‘वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग’ (वाबा) आणि ‘जागतिक आरोग्य संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्तनपान हा मानवी जीवनाचा पाया आहे’ हे सप्ताहाचे घोषवाक्य आहे. बीपीएनआय महाराष्ट्र आणि युनिसेफच्या माध्यमातून दोन दशकांपूर्वीच स्थापन केलेल्या नवमातेसाठी ‘आधार’ गटाच्या वाटचालीवर या निमित्ताने प्रकाश..
बाळ रडतंय म्हणजे त्याचं आईच्या दुधाने पोट भरत नसेल असा सर्रास अर्थ लावून त्याला बाहेरचं दूध सुरू केलं जातं. परंतु बाळाचं पोट नीट भरत आहे का इथपासून ते मातेला पुरेसं दूध येत नाही, बाळाला स्तनाचे बोंड तोंडामध्ये नीट धरता येत नाही, स्तनाला चिरा पडल्या आहेत, बाळाला दूध पाजताना सारखे हातावर घेऊन मातेची कंबर दुखत आहे अशा असंख्य अडचणी नवमातांना येत असतात. विभक्त कुटुंब पद्धती किंवा कामानिमित्त अन्य शहरांमध्ये झालेले स्थलांतर यामुळे नवमातांच्या मदतीला आई किंवा अन्य अनुभवी व्यक्ती जवळ नसतात. मग ही आई डॉक्टरांकडून सल्ला घेते. बहुतांश वेळा डॉक्टरांना आईच्या अडचणी पूर्णपणे समजत नाहीत किंवा समजल्या तरी त्यांनी सुचविलेल्या पुस्तकी पर्यायांची मातांना फारशी मदत होत नाही. काहीवेळा पुरुष डॉक्टर असले की माता मोकळेपणाने बोलण्यासही लाजतात. अशा नवमातांना आधार देण्यासाठी मुंबईत गेल्या २३ वर्षांपासून अनुभवी मातांचा आधार गट (मदर सपोर्ट ग्रुप) काम करत आहे. प्रशिक्षित आणि अनुभवी मातांचा या गटात सहभाग असून त्या केवळ स्तनपानासाठी मार्गदर्शन करत नाहीत तर नवमाताची मैत्रीण बनून तिच्या मदतीला धावूनही जातात. पालिका रुग्णालयांपासून ते पंचतारांकित खासगी रुग्णालयांपर्यंत अशा सर्वच ठिकाणच्या इतक्या वर्षांच्या अनुभवांमधून या महिला आता स्तनपान आणि शिशूपोषण या विषयामध्ये डॉक्टरांपेक्षाही तज्ज्ञ ठरल्या आहेत.
नवमातेला आधार देणारा ‘ला लेशे’ मदर सपोर्ट गट अमेरिकेत १९५६ मध्येच स्थापित झाला होता. ही सोय इथल्या मातांसाठी उपलब्ध व्हावी या उद्देशातून ‘बीपीएनआय’ (ब्रेस्टफिडींग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया) (बीपीएनआय), महाराष्ट्र आणि ‘युनिसेफ’च्या मदतीने बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत गांगल आणि डॉ. संजय प्रभू यांनी पुढाकार घेतला. मातांना स्तनपान आणि शिशूपोषणासाठी डॉक्टर नव्हे तर मैत्रीण म्हणून मार्गदर्शन करणारी फळी बांधायला त्यांनी सुरुवात केली. मुंबईतील अनुभवी मातांना सोबत घेऊन हा आगळावेगळा प्रयोग त्यांनी १९९५ मध्ये सुरू केला. महिलांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात प्रदीर्घ प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना ‘मदर सपोर्ट गटनेता’ म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले. ‘इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाइड लॅक्टेशन कन्सल्टंट’ (आयबीसीएलसी) ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षाही उत्तीर्ण होऊन यातील काही महिला ‘लॅक्टेशन कन्सल्टंट’ म्हणून रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत.
दरम्यानच्या काळात राज्य सरकारने हा कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याने युनिसेफ आणि बीपीएनआयच्या यांच्या मदतीने या महिलांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते अंगणवाडी सेविका अशा सर्वच स्तरांवर प्रशिक्षणाचे काम सहजपणे पार पाडले. पुढे त्यांना पंचतारांकित रुग्णालयात ‘लॅक्टेशन कन्सल्टंट’ म्हणून घेण्यासाठी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आणि या रुग्णालयांनीही त्यांना रुजू करून घेतले. आज सुमारे ५० महिलांचा गट लीलावती, ब्रीचकॅण्डी या पंचतारांकित रुग्णालयांपासून ते केईएम, शीव, नायर आणि खासगी नर्सिग होममध्ये नवमातांच्या मदतीसाठी काम करत आहे. गरज असल्यास घरी जाऊनही त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते.
जुळी मुले झालेल्या राधिकाचा मुलगा दूध पीत होता, पण मुलगी मात्र तोंडात स्तन धरायला तयारच होत नव्हती. तिने डॉक्टरांना देखील विचारले, परंतु त्यांनी सांगितलेल्या उपायांनी काहीच फरक पडला नाही. काळजीने जीव कासावीस झालेल्या राधिकाला आधार गटाबाबत समजले. तिने गटातील ईलाताईंना घरी बोलावले. ईलाताईंनी दोन्ही बाळे पाहिली. मुलीला कसे जवळ घ्यावे जेणेकरून ती स्तन तोंडात धरायला लागेल, हे शिकवले. काही दिवसांनंतर दोन्ही बाळे एकाच वेळी दोन स्तनांमधून गुटुगुटु प्यायला लागली. राधिकाच्या सतरा वर्षांच्या मुलाचे निधन झाले. त्यानंतर स्वत:चे मूल हवे म्हणून आयव्हीएफ पद्धतीने ही जुळी मुले तिला झाली. त्यामुळे या मुलांच्या बाबत ती खूपच संवेदनशील असल्याने तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून मलाच खूप समाधान वाटल्याचे आधार गटाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या ईला महिधर सांगतात, तेव्हा खरंच आईला अशी जवळची मैत्रीण मिळाल्यावर किती भरून येत असेल, याची प्रचीती येते. असे असंख्य अनुभव या महिलांना दररोज येत असतात. पालिका रुग्णालयांमध्ये गेल्यावर पहिल्या वेळेस सर्व तुम्ही सांगितले आहे, त्यामुळे आता या मुलाचं मी सर्व व्यवस्थितपणे पार पाडणार, असे माता सांगतात, तेव्हा आपल्या कामाची पोचपावती मिळाली असल्याचे आधार गटातील स्वाती भिडे-टेमकर मोठय़ा अभिमानाने सांगतात.
बाळाच्या आयुष्यात पहिल्या एक हजार दिवसांचा म्हणजेच दोन वर्षांपर्यंतचा कालावधी महत्त्वाचा असतो. त्यामुळे स्तनपानासोबतच बाळाच्या सुदृढ वाढीसाठी सहा महिन्यांनंतर बाळाला काय खायला द्यावे, त्याचे वजन, उंची यांच्या नोंदी कशा ठेवाव्यात, प्रत्येक टप्प्यामध्ये आहारामध्ये कोणते बदल करावेत याचे मार्गदर्शनही या महिलांकडून केले जाते. त्यामुळे ‘लॅक्टशन कन्सल्टंट’ म्हणून कार्यरत असल्या तरी रुग्णालयातील नुकत्याच प्रसूती झालेल्या महिला, नवजात बालके, रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील बालके इथपासून ते लसीकरण, पाच वर्षांपर्यंतची बालकाची वाढ अशा अनेक कामांची जबाबदारी त्या सुरळीतपणे निभावतात.
आधार गटामध्ये गृहिणींपासून ते आहारतज्ज्ञ, डॉक्टर, सीए अशा सर्वच व्यवसायांतील महिला केवळ या विषयाबाबत आवड आणि नवमातांना मदत करण्याची ऊर्मी यामुळेच तुटपुंज्या मोबदल्यातही समाधानी राहून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. युनिसेफच्या आर्थिक पाठबळामुळे आधार गट कार्यरत आहे. परंतु पुढील काळासाठी मात्र सीएसआरसारखे पर्याय शोधणे सुरू असल्याचे या गटाचे प्रणेते आणि बीपीएनआय महाराष्ट्राचे डॉ. प्रशांत गांगल यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील कुपोषण, बालमृत्यू यावर योग्य उत्तर म्हणजे ‘लॅक्टेशन कन्सल्टंट’ आणि समुपदेशक तालुका पातळीवर कार्यरत होणे आवश्यक आहे. यासाठी बीपीएनआय महाराष्ट्राने पावले उचलली आहेत. आता सरकारनेही असे सल्लागार निर्माण करण्याची जबाबदारी हाती घेण्याची आवश्यकता आहे.