‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेचं शंभरावं वार्षिक प्रदर्शन १६ जानेवारीपासून, त्यानंतर १३ ते १९ फेब्रुवारीपर्यंत ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चं १२६वं वार्षिक प्रदर्शन आणि त्याच्या आगेमागेच ‘राज्य कला प्रदर्शना’चा व्यावसायिक दृश्यकलावंतांसाठीचा टप्पा, अशी आपल्या राज्यासाठी प्रतिष्ठेची स्पर्धात्मक प्रदर्शनं नव्या वर्षांत नव्या कलावंतांची भेट घडवतात. ते यंदाही होईलच. शिवाय ९ ते १२ फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत ‘इंडिया आर्ट फेअर’ (यंदाचं वर्ष नववं, पण व्यवस्थापनात मोठा फेरबदल- तरीही फक्त बडय़ा भारतीय-आंतरराष्ट्रीय आर्ट गॅलऱ्यांच्याच समावेशाचा प्रघात कायम, त्यामुळे चित्रकारही  यशस्वी नि प्रतिष्ठितच अधिक असणार; नवे कमीच!) आणि १५ फेब्रुवारीपासून मुंबईत, देशभरच्या नवोदित कलावंतांना स्वत:चे स्टॉल मांडू देणारा ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’.. अशी रेलचेल पुढल्या सुमारे दीड महिन्यांत असेल. यातलं काहीच नको असेल अशांसाठी ‘काळा घोडा कलाउत्सव’ ३ ते ११ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्याहीनंतर नाव घेण्याजोगी प्रदर्शनं होतीलच, पण त्यावर कळस चढेल तो ‘१२ डिसेंबर’ या ठरल्या तारखेला होणाऱ्या, यंदाच्या चौथ्या ‘कोची-मुझिरिस बिएनाले’मुळे! फोर्ट कोची बेटावर आणि आसपासच्या परिसरात १०० दिवस चालणाऱ्या या द्वैवार्षिक महाप्रदर्शनातून कलेविषयीची समज वाढते, असा अनेकांचा अनुभव आहे.

‘क्लार्क हाऊस’ या कला-संस्थेच्या जागेतलं प्रदर्शन गेल्याच आठवडय़ात सुरू झालेलं, म्हणून नवं. पण या प्रदर्शनात आणखीही आगळेपणा आहे. मॉरिटानियाचा चित्रकार सालेह लो, त्या देशाचा दक्षिणेकडील शेजारी सेनेगल या देशातील असितु दिओप ही व्हिडीओ कलाकृतीकार आणि आपला मुंर्बइचा गुणी दृश्यकलावंत अमोल पाटील यांचा समावेश त्यात आहे. दोन्ही अभारतीय कलावंत, आपापल्या देशातल्या अत्यंत दुखऱ्या प्रश्नांबद्दल कलाकृतींमधून बोलताहेत.

जहांगीरमधलं वन्यजीवन

सध्या पुरातत्त्व विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले, पण मूळचे विक्रीकर विभागातले अधिकारी सुशील चंद्रकांत गर्जे यांनी गेल्या काही वर्षांत टिपलेल्या निवडक वन्यजीव छायाचित्रांचं प्रदर्शन ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या सभागृह दालनात भरलं आहे. ‘एन्डेन्जर्ड’ हे त्या प्रदर्शनाचं नाव, वाघांकडे- ‘प्रोजेक्ट टायगर’कडे लक्ष वेधणारं आहेच, शिवाय अनेक वन्यजीव आणि पक्षी कसे नामशेष होण्याच्या उंबरठय़ावर आहेत, हेही सांगणारं आहे. अशा नऊ (सध्या दुर्मीळ आणि काळजीच्या कडेलोटावर असलेल्या) प्रजाती भारतातच आहेत, त्यांची छायाचित्रं या दालनाच्या मधोमध उभारलेल्या भिंतीच्या एका बाजूला आहेत. आत शिरल्यावर सहसा डावीकडूनच हे दालन पाहिलं जातं, तशी सुरुवात केल्यास पहिली दोन छायाचित्रं ‘पिक्टोरिअल’ फोटोग्राफीचेही सारे निकष पाळणारी आहेत. पहिल्यात मावळतीच्या वेळी दिसणारे करडे डोंगर, काळपट-करडी जमीन, या दोहोंच्या मधून वाहणारी आणि रुपेरी चमचम करणाऱ्या पट्टय़ासारखी नदी.. आणि या नदीच्या पट्टय़ात अवचित आलेली, हत्तीची एक छायाकृती. दुसऱ्या चित्रात खाकी-पिवळट रंगछटांचा उत्सव आहेच, पण या वाळक्या मुरमाड निसर्गावर अधिराज्य गाजवू पाहणारी वाघांची एक जोडी अशी काही उभी आहे की, दोघांचा चेहरा एकच वाटावा (हे चित्र सोबत छापलं आहेच).

प्रदर्शनाची पुढली रचना वन्यजीवांच्या जोडय़ा, पिल्लू आणि पालक संबंध, शिकार असे विषय एका जागी पाहता यावेत, अशी काही प्रमाणात आहे आणि पुढे, केनियातल्या चार अभयारण्यांची सफर गर्जे यांनी प्रेक्षकाला घडविली आहे. ‘ऑस्ट्रिच मेटिंग’ किंवा जीव वाचवण्यासाठी पळणारे कळप यांसारखी छायाचित्रं वन्यजीव छायाचित्रणातला धीर (पेशन्स) आणि वृत्तछायाचित्रणातली चपळाई यांच्या संगमामुळेच शक्य होतात. भारतातील किमान ११ राज्यांतली अभयारण्यं पालथी घालून, त्यातली उत्तमच छायाचित्रं इथं गर्जे यांनी मांडली आहेत. तरीही, या दालनात किती ‘फ्रेम’ पाहायच्या याची एक आपसूक, नैसर्गिक मर्यादा प्रेक्षकावर असते.  जास्त कलाकृती इथल्या जागेत मावू शकतात; पण त्या डोळय़ांत, मनात मावू शकत नाहीत.

‘जहांगीर’च्या अन्य दालनांपैकी वरच्या मजल्यावरल्या ‘हिरजी जहांगीर दालना’मध्ये विनायक पोतदार यांच्या निसर्गचित्रांचं प्रदर्शन आहे. तर एकमेकांलगत असलेल्या तीन दालनांपैकी पहिल्या दालनातली के. व्यंकट राव यांची शिल्पं लक्षणीय आहेत. मोहर्रम वा अन्य परंपरांतील ‘वाघ म्हणून नाचणारी माणसे’ हे राव यांनी जणू आजच्या एकंदर जगण्यासाठी वापरलेले रूपक आहे, हे प्रेक्षकांच्या लक्षात येईल. पण अन्य प्रकारची शिल्पे (उदा. प्रश्नचिन्हांकित मानवाकृतीचे ‘हू अ‍ॅम आय?’) देखील इथे आहेत. दोन स्त्रियांच्या आकृती दिसणारे एक शिल्प ‘सिरॅमिक’ या (आकृतिप्रधान शिल्पांसाठी अतिअवघड) माध्यमात केलेले दिसेल, तर त्याशेजारचे सिंह-शिल्प पितळेचे आहे. या शिल्पांसोबत संध्या पटनाईक यांची चित्रेही या प्रदर्शनात आहेत. दुसऱ्या दालनात संजय कुमार यांनी गेल्या सात वर्षांत केलेली ड्रॉइंग्ज आणि रंगचित्रे दिसतील, तर तिसऱ्या दालनातील रेबा मोंडल यांच्या ‘इनोव्हेटिव्ह अ‍ॅबस्ट्रॅक्शन्स’ नावाच्या प्रदर्शनातील समुद्र/पुळण यांसारख्या दृश्यांची अनेक चित्रे दिवंगत चित्रकार श्यामेन्दु सोनवणे यांची आठवण करून देतील! रेबा यांनी अन्य विषयही हाताळले आहेतच.

Story img Loader