मुंबई :माथाडी युनियनचा पदाधिकारी असल्याचे भासवून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतीळ व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या मुबीन शेख (२३) या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. आरोपीविरोधात आतापर्यंत मुंबईत सहा गुन्हे नोंद असून आरोपीने आणखी दहा जणांकडून खंडणी उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, शेखने ६ जून रोजी सीआरटू मॉलमध्ये पहिला मजल्यावर वर्ल्ड ऑफ वाइन या नवीन दुकानाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पोहचला. माथाडी युनियनचे पदाधिकारी असल्याचे सांगून, पैसे द्या नाहीतर काम बंद पाडेन, हॉटेल पेटवून देईन अशी धमकी देत मुकादम रामचंद्र मंडल यांंना धक्काबुक्की करण्यात आली होती. मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून हजार रुपये उकळले. तसेच, ५० हजारांची मागणी केल्याने त्यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकानेही समांतर तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मुबीनला वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालय परिसरातून अटक करण्यात आली.
हेही वाचा >>>शिल्पा शेट्टीसह तिचा पती आणि इतरांविरोधातील तक्रारीची चौकशी करा; सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश
खारदांडा परिसरात राहणारा मुबीन राज्यातील कोणत्याही माथाडी संघटनेचा सदस्य नसल्याचे तपासात उघड झाले. त्याने, पदाधिकारी असल्याचे भासवून आतापर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील व्यावसायिकाकडून खंडणी उकळली होती. त्याच्याविरोधात मुंबईतील सांताक्रूझ, माटुंगा, टिळक नगर, गावदेवी या पोलीस ठाण्यांत खंडणी, फसवणुकीचे सहा गुन्हे नोंद असून, ठाणे आणि नवी मुंबईतही मुबीनविरोधात गुन्हे नोंद असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे.