ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्याम थोरबोले यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच कर विभागातील सुभाष वाघमारे (४७) या लिपिकास तीस हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले.
महापालिकेच्या डायघर कार्यालयातील कर विभागात तो काम करतो. मुंब्रा शिळफाटा येथील एका सोसायटीची मालमत्ता कराची मोठी थकबाकी असून ती कमी करून देण्यासाठी सुभाष याने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडअंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक अरुण सकपाळ यांच्या पथकाने शिळ फाटा येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून सुभाषला तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले