‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शब्दच्छल
कलेला राजाश्रय हवा ही अपेक्षाच चुकीची आहे.. त्याऐवजी ‘राज्यपुरस्कृत’ कला असा शब्दप्रयोग मला योग्य वाटतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी मुंबईत, सुमारे ५०० हून अधिक चित्रकार-शिल्पकारांपुढे ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या कलाभवन-उद्घाटनप्रसंगी काढले खरे, पण या कलाकारांच्या ज्या सामूहिक अपेक्षा आशियातील या सर्वात जुन्या कलासंस्थेचे अध्यक्ष वासुदेव कामत यांनी ‘कलेचा राजाश्रय चालू राहावा’ म्हणून मांडल्या होत्या, त्यापैकी एकाही अपेक्षेला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ची वास्तू दोन दशकांच्या रखडपट्टीनंतर पूर्ण झाल्याचा आनंद या सोहळ्यासाठी आलेले राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सांस्कृतिक कार्य व उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे या साऱ्यांसह उपस्थित कलावंतांनाही होताच, त्या भरात मोदी यांच्या भाषणाला उत्फुल्ल दाद मात्र मिळाली. ‘कलेला राजाश्रय मिळतो, ही भारतीय परंपरा आहे’ असे सांगून, वांद्रे रेक्लमेशन येथील १३०० चौरस मीटरच्या भूखंडाशेजारचा भूखंडही ‘शिल्प-कौशल्य संकुल’ उभारण्यासाठी सरकारकडून मिळावा, केंद्रीय ललित कला अकादमीची शाखा महाराष्ट्रात असावी यांसारख्या सहा मागण्यांचा पाढाच चित्र-शिल्पकारांच्या या १२७ वर्षे जुन्या संस्थेचे अध्यक्ष वासुदेव कामत यांनी पंतप्रधानांपुढे वाचला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शेजारील भूखंडासाठी आम्ही सहकार्य करू असे सांगितले; पण पंतप्रधानांनी एकाही मागणीकडे न पाहता हिंदू मंदिरांत कलेला दिलेले महत्त्व, गणेश-प्रतिमेची अब्जावधी रूपे, आध्यात्मिकतेप्रमाणेच कलेतही ‘आधी उगम, मग साधना आणि मग प्रचीती’ असा असलेला क्रम.. अशा मुद्दय़ांवर भाषणाचा भर ठेवला. कला राज्यपुरस्कृत असावी असे ते म्हणाले. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ‘राज्य कला प्रदर्शना’त युवा चित्रकारांच्या पुरस्कारांची रक्कम यंदापासून दुप्पट (पाचऐवजी १० हजार रु.) करण्याच्या निर्णयाची माहिती आपणहून दिली.
महाराष्ट्र व पश्चिम भारतातील ब्रिटिशकालीन व आधुनिक कलेचा इतिहास मांडणारे प्रदर्शन नव्या भवनातील तीन दालनांत भरले आहे. तेथे पंतप्रधानांनी १५ मिनिटे व्यतीत केली व प्रदर्शन-पुस्तिकेसह, सुहास बहुळकर यांनी सिद्ध केलेल्या या संस्थेचा इतिहास मांडणाऱ्या छोटेखानी चित्रसंग्रहाचे प्रकाशन पंतप्रधानांनी केले. त्याहीपेक्षा मोठे प्रदर्शन मुंबईतील ‘राष्ट्रीय आधुनिक कलादालना’त (एनजीएमए) जानेवारी २०१७ मध्ये भरणार असून ते देशातील चार महानगरांत नेण्यासाठी तरी सरकारने मदत करावी, अशी सोसायटीची एक मागणी होती. त्याबद्दल सर्वानीच मौन पाळले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा