अभिनेता शाहरुख खानकडून मुलगा आर्यन खानला क्रुज ड्रग्ज प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी त्यानं एकाच वेळी दोन दिग्गज वकील नेमले आहेत. आर्यनच्या जामिनासाठी आज अॅड. सतीश मानेशिंदे यांच्यासह वरिष्ठ वकील अमित देसाई यांनीही कोर्टात हजेरी लावली. यावेळी आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरुन विशेष सरकारी वकील सेठनी आणि अॅड. अमित देसाई यांच्याच खडाजंगी झाल्याचं दिसलं.
नेमकं काय झालं?
आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरुन अॅड. अमित देसाई यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी आज (११ ऑक्टोबर) दुपारी किंवा मंगळवारी घेण्याची विनंती केली. मात्र, विशेष सरकारी वकील सेठना यांनी गुरुवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने बुधवारी सुनावणी ठेवली. यानंतरही सेठना यांनी गुरुवारचा आग्रह केला. नंतर देसाई यांनी त्यांना न्यायालयाचा थोडा आदर ठेवा, असं म्हणत टोला लगावला.
दरम्यान, आर्यन खानला क्रुज शिप ड्रग्ज प्रकरणी आजही (११ ऑक्टोबर) दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याच्या जामिनावरील सुनावणीसाठी पुढची तारीख दिलीय. यानुसार आता पुढील सुनावणी बुधवारी (१३ ऑक्टोबर) होणार आहे. सुनावणी दरम्यान आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी गर्दी होत असून त्यात कोरोनाशी संबंधित शारीरिक अंतराचं पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर न्यायालयाने केवळ ज्येष्ठ वकिलांनाच सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिलेत.
याआधी आर्यन खानच्या जामिनावर मेट्रोपॉलिटन कोर्टासमोर याचिका आली होती. तेव्हा न्यायालयाने जामिनावर सुनावणीचा अधिकार विशेष सत्र न्यायालयाला असल्याचं सांगत ही याचिका फेटाळली होती.
आर्यन खानसह ७ जणांना सध्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई सत्र न्यायालयाने याआधी आर्यन खानसह इतर ७ आरोपींना एनसीबी कोठडी देण्याची मागणी फेटाळत त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. याविरोधातच सध्या आर्यन खानकडून विशेष सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.
नेमकं प्रकरण काय?
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने १४ जणांना ताब्यात घेतलं. यानंतर एनसीबी कार्यालयात आणून सर्वांची चौकशी केली. त्यानंतर यातील ८ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहे. यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता.
हेही वाचा : राजकीय हस्ताक्षेपाच्या आरोपांनंतर NCB अधिकारी आपले फोन मुंबई पोलिसांना देणार? समीर वानखेडे म्हणतात…
आर्यनसोबत इतर ७ जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. यावेळी एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आर्यन खानसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे.