मुंबई : बेरोजगारी, महगाई, जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी या प्रश्नांवर केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी राजभवनाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्यांची पोलिसांनी विधान भवनाच्या आवारात व अन्य ठिकाणी धरपकड केली.
काँग्रेसनेत्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तसेच ‘ईडी’ कारवाईच्या निषेधात घोषणा दिल्या. पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली. विधानभवनातून बैठक आटोपून राजभवनाच्या दिशेने आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वर्षां गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान आदी नेत्यांना पोलिसांनी विधानभवन परिसरातून अटक केली. तर मलबार हिल परिसरातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, डॉ. नितीन राऊत, अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आदी पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली.