वॉक थ्रूम्हणजे कुणा माहीतगारानं बाकीच्यांना घडवलेली प्रदर्शनाची सैर. प्रत्येक चित्राचा अर्थ सांगण्याची अपेक्षा अशा वॉक थ्रूंमुळे कधीही पूर्ण होत नसतेच; पण कलाकृतींमागचे संदर्भ कळतात, त्यानं कधीतरी अर्थाची जाणीव होऊही शकते.. असे वॉक थ्रू येत्या शनिवारी दिवसभर आहेत!

कौशिक मुखोपाध्याय हा मुंबईतला गुणी, पण फार कुणाला माहीत नसलेला मध्यमवयीन दृश्यकलावंत. आठ-दहा वर्षांपूर्वी त्याचं काम प्रदर्शनात वगैरे दिसायचं, नंतर ते दिसणं बंद झालं. दुसरीकडे, कलाबाजारात २००८च्या सुमारास मंदी दिसू लागली तेव्हा बऱ्याच गॅलऱ्या बंद पडल्या होत्या, बरेच कलावंत सैरभैर झालेले होते.. तसंच काही तरी या कौशिकचं झालेलं असेल आणि रहेजा महाविद्यालयात आर्किटेक्चरच्या वर्गाचा प्राध्यापक एवढीच त्याची ओळख उरली असेल, असंही काही जणांना वाटू शकलं असतं.. पण कौशिकच्या कामात कलाबाजाराला झुगारण्याची अशी काही ऊर्मी होती की, हा काही केवळ बाह्य़ कारणांमुळे थांबला नसणार, किंबहुना तो थांबला नसणारच, असंही वाटे. तो थांबलाच नव्हता- काम करत राहिला होता याचा पडताळा घेण्याची संधी अखेर येत्या शुक्रवारपासून मिळते आहे!

‘मुंबई गॅलरी वीकएण्ड’ हा दोन दिवसांचा छोटेखानी कला-उत्सवच २० तारखेपासून सुरू होईल (२० रोजी संध्याकाळी काही गॅलऱ्यांमधला प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी असेल); त्यामध्ये कौशिक मुखोपाध्यायचं काम ‘चटर्जी अ‍ॅण्ड लाल गॅलरी’ या कलादालनात दिसणार आहे. मॉर्टिमर चटर्जी आणि तारा लाल या दाम्पत्याची ही गॅलरी कौशिकच्या कामानं गजबजून जाणार आहे. या प्रदर्शनातून, ‘यांना कलाकृती म्हणायचं का?’ अशा प्रश्नाशी शांतपणे झगडण्याची संधी अनेक प्रेक्षकांना मिळू शकणार आहे हा असा प्रश्न पडू शकतो, याची मुख्य कारणं दोन : (१) कलाकृती म्हणजे अमुकअमुक. ते जे काही असतं त्यानं छान दिसलं पाहिजे, ‘दृश्यकलाकृती’ असेल तर ती भिंतीवर टांगलेली किंवा पदस्थलावर (पेडेस्टलसाठी विंदा करंदीकरांचा शब्द) शिल्पासारखी ठेवलेलीच असली पाहिजे’ असं अनेकदा गृहीत धरलं जातं (२) याच्या बाहेर, ‘नेहमीसारखी’ अजिबात न दिसणारी पण आपल्या भावनांची जुळवाजुळव अधिक वेगवान, अधिक समृद्ध आणि अधिक विविधांगी करणारा अनुभव आपल्याला जे पाहून मिळतो, ते जर कुणी मुद्दाम घडवून कलाकृतीसारखंच कलादालनात मांडलं असेल तर नक्कीच ती कलाकृती, हे मान्य करण्यात जणू आपल्याला कमीपणा वाटतो!

या दोन्ही कारणांवर -खरं तर आपल्याच अडचणींवर- मात करण्याची संधी म्हणजे कौशिकचं प्रदर्शन! प्रिंटर, बिगूल, मिक्सर, साधासा मोबाइल फोन, यंत्रांचे किंवा नेहमीच्या घरगुती वस्तूंचे अनेक भाग, हे सारं या प्रदर्शनात असेल. यापैकी अनेक वस्तूंमधून आवाजसुद्धा येत आहेत. त्यामुळे प्रदर्शन ‘गजबजलं’ आहे! प्रत्येक वस्तू ‘चांगली दिसण्या’च्या पलीकडे जाऊन काही तरी काम करते आहे आणि तिचं ते निरुद्देश काम आणखी कोणत्या तरी वस्तूच्या आणखीच निराळ्या कामाशी जोडलं गेलं आहे. असंबद्ध जगण्यातही जशी सुसंगती भासते, तसंच हेही.

दक्षिण मुंबईतल्या अनेक गॅलऱ्यांनी एकत्र येण्यातून अशीच असंबद्ध-सुसंगती निर्माण होते. या गॅलऱ्या काही आज पहिल्यांदा एकत्र आल्यात, असंही नाही. सर्व गॅलरीचालकांची एक अनौपचारिक संस्थाच गेली सहा-सात र्वष कार्यरत आहे आणि ‘मुंबई गॅलरी वीकएण्ड’ हा उपक्रमदेखील गेली तीन र्वष होतो आहे. यंदा या उपक्रमानं माणसं जोडण्यावर जास्त भर दिला, इतकंच. ‘माणसं जोडण्यावर भर’ दिल्याची यंदा स्पष्टपणे दिसणारी खूण म्हणजे, शनिवारी होणारे ‘वॉक थ्रू!’

‘वॉक थ्रू’ म्हणजे कुणा माहीतगारानं बाकीच्यांना घडवलेली प्रदर्शनाची सैर. प्रत्येक चित्राचा ‘अर्थ सांगण्या’ची अपेक्षा अशा वॉक थ्रूंमुळे कधीही पूर्ण होत नसतेच; कारण प्रत्येक चित्राला दोन-तीन शब्दांत ते पाच-दहा वाक्यांत सांगितला जाऊ शकणारा ‘अर्थ’ असायला हवा, ही अपेक्षादेखील दृश्यकलांच्या क्षेत्रामध्ये मुळातूनच परकी आणि उपरी असते. यावर कुणी म्हणेल : म्हणजे चित्रं बघून काही विचारच नाही करायचा? काय चित्रामागे काही विचार असेल, असं समजायचंच नाही? तो कलाकृतीमागचा विचार समजूनच घ्यायचा नाही?

प्रदर्शनाची सैर घडवून आणणारे जर तयारीनं आलेले असतील, तर नेमक्या याच साऱ्या प्रश्नांची छान सकारात्मक उत्तरं अगदी नवख्या प्रेक्षकालासुद्धा मिळू शकतात. उदाहरणार्थ, कौशिक मुखोपाध्याय स्वत:च आपल्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना फिरवेल, तेव्हा संधी पाहून त्याला, ‘‘तुम्हाला कधी साधी नेहमीसारखी चित्रं काढावीशी वाटलीच नाहीत का हो? ती वाट सोडून देण्यामागचा विचार काय?’’ असासुद्धा प्रश्न विचारता येईल.. किंवा खरं तर, सैर घडवण्यास सुरुवात करतानाच त्यानं नेमक्या या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलेलं असेल! त्या अर्थानं, ‘वॉक थ्रू’ हा शैक्षणिक अनुभवसुद्धा ठरू शकतो.

येत्या शनिवारच्या सकाळी १०.३० वाजता कुलाबा फायर ब्रिगेडजवळच्या ‘मुकेश मिलच्या गल्ली’त, ‘बीएमपी बिल्डिंग’मधल्या गोदामवजा ‘प्रोजेक्ट ८८’ या गॅलरीत गॅलरी-संचालिका श्री गोस्वामी, सकाळीच ११.१५ वाजता कुलाब्यातच रेडिओ क्लबच्या रस्त्यावरल्या ‘ग्रँट बिल्डिंग’च्या दुसऱ्या मजल्यावर ‘लकीरें’ गॅलरीच्या संचालिका आर्शिया लोखंडवाला, १२.१५ वाजता ‘चटर्जी अ‍ॅण्ड लाल’मध्ये (ही गॅलरी ‘लकीरें’च्या जरा पुढे, ‘कमल मॅन्शन’मध्ये तिसऱ्या कमानीखालचा एकच जिना चढल्यावर लागते) दृश्यकलावंत कौशिक मुखोपाध्याय, तिथून गेटवेच्या दिशेला जर आतल्या ‘मेरीवेदर रोड’ या रस्त्यावरून गेलं तर ‘चर्चिल चेम्बर्स’ या इमारतीत असणाऱ्या ‘आकारा आर्ट’ या गॅलरीत दुपारी दोन वाजता कलासमीक्षक आणि प्रदर्शन-नियोजक गिरीश शहाणे.. लगेच २.४५ वाजता ‘गॅलेरी मीरचंदानी + स्टाइनऱ्यूक’मध्ये गीव्ह पटेल यांच्या प्रदर्शनाबद्दल गॅलरीच्या एक संचालिका रंजना.. मग ४.१५ वाजता हुतात्मा चौकानजीक, खादी भांडारच्या मागे असलेल्या ‘केमोल्ड प्रीस्कॉट रोड’ या गॅलरीत प्रदर्शन-नियोजक माया कोवोस्काया.. अशी माहीतगार मंडळी प्रदर्शनांची सैर घडवणार आहेत.

नवख्यांनाही निमंत्रण, हे शनिवारच्या या कार्यक्रमाचं वैशिष्टय़. कौशिक मुखोपाध्यायचं कामदेखील असंच, नवख्यांना खास निमंत्रण देणारं आहे.. ‘चित्रकलेतलं काही कळत नाही बॉ’ म्हणा खुशाल; पण कौशिकनं मांडलेल्या वस्तू पाहून निराळा अनुभव मिळतोय की नाही ते तरी स्वत:लाच विचारून पाहा की प्रांजळपणे!

Story img Loader