‘रोगापहारि विज्ञान लोककल्याण साधनम’ म्हणजे व्याधींवर विजय मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे विज्ञान. हेच ब्रीदवाक्य घेऊन देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून प्रसिद्ध असलेली हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था वाटचाल करीत आहे. पारंपरिक औषधप्रणाली, आयुर्वेद, होमिओपॅथी यांची प्रगत विज्ञानक्षेत्राशी सांगड घालून संशोधन करणारी संस्था असा हाफकिनचा लौकिक आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेली हाफकिन संस्था १२०व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने..
जीवशास्त्रीय आणि लस संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे नाव असलेल्या हाफकिन संस्थेच्या वास्तूलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. संशोधनात्मक संस्था म्हणून या संस्थेची जडणघडण होण्यापूर्वीची गोष्ट. परळच्या ज्या भूखंडावर संस्था उभी आहे तिथे सहाव्या शतकात परळी वैजनाथाचे पुरातन मंदिर होते. ब्रिटिशांच्या आगमनानंतर या ठिकाणी १५९६ साली रोमन प्रार्थनास्थळ उभारण्यात आले. १७१९ साली या ठिकाणी ब्रिटिश गव्हर्नरकरिता गव्हर्न्मेंट हाऊस बांधले गेले. पुढील काळात १८८५ साली बॉम्बे प्रेसिडेन्सीचे अभिलेख भवन, १८९९ साली प्लेग संशोधन प्रयोगशाळा, १९०६ साली बॉम्बे अणुजीवशास्त्र प्रयोगशाळा असा या संस्थेचा प्रवास झाला. अखेर १९२५ साली हाफकिन संस्था या जागेवर नावारूपास आली. सहाव्या शतकात सोमवंशी, पंचकळशी समुदायाची परळ येथे वसाहत होती. या समुदायाने राजाच्या आज्ञेनुसार या परिसरात तीन मंदिरे बांधली. मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्याची धारणा असल्याने परळी येथील १२ ज्योतिर्लिगाएवढेच या मंदिरांना महत्त्व होते. त्यामुळे या गावाला परळ असे नाव पडले. सध्या सहाव्या शतकातील ही पाषाणाची मूर्ती हाफकिन संस्थेच्या जवळ बारादेवी येथील मंदिरात ठेवण्यात आली आहे.
हाफकिन संस्थेचे नाव ज्या तज्ज्ञ संशोधकांच्या नावे देण्यात आले आहे ते डॉ. वाल्देमार हाफकिन मार्च १८९३ला भारतात आले. कॉलरा प्रतिबंधक लस बनविण्यात हाफकिन यांना यश मिळाल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना भारतात पाचारण केले. कोलकात्यात कॉलरा लसीकरणाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने ते पुन्हा युरोपला परतले. त्यानंतर १८९६ साली डॉ. हाफकिन पुन्हा भारतात आले. यावेळी प्लेगची साथ असल्याने त्यांनी मुंबईत संशोधनाला सुरुवात केली. १० जानेवारी, १८९७ रोजी त्यांनी प्लेगची लस स्वत: ला टोचून तिची सुरक्षितता सिद्ध केली. त्यानंतर भायखळा तुरुंगातील कैदी, अनेक स्वयंसेवक व इतर लोकांना ही लस टोचून घेऊन प्लेग रोगापासून संरक्षण मिळविले. १८९९ साली मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सॅन्डहर्स्ट यांनी परळच्या राजभवनाची जागा प्लेग संशोधन प्रयोगशाळेसाठी हाफकिन यांना देऊन संचालकपदी त्यांची नेमणूक केली. १० ऑगस्ट रोजी हाफकिन यांनी या जागेत प्रयोगशाळा स्थापित करून लसीचे उत्पादन सुरू केले. १९३० साली हाफकिन यांच्या मृत्यूनंतर प्रयोगशाळेला हाफकिन यांचे नाव देण्यात आले. तेव्हापासून ती याच नावाने ओळखली जात आहे.
हाफकिन संस्थेने आजपर्यंत कॉलरा, रेबीज, सर्पदंश, विंचूदंश अशा अनेक रोगप्रतिबंधक लसी शोधून काढल्या आहेत. तसेच देशातील पहिल्या सर्पालयाची निर्मिती याच संस्थेमध्ये १९४० साली करण्यात आली. या सर्पालयाचा उपयोग संशोधनात्मक बाबींसाठी करण्यात आल्याने ते सामान्यांकरिता खुले नाही. मात्र संस्थेची ऐतिहासिक वास्तू आणि येथील वस्तुसंग्रहालय पाहता येते. त्याकरिता कायम येथे विद्यार्थ्यांची गर्दी असते. देशात दरवर्षी सुमारे तीन लाख लोकांना सर्पदंश होतो. त्यातील निम्या व्यक्तींचा मृत्य तर अर्ध्याहून अधिक लोकांना गंभीर दुखापत होते. यात संस्थेत उभारले जाणारे ‘राष्ट्रीय सर्पविष संशोधन केंद्र’ महत्त्वाची जबाबदारी पार पडणार आहे. केवळ सर्पदंशावरील औषधांपुरतेच मर्यादित न राहता हाफकिन संस्थेमध्ये वेगवेगळ्या रोगांच्या लसींवर संशोधन, प्रशिक्षण आणि परीक्षण सुरू असते. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, हिवताप, क्षयरोग, कर्करोग आणि एड्ससारख्या रोगांवर निदान आणि उपचार या विषयावर हाफकिनमध्ये संशोधन केले जाते. तसेच संशोधनावर सीमित न राहता या ठिकाणी विद्यार्थ्यांना पीएचडी, एमएससी करता येते. १९३४ साली हाफकिनमधून एका विद्यार्थ्यांने पीएचडी केल्याची नोंद आहे. भारत पोलिओमुक्त करण्यात हाफकिन संस्थेने मोलाची भूमिका बजावली असून इथे तयार होणारी लस ४५ देशांना पुरविण्यात आली आहे. संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र सरकारने शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी एक समिती नेमली होती. काही दिवसांपूर्वी समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे. तसेच हाफकिन औषध निर्माण महामंडळासाठी विविध जीवरक्षक लस व औषध निर्मितीसाठी राज्य शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याअंतर्गत हाफकिन प्रशिक्षण संशोधन आणि चाचणी संस्थेसाठी अत्याधुनिक अशी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.