होय. आपल्या ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये कलाप्रदर्शनांचा भाग म्हणून खरोखरच या वस्तू पाहता येतात. दोन निरनिराळय़ा प्रदर्शनांमध्ये त्या आहेत, आणि मुख्य म्हणजे त्या ‘तयार वस्तू’ नसून चित्रकारांनी आपापल्या संकल्पनेप्रमाणेच घडवलेल्या आहेत, हे मात्र महत्त्वाचं. पायऱ्या चढून ‘जहांगीर’मध्ये शिरताक्षणी सध्या जे निळंनिळं ‘धरोहर’ या प्रदर्शनाचं सिनेमाच्या पोस्टरसारखं मोठ्ठं पोस्टर दिसतंय, त्याकडे पुरेसं दुर्लक्ष करून आणि नेहमीच्या सवयीनं आधी डावीकडल्या ‘सभागृह दालना’कडे वळण्याआधी जर तुम्ही ओळीनं तीन दालनांच्या माळेकडे जाणारं उजवीकडलं दार ढकलून आत गेलात, तर पहिल्याच दालनातल्या प्रदर्शनात तुम्हाला घोंगडी दिसेल. त्याबद्दल नंतर बोलू. आधी पलंगाबद्दल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा पलंग जुन्या वळणाचा आहे. मल्लिकार्जुन कटके यांच्या प्रदर्शनाचा बहुतेक भाग व्यापणाऱ्या, एका भल्यामोठय़ा मांडणशिल्पाचा भाग म्हणून हा जो पलंग दिसतो, त्याला वर मच्छरदाणी लावण्याची सोय आहे. पण याच मांडणशिल्पात एक सिंगल-बेडसारखा दिवाणही आहे, पाळणाही आहे, ‘बंक बेड’सारखा उंच पलंग आहे- त्या पलंगाच्या खाली भरपूर मंदसे वीज-दिवे (बल्ब) आहेत. आणि त्याहीनंतर, एक खोलीसुद्धा उभारलेली आहे. काय आहे हे सारं. मल्लिकार्जुन सांगतात, ‘‘हे मांडणशिल्प बरंचसं आत्मपर आहे. पाळणा म्हणजे माझं बालपण, तो जुना वाटणारा पलंग म्हणजे पालकांची साथ न सोडता वाढण्याचा काळ, पुढे ती साथ सोडण्याचा आणि त्याहीनंतर स्वतच्या आकांक्षा फुलवण्याचा, स्वप्नं पाहण्याचा काळ.. ही सारी वयं संपल्यावर पुन्हा गृहस्थी, पुन्हा ‘दोघांची’ खोली, दोन उशा- एक पांघरूण.. त्या नात्याची अथांगता..’’ मल्लिकार्जुन यांनी समुद्रकिनाऱ्यावरल्या लाटांचा व्हिडीओ या खोलीतल्या पांघरुणावर (म्हणजे वरून खालच्या दिशेला) प्रक्षेपित करून ही अथांगता दाखवलीआहे. पलंग, पाळणा, सिंगलबेड या साऱ्या प्रदर्शनवस्तू अध्र्या लाकडी/अध्र्या सोनेरी आहेत. लाकडातही, प्लायवूडचा कडेचा भागच (अनेक लाकडी थर एकमेकांना चिकटलेले दिसतात, ती बाजूच) मल्लिकार्जुन यांनी वापरली आहे. याखेरीज या प्रदर्शनात काही कृष्णधवल चित्रं आणि त्याच चित्रांवर आधारित एक व्हीडिओ दिसतो, लाकडावरच मोजक्या रंगांत केलेलं एक प्रचंड ग्रूप फोटोवजा प्रतिमेचं चित्रही दिसतं. ‘हा मला आयुष्यभरात आठवणाऱ्या माणसांपैकी काहींचा ग्रूप फोटो’ असं मल्लिकार्जुन सांगतात. या प्रदर्शनाचा एकंदरीत एकसंध असा परिणाम होतोच. पण त्यातलं मांडणशिल्प वजनानं समजा कितीही हलकं असलं तरी, विनाकारण बोजड आणि अवडंबरासारखं वाटतं. तरीही मल्लिकार्जुन यांची ती खोली लक्षात राहील. त्यातला समुद्र हा व्हीडिओ म्हणून फार साधा असला तरी, पतिपत्नींतले नाजुक क्षण साकार झाल्याचा परिणाम देण्याची ताकद त्यात आहे.

घोंगडी आहे, ती पहिल्याच दालनात, चित्रकार संजय टिक्कल यांच्या प्रदर्शनात. टिक्कल यांची अन्य चित्रं प्रामुख्यानं कॅनव्हासवरच आणि अ‍ॅक्रिलिक रंगांत असल्यामुळे त्यांसोबत भिंतीवर दिसणारी ही फिकी पांढरट घोंगडी आणि (पतंगाच्या मांज्यासाठी वापरले जाणारे-) ‘काची’रंग वापरून घोंगडीतल्या मोजक्याच आकारांना मिळणारा उठाव हे लक्ष वेधतं. अन्य चित्रं बहुश अमूर्त भासली, तरी ग्रामीण निसर्ग आणि शहरी निसर्ग यांचं अमूर्तीकरण त्यात शोधता येतं. शहरातली पथदिव्यांची ओळ एका अगदी लहान चित्रात दिसते, डोंगर तर भरपूर चित्रांतून दिसतात. तरीही चित्रांचा बाज मात्र अमूर्त आहे. ‘‘माझ्या वाडवडिलांपासून अशी घोंगडी विणण्याची परंपरा आमच्या घरात, समाजात आहे. माझे वडील घोंगडी विणत. तशी ही घोंगडी मी विणली,’’ असं संजय टिक्कल सांगतात, तेव्हा रंगांपेक्षाही या घोंगडीच्या विणीकडेच प्रेक्षकाचं लक्ष जाऊ लागतं!

उद्याच अखेरचा दिवस

चित्रकार दत्ता बनसोडे यांचं निधन जुलैमध्ये, झालं. ज्यांच्या चित्रांमुळे गावोगावच्या अनेक कलाविद्यार्थ्यांना नवी उमेद मिळाली, गौतम बुद्धांच्या चित्रणाची नवी दिशाच सापडली, ते दत्ता बनसोडे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी जग सोडून गेले. त्यांची अनेक चित्रप्रदर्शनं गेल्या २० वर्षांत भरली, ‘सॅफरॉनआर्ट’सारख्या विक्रीप्रधान उपक्रमांनी तर दत्ता यांच्या चित्रांची पुनर्विक्रीही सुरू केली होती. (अशी पुनर्विक्री होणं ही चित्रकारांसाठी प्रतिष्ठेची, पण काहीच पैसा मिळवून न देणारी बाब असते). कलावंत जर समाजाभिमुख राहिला नाही, समाज कुठे चालला आहे आणि आपण समाजाबरोबर कसं राहायचं याविषयीचे मानवी प्रश्न त्याला पडले नाहीत, तर कलावंताचं एकटेपण सुरू होतं आणि अशा एकटेपणाला व्यसनी वळण लागण्याचाही धोका मोठा असतो. दत्ता आधीपासून अबोल, एकटाच होता. असो.

या दत्ता बनसोडे यांचं पहिलं मोठं चित्रप्रदर्शन मुंबईत सुमारे २० वर्षांपूर्वी भरवणारे विभू कपूर यांच्या ‘गॅलरी बियॉण्ड’मध्ये ऑगस्ट अखेरपासून भरलं असून ते ८ सप्टेंबर रोजी (उद्याच) संपेल. या प्रदर्शनात दत्ता यांच्या बुद्धप्रतिमांच्या आधी ज्या बसलेल्या स्त्री-आकृती काढल्या होत्या, त्याही पाहायला मिळतात. पहिल्या प्रदर्शनात कॅनव्हासवर चारकोलनं (जरी चारकोल मुख्यत कागदावरच वापरला जात असला, तरीही तो कॅनव्हासवर वापरून, पुढे त्यावर ‘फिक्सर/बाइंडर’ची प्रक्रिया करून) काढलेल्या या स्त्री-आकृतीही दत्ता यांनी मांडल्या होत्या. हे या प्रदर्शनातून सामोरं येतं. विद्यार्थीदशेत दत्ता बनसोडे यांनी रंगीत चित्रंही केली होती, हेही दिसतं.

स्वतचं असं एखादं वैशिष्टय़ निर्माण करणाऱ्या चित्रकारांवर अनेकदा ‘तोचतोपणा’चा आरोप होत असतो. दत्तावरही असा आरोप काही समीक्षक करीत. पण बहुतेकदा हा आरोप तथ्यहीन ठरतो. आपापल्या वैशिष्टय़ांची आवर्तनं करणारे चित्रकार देखील, प्रत्येक आवर्तनागणिक नवा काहीतरी विचार करतच असतील.. तो विचार बऱ्याच चित्रांमध्ये दिसत नसेल इतकंच.. पण नंतरच्या एखाद्या चित्रामध्ये या विचाराचं संपृक्त रूप चमकून जातं.. हेही दत्ताच्या या मरणोत्तर प्रदर्शनात पाहता येईल : बुद्धप्रतिमा अगदी एका कोपऱ्यात असलेलं, बाकी चित्राच्या मोठय़ा भागात खंडित प्रतिमाच दिसणारं असं एक चित्र आहे. दत्तानं ते ‘बामियान’ बुद्धप्रतिमा तालिबान्यांनी फोडल्यानंतर केलं होतं! या चित्रात बामियानचा ‘हुबेहूब’ संदर्भ कुठेही नाही. बामियान प्रतिमासंहारानंतरचा दत्ताचा विचार मात्र (बुद्धाची फोडलेली आणि तरीही ज्ञानरूपानं उरणारी प्रतिमा) चित्रातून दिसेलच.

लायन गेटच्या अलीकडे शहीद भगतसिंग मार्गावरच, ‘अ‍ॅडमिरल्टी बिल्डिंग’मध्ये ‘अनिता डोंगरे’च्या दुकानाच्या वर ‘गॅलरी बियॉण्ड’ आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art exhibitions information mumbai