शिवसेनेचा संतप्त सवाल
देश सुरक्षित कुठे, असा प्रश्न उपस्थित करीत जोपर्यंत दहशतवादी कारवाया होत आहेत, तोपर्यंत पाकिस्तानशी शांततेची चर्चा नको, असे परखड मतप्रदर्शन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीवरुन आता वादंग निर्माण झाला आहे.
पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी शिबीरे चालविण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदी हे शरीफ यांची भेट घेतात व चर्चा करतात. तेव्हा ही शिबीरे उध्वस्त करण्याची जबाबदारी शरीफ यांची नाही का, असा सवाल राऊत यांनी केला आहे. चिंता करण्यासारखी परिस्थिती असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे, अशी टिप्पणी करीत किती वर्षे विषाची परीक्षा घेणार, असा तिखट सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करण्यात काहीही अर्थ नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
तिन्ही सेनादलप्रमुखांची बैठक
पठाणकोट हल्ल्याची माहिती मिळताच संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पणजीतील मुक्काम हलवत तात्काळ दिल्लीत धाव घेतली. भाजप आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी ते पणजीत आले होते. दिल्लीत परतल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व तिन्ही सैन्य दलप्रमुखांना बैठकीसाठी तातडीने पाचारण केले. सुमारे ९० मिनिटे चाललेल्या या बैठकीत त्यांनी पठाणकोटमधील लष्करी कारवाईचा आढावा घेतला. पठाणकोट हवाई तळावरील महत्त्वाची मालमत्ता नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न उधळून लावल्याचे हवाई दलाच्या वतीने सांगण्यात आले.
पाकिस्तानकडून निषेध
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारतासोबत सहकार्य करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगत पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यांची निर्भर्त्सना केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनपेक्षित लाहोर भेटीचा अप्रत्यक्षरीत्या उल्लेख करत दोन्ही देशांच्या सर्वोच्च प्रतिनिधींनी सुरू केलेले सौहार्द-पर्व सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आश्वासनही पाकिस्तानच्या वतीने देण्यात आले.