प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत आहे. त्याला वाचवण्यासाठी न्यायालयात अॅड. मानेशिंदे युक्तीवाद करत आहेत. एक दिवसीय एनसीबी कोठडीनंतर आज (४ ऑक्टोबर) पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मानेशिंदे यांनी रिया चक्रवर्ती प्रकरणाच्या निकालापासून सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निवाड्यांचा आधार घेत युक्तीवाद केला आणि आर्यन खानच्या जामिनाची मागणी केली. मानेशिंदे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण युक्तीवादाच्या जोरावरच अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे खटले लढले आणि त्यांना दिलासाही दिलाय. त्यामुळे या प्रकरणात ते काय युक्तीवाद करतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. चला तर पाहुया आर्यन खानच्या प्रकरणात मानेशिंदे यांनी नेमका काय युक्तीवाद केलाय.
“व्हॉट्सअप चॅट आरोप सिद्ध करण्यासाठी वापरता येत नाहीत”
अॅड. मानेशिंदे न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडताना म्हणाले, “रिया चक्रवर्ती प्रकरणात न्यायालय जामिनाचा निर्णय घेऊ शकतं आणि कोठडीला नकार देऊ शकतं. काहीही जप्त करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कोठडी द्यायला कोणताही आधार नाही. याआधीच्या न्यायालयाच्या निकालानुसार एका आरोपीकडे अमली पदार्थ सापडले म्हणून त्याच्यासोबतच्या दुसऱ्या आरोपीला दोषी ठरवता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व्हॉट्सअप चॅट आरोप सिद्ध करण्यासाठी वापरता येत नाहीत.”
“न्यायालयाला अजामीनपात्र गुन्ह्यात जामीन देण्याचा अधिकार”
मानेशिंदे यांनी आर्यन खानचा बचाव करताना रिया चक्रवर्तीला जामीन देताना न्यायालयाने दिलेला निकालही वाचून दाखवला. तसेच एनडीपीएस कायद्यानुसार जामीन आणि अजामीन काय यावर युक्तीवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने अजामीनपात्र गुन्ह्यासाठी जामीन दिल्याचंही त्यांनी न्यायालयात सांगितलं. याप्रमाणे या न्यायालयाला देखील अजामीनपात्र गुन्ह्यात जामीन देण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
“48 तासात आर्यन खानविरोधात काहीही सापडलेलं नाही “
“आर्यन खान आणि अरबाज एकत्र सापडले असले तरी याचा अर्थ काहीच होऊ शकत नाही असं नाही. त्यांनी ड्रग्ज विकत घेतलं किंवा विक्री केल्याचा कोणताही पुरावा नाही. मागील 48 तासात आर्यन खानविरोधात काहीही सापडलेलं नाही. त्यामुळेच आणखी कोठडीची मागणी फेटाळावी. एनसीबीला जी चौकशी करायची होती ती करुन झालीय. आर्यन खानने त्यांना पूर्ण सहकार्य केलंय आणि ते देखील त्याच्याशी व्यवस्थित वागलेत. त्याने चांगलं वर्तन केलंय आणि व्हॉट्सअप चॅट डिलिट केलेली नाही. कोणत्याही आधाराशिवाय केवळ फोनवरील चॅटिंगला महत्त्व नाही. त्यामुळे कोठडीची गरज नाही,” असा युक्तीवाद मानेशिंदे यांनी केला.
एनसीबी अधिकाऱ्यानेच आर्यन खानसोबत फोटो काढल्याचा दावा, व्हायरल फोटोमागील सत्य काय?
“एनसीबीने आरोपीकडून १३ ग्रॅम ड्रग्ज जप्त केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे एनसीबीने इतर आरोपींकडून ड्रग्ज मिळालं नसल्याचं स्पष्ट करावं. आर्यन खान तिथं पाहुणा होता आणि त्यानं त्या जागेवर प्रवेश देखील केला नव्हता. मागील 48 तासात आर्यन खानचा त्या जहाजाशी संबंध जोडावा असं काहीही मिळालेलं नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.