अंधेरी आणि मालाडच्या परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली. अब्दुल आजाद अब्दुल हाय फारुख ऊर्फ आबिद आणि आसिफ नूरइस्लाम खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले आहे. यातील आसिफ हा गेल्या चौदा वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- जनुकीय सुधारित संशोधनाला परवानगी मिळाल्यास देश खाद्यतेलात स्वयंपूर्ण ; शरद पवार

देशात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांची मोहीम सुरु आहे. त्या मोहीमेअंतर्गत अंधेरी आणि मालाड परिसरात काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अंधेरीतील सर्व्हिस रोड, मोगरा पाडा परिसरातून आबिद याला ताब्यात घेतले. चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. व्यवसायाने प्लंबर असलेला आबिद हा एका वर्षापूर्वी बांगलादेशातून भारतात आला होता. तेव्हापासून तो मुंबईत वास्तव्यास होता. सध्या तो अंधेरीतील जुहू गल्ली, बीएमडब्ल्यू शोरुमसमोरील चाळीत राहतो. दुसर्‍या घटनेत मालाडच्या मालवणी, झुणका भाकर केंद्राजवळ आसिफला मालवणी पोलिसांनी अटक केली. तो मिरा-भाईंदरच्या काशी व्हिलेजवळील जामा मशिद, गावठाण चाळीत राहतो. तो १४ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांसह बांगलादेशातून भारत आला होता. तेव्हापासून वेगवेगळ्या शहरात आणि आता मुंबईत वास्तव्यास होता. बांगलादेशातील गरीबी आणि उपासमारीला कंटाळून या दोघांनी भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली.

हेही वाचा- मोठी बातमी! १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन मंजूर; मात्र CBI च्या भूमिकेमुळे निर्णयाला १० दिवसांची स्थगिती

या दोघांकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले आहेत. त्या मोबाईलवरुन ते दोघेही बांगलादेशातील त्यांचे कुटुंबिय, मित्रांसह नातेवाईकांच्या नियमित संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या ते दोघेही न्यायालयीन कोठडीत असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा बांगलादेशात पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest of two bangladeshi nationals residing illegally from andheri and malad mumbai print news dpj