भारतीय दृश्यकला क्षेत्रात डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीन महिने अनेक चांगली प्रदर्शनं, व्याख्यानं किंवा चर्चासत्रांसारखे उपक्रम आणि ‘काळा घोडा फेस्टिव्हल’सारखे उत्सव यांची रेलचेल असलेला काळ असतो. ‘अच्छे दिन’ किंवा ‘चांगले दिवस’ हा शब्दप्रयोग जवळपास बदनामच झाल्यानं ‘शुभकाळ’ असा कालनिर्णयी शब्द शीर्षकात वापरला इतकंच; पण या रेलचेल असलेल्या काळाची सुरुवात अगदी आजपासूनच होते आहे, असं म्हणता येईल ही विशेष गोष्ट!

होय आजपासूनच, कारण मुंबईत एरवीही दरमहा साजरा होणारा ‘आर्ट नाइट थर्सडे’ आज आहे. हा उपक्रम दक्षिण मुंबईतल्या आर्ट गॅलऱ्यांनी कैक महिन्यांपूर्वी एकत्र येऊन सुरू केला, तेव्हा काही बदलापूर- आसनगावपासून विरार-पालघपर्यंतचे जे कलाप्रेमी दक्षिण मुंबईच्या या कलादालनांना भेट देण्यासाठी महिन्यातून एकदा तरी येतात, त्यांचा विचार झालेला नव्हता. खासगी मालकीच्या कलादालनांसाठी अखेर बाजारही महत्त्वाचा असतो, त्यामुळे शुक्रवारपासूनच ‘वीकेण्ड’चे वेध लागलेल्या बडय़ांच्या- म्हणजे संभाव्य खरेदीदारांच्या सोयीनंच गुरुवार निवडला गेला असावा. तरीही जर शक्य झालं तर जरूर याच दिवशी संध्याकाळी सहापासून एकेका कलादालनात जावं, रात्री साडेनऊपर्यंत गॅलऱ्यांतली प्रदर्शनं पाहावीत (दररोज फार तर सातपर्यंत गॅलऱ्या सुरू असतात), असा हा महिन्यातून एकदा साजरा होणारा गुरुवार. दरमहा सहसा तीन-चार तरी गॅलऱ्यांमध्ये नवं प्रदर्शन सुरू होणार असतं. पहिला दिवस थोडाफार उत्साहाचा असतो. यंदा मात्र ज्या १५ गॅलऱ्या ‘आर्ट नाइट’मध्ये सहभागी आहेत, त्यांपैकी सात गॅलऱ्यांत प्रदर्शनाचा पहिला दिवस आहे. हे प्रमाण वाढलं, याचं कारण अर्थातच, उपक्रमांची रेलचेल असणाऱ्या दिवसांची सुरुवात, हेच आहे. त्यातच, दर दोन वर्षांनी केरळच्या कोची शहरात भरणारी कला-द्वैवार्षिकी (आर्ट बिएनाले) यंदा १२ डिसेंबरपासून सुरू होत असल्यानं मुंबईमार्गे तिथं जाणारे परदेशी पाहुणेही मुंबईच्या ‘आर्ट नाइट’ला येणार, असा अंदाज आहे.

आपल्यासाठी महत्त्वाचं हे की, प्रदर्शनांप्रमाणेच कलाविषयक व्याख्यानांची मालिकाही मुंबईत सध्या सुरू आहे. जर्मनीच्या ‘मॅक्समुल्लर भवना’च्या सहकार्यानं आपल्या राष्ट्रीय आधुनिक कलादालनात (एनजीएमए) भरलेल्या ‘इंटिरिअर डिझाइन आणि दृश्यकला’ या प्रदर्शनाच्या अनुषंगानं ही व्याख्यानं आहेत. पैकी पहिलं व्याख्यान मंगळवारी (६ डिसें.) बंगळुरूला राहणाऱ्या अन्नपूर्णा गरिमेला यांनी दिलं, तर दुसरं – ‘कारागिरीपासून ‘कमर्शिअल आर्ट’कडे.. पारतंत्र्यकाळातील भारतीय व्यावसायिक कलेचा प्रवास’ या विषयावरलं अभ्यासपूर्ण आणि सचित्र व्याख्यान कोलकात्याच्या डॉ. तपती गुहा-ठाकुरता

९ डिसेंबरला- म्हणजे शुक्रवारीच- देणार आहेत. तपती या श्रोत्यांच्या मनातले प्रश्न ओळखून त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या, म्हणून प्रसिद्ध आहेत. तिसरं – १० डिसेंबरला होणारं- व्याख्यान डिझाइनच्या भारतीय वाटचालीचं लेखी स्वरूपात जतन करायला हवं, त्यासाठी विविध डिझायनरना बोलतं करायला हवं, अशा कळकळीतून ‘देखो’ हे पुस्तक वाचकांहाती देणारे राजेश दहिया यांचं आहे. ही दोन्ही व्याख्यानं रीगल सिनेमाच्या चौकातल्या ‘एनजीएमए’च्याच सभागृहात, सायंकाळी पावणेसहाला सुरू होतील.

पुरुषी (?) आकारभाषा

‘आर्ट नाइट’च्या दिवशी सुरू होणाऱ्या प्रदर्शनांपैकी भुवनेश गौडा यांचं काम पाहाता आलं, त्यामुळे इथं त्याची माहिती देता येईल. ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ नावाच्या कलादालनात भुवनेशची लाकडी शिल्पं आहेत. ‘लाकडाचा पुनर्वापर’ हे सूत्र कसोशीनं पाळूनच भुवनेश गौडा ही शिल्पं घडवतात आणि त्यांतून आकारभाषा निर्माण करतात. ही आकारभाषा म्हणजे, ड्रॉइंगवर (मुक्तरेखांकन याच अर्थानं ड्रॉइंगवर) भर देणारे दृश्यकलावंत ज्या प्रकारे स्वत:च्या आकारांची मुळाक्षरं, आकारांचं व्याकरण तयार करतात, तशी असते. त्यामुळे या आकारांचा ‘अर्थ काय?’ या प्रश्नात फारसा अर्थ नाही. गौडा यांच्या कामात, ‘झाड’ हेच लाकडाचं मूळ रूप होतं याची मुद्दाम पुसटशीच आठवण प्रेक्षकांना देऊन पुढे भौमितिक आकारांवर भर दिसतो. हे आकार भौमितिक, पण अवकाश निसर्गाशी -निसर्गापासून तुटलेपणाशी- नातं सांगणारा असतो. पोत जरी (जणू दगडावर घाव घातल्याप्रमाणे) घडीव असला, तरी तो यांत्रिक नसून त्यात कारागिरीचं मूल्य आहे हे जाणवून देणारा असतो. या दुविधा भुवनेश गौडा यांनी जाणीवपूर्वक स्वत:च्या कामात रुजवल्या असाव्यात असं वाटत राहातं. रंगांचा वापर त्यांच्या कामात फारसा नाहीच. बहुतेक शिल्पांवर लाकडाच्या पॉलिशमधल्याच निरनिराळ्या छटा आहेत. लाकडाच्या जातकुळीनुसारही रंगांतला फरक दिसू शकतो आहे. यापेक्षा निराळ्या रंगांमध्ये अगदीच थोडी कामं या प्रदर्शनात दिसतील, त्यांपैकी एक या मजकुरासोबत आहे. ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ ही गॅलरी ‘सिद्धार्थ कॉलेज- बुद्धभवन’पासून अगदी जवळ, ‘पारसी लायिंग-इन हॉस्पिटल’च्या मागच्या ‘क्वीन्स मॅन्शन’ या इमारतीत (लिफ्टने) तिसऱ्या मजल्यावर आहे.

भुवनेश गौडा यांची ही आकारभाषा काहीशी पुरुषी आहे, असं काही प्रेक्षकांना वाटेल. पण मुळात आकारभाषेच्या ‘पुरुषी’ आणि ‘बायकी’ अशा विभागण्या करण्याच्या कृतीलाच आधार नाही. असलाच आधार, तर तो नवनव्या प्रतिवादांनिशी खोडून काढता येईल.

हा आधार नाही म्हणजे किती नाही? याचं एक प्रत्यंतर रीगल सिनेमा आणि राज्य पोलीस मुख्यालय (जुनी विधानसभा) यांच्यामधून गेटवे ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जी ‘धनराज महल’ नावाची चिनीसदृश इमारत आहे, तिच्या आतल्या बाजूस तळमजल्यावर असलेल्या ‘तर्क’ या कलादालनात येईल. भौमितिक आकारांमुळे एक प्रकारचा करकरीतपणा येतो, विशेषत: गोलाईऐवजी चौरस-त्रिकोनी आकारांमुळे पुरुषीपणाचा भास होतो, असं वाटत असेल, तर ‘तर्क गॅलरी’मधलं प्रदर्शन तुमचा तर्क खोडून काढेल!

भौमितिक, तरीही कोमल..

‘तर्क’ दालनात चित्रकर्ती विश्वा श्रॉफ यांनी जलरंग वापरून केलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. या चित्रांवर तकाकी आणण्यासाठी निराळ्या द्रावणाचा वापर केला आहे. यातल्या बहुतेक चित्रांमध्ये अगदी छोटेछोटे चौरस आकार दिसतील. यापैकी काही चौरस खाली पडल्यासारखे, लटकल्यासारखे आहेत. त्यांची ती ढळलेली स्थिती, हेच या सपाट चित्रांतलं नाटय़ आहे. चित्रांमधली ‘सपाटी’ ही भारतीय लघुचित्रांमधली फरसबंदी जशी सपाट असते, तशी आहे. सौम्य, फिकटसे रंग आणि छोटेछोटे आकार यांमुळे या चौरसांचे कोपरे स्पष्ट दिसत असूनही लक्षात येत नाहीत.. त्याऐवजी अख्ख्या चित्राचा एक पोतासारखा नाजूक, कोमल परिणाम होतो आणि भौमितिक आकारही कोमल असू शकतात, हे लक्षात येतं.

जहांगीरमधल्या प्रौढ कलाकृती..

अन्य खासगी कलादालनांतही नव्या, तरुण कलावंतांची प्रदर्शनं सुरू होत असतानाच, आपल्या ‘जहांगीर कला दालना’च्या तळमजल्यावरल्या चारही भागांत मात्र तुलनेनं ज्येष्ठांची प्रदर्शनं सध्या लागली आहेत. अनेक र्वष लोकप्रियता टिकवणारे (आता दिवंगत) चित्रकार जॉन फर्नाडिस यांच्या निवडक चित्रांचं प्रदर्शन सभागृह दालनात भरलं आहे. तर एकमेकांना जुळलेल्या तिघा वातानुकूल दालनांपैकी पहिल्यात ‘जेजे स्कूल’मध्ये मुद्राचित्रणाचं अध्यापन दीर्घकाळ करणारे आणि प्रयोगशीलतेचा शोध टिकवून ठेवणारे अनंत निकम यांची मुद्राचित्रं आहेत. दुसऱ्या दालनात पद्मनाभ बेंद्रे यांची रंगचित्रं, तर तिसऱ्या दालनात अमूर्त आकारांना प्राधान्य देणाऱ्या आणि तजेलदार रंगांची नाटय़पूर्ण संगती वापरणाऱ्या चित्रकर्ती साधना रड्डी यांची रंगचित्रं आहेत.

Story img Loader