कुलाबा बस स्थानकाच्या जरा पुढे, दोन मोठय़ा रस्त्यांना जोडणाऱ्या एका लहानशा गल्लीत गोव्यातल्या घरासारखी रंगवलेली ‘अ‍ॅडमिरल्टी बिल्डिंग’ आहे.. तिथंच ‘आर्ट म्यूसिंग्ज’ ही एकमजली गॅलरी. बैजू पार्थन यांचं नवं चित्रप्रदर्शन जर ‘जहांगीर’ मध्ये दोन आठवडय़ांपूर्वी लागलं होतं, ते तिथं पाहाता आलं नसल्यास (किंवा दुसऱ्यांदा पाहायचं असल्यास) आर्ट म्यूसिंग्जमध्ये जाणं आवश्यकच.

बैजू हे पन्नाशीपार असूनही ‘तरुण’ वाटणारे चित्रकार. त्यांच्या चित्रांमधला आशय ज्ञात आणि अज्ञात यांच्या सीमांवर घुटमळणारा असतो, पण तरीही ही चित्रं ‘वाचता’ येतात! हो, चित्रातल्या बहुतेक प्रमुख प्रतिमा अगदी सहजपणे कळतात. त्या प्रतिमा तंत्रशुद्ध, कौशल्यपूर्णरीत्या तुमच्यासमोर आल्यामुळे तुम्ही काहीसे खूषही होता.. दाद देण्याच्या पवित्र्यात असता.. पण एकेका चित्राचा आशय उमगण्यासाठी प्रयत्न करावाच लागणार असतो. हा आशय ज्याला-त्याला ज्याच्या-त्याच्या दृष्टिकोनानुसारच उलगडला तरीही हरकत नाही, इतपत स्वातंत्र्य बैजू पार्थन यांनी दिलेलं आहे. त्यांच्या रंगचित्रांत (कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक रंग) गणित, रसायनशास्त्र, संगणकविज्ञान, मानसशास्त्र अशा विविध अभ्यासशाखांतली चिन्हं ‘उपप्रतिमा’ म्हणून आलेली दिसतात. मुख्य प्रतिमा असेल एखाद्या पेअरसारख्या फळाची किंवा पाठमोऱ्या पुरुषाची, सिंह, ससे आदी प्राण्यांची; परंतु आशयाकडे जाण्यासाठी उपप्रतिमाच अधिक उपयोगी पडणार आहेत. उदाहरणार्थ ‘एंजिनिअर्ड फ्रूट’ नावाच्या चित्रात मोठ्ठं पेअर फळ दिसतं आहे. ते जणू जाळीसारख्या कवचात बंद आहे आणि त्याच्या आत गराऐवजी काळाकुट्ट अंधार असून त्यातून कसाबसा इंग्रजी ‘झीरो’चा संगणकीय आकार दिसतो आहे. यातलं फळ ओळखता येतं, पण ती जाळी हे आजच्या संगणकीय जालाचं प्रतीकच आहे, याची खातरजमा अगदी लहानशा उपप्रतिमेतून होते. ही आहेत संगणकातल्या खेळातली किंवा व्हीडिओ-गेममधली भुतं! अंगुस्तानासारख्या आकाराची, गट्टाण्या डोळय़ांची ही भुतं ज्या प्रतिमासृष्टीतल्या ‘असत्’चं प्रतीक आहेत ती प्रतिमासृष्टी संगणकीय, म्हणून ती जाळी संगणकीय जालासारखी असा उलटा प्रवास करत आपण बैजू पार्थन यांना काही म्हणायचं आहे का, इथवर पोहोचतो. त्या फळाच्या आकाराचं एखाद्या गूढ दैवतासारखं प्रचंड-व्यापक आकाराचं अस्तित्व चित्रातून ठसतं आहे.. असा सगळा निरीक्षणं-निष्कर्षांचा खेळ खेळत आपण आपल्या साध्याशाच – ‘संगणक-जालात धोके असले, तरी ज्याला शरण जावं, जे टाळता न यावं, असं काहीतरी ते आहे.. जणू आदम आणि हव्वेच्या प्रतिबंधित फळाइतकंच अटळ’ – अशा काहीशा आशयापर्यंत येऊन समजा पोहोचलो, तरी तो ‘आपल्याला समजलेला’ आशय, हे पक्कं लक्षात असू दे!

दुसरा मार्ग आहे तो आशयाचा सध्या विचारच न करता नुसतंच चित्रकौशल्य पाहण्याचा. ‘थ्रीडी अ‍ॅनिमेशन’ तंत्रानं केलेली विविध आकारांची लेंटिक्युलर (त्रिमित आणि आपल्या हालचालीनुसार दृश्यबदल दाखवणारी) कामं इथं आहेत, ती आशयपूर्ण असूनसुद्धा रंजकतेत अजिबात कमी नाहीत.. अगदी चारपाच वर्षांच्या बालकाला या चित्रांसमोर नेलं, तरी पाहण्याचा अनुभव म्हणून त्यांच्या लक्षात राहातील, अशीच ही त्रिमित कामं आहेत. त्यांचा आशय मुंबईसह सर्वच शहरांमधल्या हिंसेशी, माहिती-महाजाल आणि समाजमाध्यमांतून आपल्याला आपल्याच भावनांच्या अभिव्यक्क्तीची गाजरं दाखवून आपल्याच माहितीची जी सौदेबाजी आपल्या नकळत होते त्या प्रकारांशी संबंधित आहे, हे नाही लक्षात आलं तरी चित्रं रंजकच! मुंबईतल्या कामगारवस्तीवर घोंघावणारी विमानं, खालच्या भागात एक स्कूटर, असं एक चित्र आहे. ती विमानं कामगारवर्गीयांच्या आर्थिक विस्थापनाची की आणखी कसल्या दहशतीची? स्कूटर ‘नेहमीची’ की १२ मार्च १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेत वापरल्या गेल्या तशी? हे प्रश्नच न पडतासुद्धा आपण त्या विमानांची ‘लोभस’ हालचार पाहू शकतो!

अशा आबालवृद्धांना आणि मुख्य म्हणजे विविध बुद्धय़ांकांच्या लोकांना पाहायला आवडू शकणाऱ्या दृश्यकलाकृती सहसा कमी असतात, म्हणून हे प्रदर्शन महत्त्वाचं आहे.

Story img Loader