मुंबई : भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीत सुमारे सात ते आठ लाख क्रिकेटप्रेमी सहभागी झाल्यामुळे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. मोठया क्रिकेटप्रेमी रेल्वेने सीएसएमटी आणि चर्चगेट, मरिन लाईन्स रेल्वे स्थानकांवर दाखल झाल्याने रेल्वे पोलिसांची तारांबळ उडाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण मुंबईत वाढलेल्या गर्दीचा लोंढा आवरण्यासाठी आणि गर्दी पांगविण्यासाठी रेल्वे पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवावा लागला. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वे मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यानच्या रस्त्यावर क्रिकेटप्रेमी दिसत होते. मरिन ड्राईव्ह परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे ७ ते ८ लाख क्रिकेटप्रेमी या मिरवणुकीत सहभागी झाले होते, असा अंदाज रेल्वे पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २००७ साली टी-२० विश्वचषकाच्या विजयी मिरवणुकीचा अभ्यास केला. यावेळी अधिक गर्दी होण्याची शक्यता होती. त्यानुसार नियोजन करून १०० ते १५० सुरक्षा रक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी दुपारी ३.३० वाजेनंतर क्रिकेटप्रेमींची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली. नियोजित केलेल्या अंदाजापेक्षा तिप्पट गर्दी वाढल्याने, राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पोलीस यांना पाचारण करण्यात आले. १०० गृहरक्षक, ५० रेल्वे पोलीस अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे १०० अधिकारी, कर्मचारी तैनात केले होते. तसेच चर्चगेटमधील चिंचोळे प्रवेशद्वार बंद करून, फक्त मर्यादीत प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, अशी माहिती रेल्वे पोलिसाचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय

गर्भवती जखमी

मरिन ड्राइव्ह परिसरात रस्त्यावर राहणारी एक २२ वर्षीय गर्भवती महिला किरकोळ जखमी झाली. या महिलेला प्रथम सेंट जॉर्जेस रुग्णालयात व नंतर कामा रुग्णालयात आणण्यात आले. या महिलेवर उपचार करण्यात आले. तिला उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

६० मोबाइल गहाळ

चर्चगेट रेल्वे स्थानक, वानखेडे स्टेडियम, मरिन ड्राईव्ह आणि नरिमन पॉईंट परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या गर्दीचा फटका चाहत्यांनाच बसला. या विजयोत्सवात तब्बल ६० मोबाइल गहाळ झाल्याची नोंद मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झाली. तर मोबाइल गहाळ झाल्याच्या ४ तक्रारी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या असून या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, पोलिसांना १० ते १२ मोबाइल रस्त्यावर पडलेले सापडल्यानंतर त्यातील क्रमांकावर संपर्क साधून संबंधितांना ते मोबाइल परत केले.

रेल्वे स्थानकावर तरुणी जखमी

गुरुवारी रात्री ८.३० ते रात्री ९.३० दरम्यान गर्दीचा लोंढा चर्चगेट रेल्वे स्थानकाकडे वळत होता. यावेळी पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने क्रिकेटप्रेमींची गर्दी विभाजित केली. मात्र चर्चगेट रेल्वे स्थानकालगत पायऱ्यावरून एक तरुणी घसरून पडली. तिला तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत नेऊन उपचार करण्यात आले. तर, चर्नी रोड येथून लोकल सुटल्यानंतर अर्णव रांगले (१८) याने धावत्या लोकल बाहेर हात काढला. त्याच्या हाताला बाहेरील खांबाचा जोरदार फटका बसला. रेल्वे पोलिसांनी त्याला तत्काळ जीटी रुग्णालयात दाखल केले.

१० मुले हरवली

गर्दीत १० पेक्षा अधिक अल्पवयीन मुले हरवली होती, त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे ती सुपूर्द केली.

रेल्वे प्रवाशांत वाढ

विश्वचषक विजयी मिरवणुकीत बहुसंख्य क्रिकेटप्रेमी रेल्वे मार्गाने आले होते. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुमारे आठ लाख तिकीटधारक प्रवासी एका दिवसात वाढल्याची नोंद झाली आहे. गेल्या गुरुवारी मध्य रेल्वेवरून १२ लाख ०६ हजार ९६० प्रवाशांनी प्रवास केला होता. तर, विश्वचषक विजयी मिरवणुकीच्या निमित्ताने गुरुवारी, ४ जुलै मध्य रेल्वेवरून १३ लाख ७६ हजार ७५३ जणांनी प्रवास केला. यात सुमारे १ लाख ६९ हजार ७९३ प्रवासी वाढले. तर, पश्चिम रेल्वेवरून दैनंदिन सरासरी ८.५० लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, गुरुवारी १५ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे सुमारे ६ लाखांहून अधिक  प्रवाशांची संख्या वाढली, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. यासह लाखो पासधारक प्रवाशांनी विश्वचषक विजयी मिरवणूक पाहण्यासाठी आले होते, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

जखमींची संख्या १९ वर

स्वागतयात्रेदरम्यान चाहत्यांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १९ हून अधिक जण जखमी झाले. जखमी झालेल्या नागरिकांपैकी जी.टी. रुग्णालयात सर्वाधिक ११ जणांवर उपचार करण्यात आले. गर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे काही जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर काहींना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जी.टी. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र संकपाल यांनी दिली. वृत्तवाहिनीचे छायाचित्रणकार सुनील वर्मा (३०) गर्दीमध्ये पडले. त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करून त्यांना रात्री घरी पाठविण्यात आले. नायर रुग्णालयात दोघांना उपचारासाठी आणण्यात आले होते. तसेच पायाला मार लागल्याने चार व्यक्तींना बॉम्बे रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. या चारही व्यक्तींचे पाय फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याचे बॉम्बे रुग्णालयाने सांगितले. मरिन ड्राईव्हच्या शेजारीच असलेल्या सैफी रुग्णालयातही काही रुग्णांना दाखल करण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Around eight lakh cricket lovers participate india t20 world cup victory parade zws
Show comments