जहांगीर आर्ट गॅलरी दरवर्षीच्या पावसाळ्यात कलाविद्यार्थ्यांचं जे खास प्रदर्शन आयोजित करते, त्याला महत्त्व आहे. या ‘मॉन्सून शो’मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर कलाशिक्षणाची अंतिम परीक्षा त्या-त्या वर्षी दिलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. गेल्या अनेक वर्षांत, इथे नजरेत भरलेले विद्यार्थी पुढे चित्रकलाक्षेत्रात स्थिरस्थावरच नव्हे तर नामवंत झाल्याची उदाहरणं आहेत. रियाज कोमू, शिल्पा गुप्ता, प्राजक्ता पोतनीस, प्राजक्ता पालव, श्रेयस कर्ले, ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यमान अधिष्ठाता विश्वनाथ साबळे.. अशी किमान दशकभरापूर्वीची अनेक नावं यासंदर्भात अनेकांना आठवतील. अर्थात, एकीकडे दृश्यकलावंतांचं यशापयश कलाबाजारावरच मोजण्याची रूढी कायम आणि दुसरीकडे कलाबाजार मात्र डळमळीत, अशा कात्रीत सापडलेल्या गेल्या आठ-नऊ वर्षांतल्या गुणवंत विद्यार्थ्यांना म्हणावी तितकी संधी मिळालेली नाही, हेही खरं आहे. म्हणजे यंदाच्याही सर्वच लक्षणीय विद्यार्थ्यांचं सगळं छानछानच होणार असं नाही. झगडावं तर लागेलच. तरीदेखील, या सर्वाना आजवर कलाबाजाराचा फार विचार न करता काम आणि विचार करण्याची संधी ज्या शैक्षणिक वातावरणानं दिली त्याचा पुरेपूर फायदा हे विद्यार्थी घेतात की नाही, हे या प्रदर्शनातून पाहिलंत तर एकंदर चित्र आशादायी वाटेल!

सांगलीचं ‘कलाविश्व’, चंद्रपूर जिल्ह्यातल्या नवरगावचं ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय, वसई विकासिनी (वसई) तसंच कला-विद्या संकुल व एसएनडीटी (मुंबई) आणि भारती कला महाविद्यालय (पुणे) या सर्व महाविद्यालयांचे प्रत्येकी तिघे विद्यार्थी, ठाणे स्कूल ऑफ आर्ट, नागपूरचं शासकीय कला महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ (पुणे) इथले प्रत्येकी पाच जण, मुंबईच्या ‘रहेजा’चे सहा, औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयाचे नऊ आणि ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चे सर्वाधिक १७ जण, अशी यंदाच्या प्रदर्शनाची रचना आहे. त्यात विद्यार्थीसंख्या आणि प्रभावी चित्रं यांचं प्रमाणच काढायचं ठरवलं, तर ठाणे स्कूल ऑफचे पाच जण सरस ठरतात! पण ही काही महाविद्यालयांची स्पर्धा नव्हे.

कोणत्याही गॅलरीत असतात, तशा ‘जहांगीर’मध्येही काही मोक्याच्या जागा आहेत. त्या नेहमीच्या यशस्वी जागांवर ठेवलेल्या कलाकृतीही चांगल्या असाव्यात अशी अपेक्षा असते. ती यंदाही पूर्ण होतेच; परंतु उदाहरणार्थ-  हिमालय पाटकर (ठाणे), काजोल बिद (जेजे), चैतन्य सुर्वे (औरंगाबाद) यांची कामं आड जागी असूनसुद्धा नजरेत भरतात, ती त्यांचं कौशल्य, चित्राची समज यांच्या बळावर.

कोण अधिक लक्षणीय, हे अशा प्रदर्शनांनंतर वृत्तपत्रांनी जाहीरपणे सांगू नये, कारण सर्वच जण आपापल्या परीनं प्रयत्न करतच असतात. तरीही, प्रेक्षकांसाठी काही चित्रांचा उल्लेख आवश्यक आहे. यंदा नागपूरचा विशाल पेशने किंवा ‘जेजे’चा प्रशांत मेस्त्री यांचं काम उठून दिसेल. प्रशांत मेस्त्रीनं पाटीसारख्या ‘फ्रेम’मध्ये मांडलेलं, कापडावर ‘बाटिक’चा वापर करून साकारलेलं चित्र केवळ दृश्य म्हणून नव्हे तर तंत्र म्हणूनही समजून घ्यायला हवं. या तंत्राच्या अनेक मर्यादा असतात, त्यावर प्रशांत कशी मात करतो हेही पाहायला हवं. दुसरीकडे, विशालच्या कामाकडे ‘कलाभाषेत विचार मांडण्याचा (अभिव्यक्तीचा) एक प्रयत्न’ म्हणून पाहायला हवं. प्रत्येक गाय पवित्र असते आणि गरीबही, असं मानणाऱ्या विशालला गायीशी हिंसेचा संबंध जोडला जाणं पसंत नाही. विशालच्या कामात ही हिंसा प्रतीकरूपांनी येते. कोणीही कितीही नाकारलं तरी पिकासोचं जे ‘गर्निका’ हे चित्र हिंसेच्या दुष्परिणामांचं प्रतीक ठरलं, त्या जगप्रसिद्ध चित्रातल्या अगदी मोजक्या रेषा विशालनं मोठय़ा खुबीनं वापरल्या आहेत. चित्र इतकं सूचक आणि संयमित आहे की, त्यात निव्वळ गाय आणि हिंसा यांचा उल्लेख आहे म्हणून लगेच ‘आमचा अपमान होतोय’ वगैरे आकांडतांडव कुणी त्याविरुद्ध केलं तर त्यांचीच कलाशून्य दादागिरीची संस्कृती दिसेल. विद्यार्थ्यांची चित्रं समजून घेताना त्यांचे प्रयत्न पाहायचे असतात आणि नुकतं कलाजगतात पदार्पण करणारे विद्यार्थी हे कुणाचेही शत्रू असू शकत नाहीत, हेही जर कळत नसेल तर ‘जहांगीर’ला न जाण्याचा पर्याय खुला आहेच. असो. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी हे प्रदर्शन ३१ जुलैपर्यंत खुलं आहे.

Story img Loader