहे. पराग तांडेलच्या ताज्या कलाकृती पाहायला मिळणं, ही या अशा पाश्र्वभूमीमुळेच एक चांगली संधी आहे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस मुख्यालयाच्या पदपथावरून गेटवे ऑफ इंडियाकडे जाताना डावीकडे जी चिनी वळणाची ‘धनराज महल’ इमारत लागते.. तिच्या आतला रस्ता संपेपर्यंत चालल्यावर ‘तर्क’ या गॅलरीचं, ‘एफ-३५/३६’ या घर क्रमांकाचं दार लागतं. बेल वाजली तरच दार उघडणाऱ्या या गॅलरीत शिरल्यावर प्रथमच दिसेल ती ‘मायग्रंट्स’ नावाची कलाकृती. कासवांचं जलप्रदूषणामुळे होणारं विस्थापन, ‘ऑलिव्ह रिडले’सारख्या कासवांचं कोकणात प्रजननकाळापुरतं होणारं स्थलांतर, ‘फंग शुई’वगैरेच्या नादानं छोटय़ा कासवांची होणारी चोरटी आयातनिर्यात.. आणि त्याहीपेक्षा, पाठ वर करून- चारही तळवे समुद्रकाठच्या वाळूत कासवासारखेच रुतलेल्या अवस्थेतला निश्चेष्ट अश्राप बालक ‘आयलान कुर्दी’.. या साऱ्याचं प्रतीक असलेली ही कासवं इथं वर्तुळाकारात एकत्र आली आहेत.. जणू एकमेकांची सुखदु:खं अबोलपणे जाणून घेताहेत. या कलाकृतीनंतर बऱ्याच शिल्पकृती या चिंचोका, चिंच, शेंग, फळातलं बी किंवा बोंड यांसारख्या आकाराच्या आहेत. पण इथं महत्त्व आकारांपेक्षाही, त्या शिल्पांमधल्या अर्धपारदर्शकपणाला आणि त्याच्या आतल्या रंगांना आहे. पाण्यामध्ये विविध रासायनिक पदार्थ सोडले गेल्यामुळे पाण्याचा निरंगीपणा नष्टच होऊन भलभलत्या रंगांचं पाणी पाहायला मिळतं, याचा संदर्भ या सर्व शिल्पांना आहे. अर्थात, हे आकार अगदी तोलूनमापून घडवलेले आणि त्यांचा बाह्य पोत अगदी निगुतीनं घासला गेलेला असल्यामुळे ते शोभिवंतसुद्धा वाटतात. त्यातच, या दालनानं प्रत्येक शिल्पावर तीन दिव्यांचा प्रकाश पडेल, अशी व्यवस्था करून प्रत्येक आकाराच्या आत प्रकाशाची आणि खाली तिहेरी सावल्यांची बहार आणली आहे. काही आकार मात्र परागनं मुद्दाम खरखरीत ठेवले आहेत. पॉलिएस्टर रेझिन (ज्याला एक नेत्रा साठे नावाच्या चित्रकर्ती ‘कोल्ड सिरॅमिक्स’ म्हणायच्या) हे पारदर्शक शिल्पसाधन या शिल्पांसाठी वापरण्यात आलं आहे.

पराग तांडेलच्या या प्रदर्शनातलं आणखी एक- किंवा सर्वाधिक- वैशिष्टय़पूर्ण शिल्प म्हणजे भिंतीवर त्यानं लावलेले बोंबिल माशांच्या वाळवणासारखे आकार! अ‍ॅल्युमिनियम आणि तांब्याचं प्लेटिंग यांनी ही बोंबिलशिल्पं सिद्ध झाली आहेत. ज्यांना कोळीवाडय़ांमध्ये बोंबिल कसे उभे-उभे वाळत घातलेले असतात हे माहीतच नाही, अशा उत्तर भारतीय अथवा परदेशी मंडळींना हे शिल्प चटकन कळत नाही.. ‘कॅलिग्राफिक आकार आहेत का हे?’ वगैरे प्रश्न असे लोक विचारतात! पण मराठीजनांना हे शिल्प झटकन लक्षात येईल. या बोंबिलशिल्पांमध्ये स्वतंत्र आशय नाही, ते स्मृतिरंजन करणारे आकार आहेत असा आक्षेप घेता येईलही;  पण या भिंतीवरल्या या एकमेव शिल्पामुळे अख्ख्या प्रदर्शनाला स्थळ-संदर्भ मिळाला आहे, हे नाकारता येणार नाही. प्रत्येक आकारातून दिसणारी परागची वास्तव-दृष्टी आणि सौंदर्यदृष्टी मुद्दामहून पाहण्यासाठी गॅलरीपर्यंत जावं, असं हे प्रदर्शन आहे.

दोन-तीन तास ‘फक्त माझे’..

कुलाब्यालाच, पण गेटवेपासून सुरू होणारा समुद्रतटाचा रस्ता जिथं संपतो, त्या ‘रेडिओ क्लब’च्या साधारण समोर असलेल्या ‘कमल मॅन्शन’ नावाच्या इमारतीत पहिला जिना चढल्याचढल्याच ‘चटर्जी अँड लाल’ या गॅलरीची तिरकी बेल आहे. मोठ्ठं लाकडी दार उघडल्यावर, या प्रदर्शनापुरता असा नियम आहे की हातातल्या बॅगा, छत्री हे सारं बाजूला ठेवून गॅलरीत मिळणारे हातमोजे चढवायचे! एकदा हातमोजे चढवलेत, की मग तुम्हाला इथल्या २६ छायाचित्रकार आणि बोधचित्रकारांच्या वह्या, त्यांनी फोटोंचीच बनवलेली पुस्तकं, त्यापैकी काहींनी लिखाणही केलेली छापील पुस्तकं.. एखाद्यानं खोक्यात ठेवलेले भरपूर फोटो.. असा सगळा ऐवज पाहता येईल. हा अख्खा अनुभव शांतपणानं घ्यावा, असा आहे. त्यासाठी किमान दीड तास हवा.. किंवा दोन-तीन तास इथं घालवण्याची तयारी असेल, तर फारच बरं!

तशी लहानच असलेल्या या गॅलरीच्या जागेचा छान उपयोग आणि त्याहीपेक्षा छान फर्निचर हे या प्रदर्शनाला स्थापत्य-नेपथ्याचं भान देणारे जास्तीचे गुण! या २६ निवडक चित्रकार-छायाचित्रकारांपैकी प्रत्येकाला टेबलावरली फारतर दीड फूट बाय दोन फुटांची जागा देण्यात आली आहे. टेबलावर पुस्तकं, खोके असं काही काही ठेवलं आहे. ते उलगडूनच आत पाहायचं, म्हणून हातमोज्यांची सक्ती. आत शिरताच उजवीकडे प्रवासातल्या अनुभवांची दैनंदिन चित्रं काढणारे प्रशांत मिरांडा, रोजच्या जगण्यातलं वैचित्र्य शोधणारा नित्यन उन्नीकृष्णन अशा चित्रकारांची रेखाचित्रं आहेत. त्यांच्या आणि पुढे विवेकानंद रॉय घटक, प्रिया कुरियन आदी बोधचित्रकारांच्याही भरपूर वह्या इथं पाहायला मिळतील. छायाचित्रकर्ती दयानिता सिंग यांनी ‘फोटोबुक’ बनवणं पाचसहा वर्षांपूर्वीच सुरू केलं, ती घडीघडीतून उघडणारी पुस्तकं इथं काचेच्या शोकेसवजा खोक्यांत भिंतीवर आहेत. एका छायाचित्रकाराचं छापील पुस्तक वहीसारखंच दिसतं.. ती वही आहे एका अनाथालयातल्या एका मुलीची! छायाचित्रकाराला ही निनावी वही सापडल्यावर त्यानं त्या वहीतल्या देखाव्यांच्या चित्रांसारखीच छायाचित्रं टिपली आणि पुस्तक काढलं. यामागची असोशी, अनोळखी मुलीवर छायाचित्रकारानं केलेली माया प्रेक्षकाला भिडेल.

असे भरपूर खासगी क्षण इथं अनुभवायला मिळतील.. सर्वच दृश्यकलावंतांनी घेतलेली मेहनत, परिश्रम, शोध हे सारं तुमच्यापुढे खुलं होईल. त्यामुळे ‘दोन-तीन तास फक्त माझे’ म्हणत वेळ काढून खास जावं, असं हे प्रदर्शन आहे. विद्यार्थ्यांनी तर, अजिबात कोणतंही कारण न सांगता शैक्षणिक अनुभवासाठी ते पाहिलं पाहिजे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Architectural art on water pollution