पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ही चुलत भावंडे शासकीय बैठकीनिमित्त गुरुवारी समोरासमोर आली आणि उभयतांमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या कारभारावरून शाब्दिक चकमक उडाली.
बीडच्या स्थानिक राजकारणात उभयतांमधून विस्तवही जात नाही. चिक्की खरेदी आणि अन्य खरेदीवरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केले. या दोन चुलत भावंडांमधील वाद पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभागृहात चव्हाटय़ावर आला होता. महिला बचत गटांना देण्यात येणाऱ्या कामांवरून अलीकडे वाद निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची बैठक विधान भवनात पार पडली. तेव्हा पंकजा आणि धनंजय मुंडे या दोन चुलत भावंडांमध्ये बरीच वादावादी झाल्याचे समजते. महिला बचत गटांना कामे देताना फक्त काही ठरावीक संस्थांना कामे देण्यात येत असल्याबद्दल आपण बैठकीत आक्षेप घेतल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.