मुंबई : हृदय शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी जे. जे. रुग्णालयात अद्ययावत हृदय शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यात येत आहे. ५६ खाटांच्या या अद्ययावत सुविधा कक्षामध्ये स्वतंत्र अतिदक्षता विभाग आणि डॉक्टरांसाठी खोलीही असणार आहे. त्यामुळे रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे शक्य होणार आहे. या कक्षाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा कक्ष रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे. जे. रुग्णालयामध्ये हृदयासंदर्भात शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. या रुग्णांसाठी सध्या जे.जे. रुग्णालयामध्ये ४२ खाटांचा साधारण कक्ष आहे. मात्र रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत साेयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी जे. जे. रुग्णालयामध्ये २१ क्रमांकाचा कक्ष अद्ययावत करण्यात येत आहे. या कक्षामध्ये स्वतंत्र अतिदक्षता विभाग, प्राणवायू, जीवन रक्षक प्रणालीची सुविधा, सुसज्ज खाटा, तसेच रुग्णांची सोय लक्षात घेऊन विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कक्षामधील रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवता यावी यासाठी डॉक्टरांकरीता स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे. या कक्षाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच तो रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच या कक्षाची पाहणी करून जे. जे. रुग्णालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ardiac surgery room of jj hospital will be upgraded mumbai print news amy