रोज ५ ते १० लाख बाटल्या तयार करण्याची गरज

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : धारावी आणि अंधेरीत प्रायोगिक तत्त्वावर औषध वितरणास मुंबई महापालिके ने परवानगी दिल्यानंतर करोना विषाणूवरील प्रतिबंधात्मक औषध म्हणून ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी गोळ्यांना मागणी वाढली आहे. अनेक नगरसेवक, आमदार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारसंघात या गोळ्यांचे वाटप करू लागले आहेत. काही उद्योजकांचे संघही यात आघाडीवर आहेत.

करोनावर अद्याप कोणतेही औषध सापडलेले नाही. मात्र श्वसनसंस्थेवरील आजारांसाठी होमिओपॅथीमध्ये आधीच असलेल्या ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधाचे चांगले परिणाम दिसत असल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे धारावी आणि अंधेरी पश्चिम भागात औषधाच्या वितरणासाठी ‘आरजू स्वाभिमान नागरी समिती’ला पालिके ने परवानगी दिली होती. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांत या औषधाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

मुंबईतील २४ वॉर्डातील लोकप्रतिनिधी, पालिका कर्मचारी संस्थेकडे औषधांची मागणी करू लागले आहेत. संस्थेला परवानगी देण्याबाबतच्या पत्रात संस्थेनेच निधी उभारावा असे म्हटले आहे. त्यामुळे संस्थेला आता ही एवढी मोठी मागणी पुरवणे आणि त्यासाठी खर्च उभा करणे अवघड होत आहे.

‘आरजू संस्थे’चे राजेंद्र मेहता म्हणाले की, सध्या संस्था वाडा आणि साकीनाका येथे औषधे बनविते. दिवसाकाठी ५० हजार बाटल्या औषध इथे तयार होते. मात्र सध्याची मागणी पाहता दर दिवशी ५ ते १० लाख बाटल्या तयार करण्याची गरज आहे. संस्थेने आजवर दीड लाख बाटल्या वितरित केल्या आहेत.

‘अजून स्वस्तात देता येईल’

साबुदाण्याच्या आकाराच्या या ९० गोळ्यांच्या बाटलीसाठी संस्थेला १०० रुपयांचा खर्च येतो. मात्र मोठय़ा प्रमाणावर गोळ्यांचे उत्पादन केल्यास १५-२० रुपयात बाटली देता येईल. सध्या पोलीस, बेस्ट, बँक कर्मचारी यांच्याकडून या गोळ्यांना मागणी आहे. तसेच सोलापूर, कोल्हापूर, पुणे येथील महापालिकाही या गोळ्या घेण्यास पुढे आल्या आहेत.

‘आरजू संस्थे’ने मोफत वितरणाची परवानगी मागितली होती. त्यावर आम्ही एक समिती स्थापन करून मग संस्थेला या दोन वॉर्डासाठी प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली.

-सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त