मुंबई: रस्त्याने जाताना मोटारगाडीचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या वादानंतर दोन भावांनी चालकाच्या घरात घुसून त्याचा खून केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत यामध्ये दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आदील खान (३५) असे यातील मृत तरुणाचे नाव असून तो गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरातील बैंगणवाडी येथे राहत होता. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आदिल त्याची कार घेऊन घरी जात होता. त्यावेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका दुचाकीला कारचा धक्का लागला. ती दुचाकी एका महिलेच्या अंगावर पडली. त्यात महिलेला किरकोळ दुखापत झाली होती. त्या कारणावरून दोघांमध्ये काही वेळ वाद झाला होता. महिलेने ही बाब तिच्या मुलांना सांगितल्यानंतर त्यांनीही आदिलशी वाद घातला. त्यानंतर रात्री महिलेच्या दोन्ही मुलांनी आदिलच्या घरी जाऊन त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्या हल्यात आदिल गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – किशोरवयीन मुला-मुलींसाठी ‘मैत्री क्लिनिक’ ठरतेय आधार! साडे सोळा लाख मुला-मुलींना मार्गदशन…

हेही वाचा – मुंबईत गृहनिर्मिती क्षेत्रात यंदा साडेतीन हजार कोटींची खासगी गुंतवणूक, ‘नाईट फ्रँक’च्या अहवालातील माहिती

शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत, आरोपींचा शोध सुरू केला. मात्र तोपर्यंत दोन्ही आरोपी फरार झाले होते. अखेर रविवारी पहाटे पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून अब्दुल शेख आणि शरीफ शेख या दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader