महागड्या मोबाइलच्या विक्रीची फेसबुक व समाज माध्यमांवर जाहिरात करून प्रत्यक्षात ग्राहकांना जुने मोबाइल पाठवल्याप्रकरणी दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून सुमारे तीन हजार २०० मोबाइल जप्त करण्यात आले असून आरोपींनी देशभरात अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. फसवणुकीसाठी आरोपी सेवा केंद्र व अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर करीत होते.

राहिल जयंतीलाल रांका (२५) व सिद्धेश संतोष सुतार (२४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. रांका हा मालाड, तर सुतार हा गोरेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून तीन हजार १९९ मोबाइल जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत एक कोटी ३७ लाख रुपये आहे. याशिवाय आरोपींकडून संगणक, हार्डडिस्क, पेनड्राईव्हही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाहा व्हिडीओ –

दोघांनाही न्यायालयाने २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही आरोपींची बाजू ॲड. अजय उमापती दुबे यांनी मांडली. याप्रकरणी फसवणूक झालेला तक्रारदार नसल्यामुळे भादंवि ४२० (फसवणूक) कलम लावणे चुकीचे असल्याचा दावा दुबे यांनी केला आहे.हे आरोपी मालाड येथील काचपाडा परिसरातून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा मारला. त्यावेळी रांका तेथे सापडला. त्याने आपण राहिल इम्पेक्सचा मालक असल्याचे पोलिसांना सांगितले. घटनास्थळी रांका याच्यासह काही महिला संगणकावर काम करीत होत्या. तसेच एक व्यक्ती मोबाइल दुरूस्त करीत होता. आरोपी येथून ऑनलाइन ग्राहकांना मोबाइल विक्रीच्या नावाने फसवत असल्याचे उघडकीस झाले. पोलिसांनी याप्रकरणी टोळीचा म्होरक्या सिद्धेश सुतार यालाही अटक केली. पोलिसांनी सुमारे एक कोटी ३७ लाख रुपयांचे जुने मोबाइल जप्त केले.

Story img Loader