लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभेच्या किती व कोणत्या जागा लढवायच्या, याविषयी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. या जागा निश्चित करून व सर्वेक्षणाच्या आधारावर भाजपकडून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याशी जागावाटपाची चर्चा सुरू केली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपने विधानसभेसाठी तयारी सुरू केली असून सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल आला आहे. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत लढविलेल्या जागा, निवडून आलेले आमदार, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते, संभाव्य दोन-चार प्रभावी उमेदवार आदी मुद्द्यांवर मतदारसंघनिहाय वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. ही चर्चा पूर्ण झाल्यावर भाजपने किती व कोणत्या जागा लढवायच्या, याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठविला जाईल आणि त्यानंतर मित्रपक्षांशी जागावाटपाची चर्चा सुरू केली जाणार आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपने विधानसभा मतदारसंघनिहाय सर्वेक्षण केले आहे. त्यासह अन्य मुद्द्यांवर भाजप विधानसभेच्या कोणत्या जागा लढवायच्या आणि कोणत्या मित्रपक्षांना द्यायच्या, याचा निर्णय घेतला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्या चुका झाल्या व आता त्या कशा टाळायच्या, या दृष्टीने ज्येष्ठ नेत्यांनी विस्तृत ऊहापोह केला.

हेही वाचा >>>भारत-बांगलादेश सागरी सहकार्य; आर्थिक, समुद्री व्यवसाय क्षेत्राशी संबंध वाढवण्याचे प्रयत्न

‘वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचे निर्देश’ विधानसभेसाठी एका नेत्याच्या मर्जीने निर्णय न घेता वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत नुकतेच दिले होते. त्यानुसार भाजपने लढवायाच्या जागांबाबतच्या चर्चेत तावडे, गोयल व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पंकजा मुंडे आदी नेते बैठकीत सहभागी झाले होते.

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांविषयीही चर्चा

या बैठकीत विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांविषयीही चर्चा झाली. भाजप पाच आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन जागा लढवेल, असे ठरविण्यात आले आहे. उमेदवारीसाठी काही नावे निश्चित करून केंद्रीय संसदीय मंडळाच्या मंजुरीनंतर उमेदवारांची घोषणा होणार आहे.