उपनगरीय रेल्वेच नाही, तर देशभरातील कोणत्याही कोपऱ्यातील रेल्वे सुरळीत चालू राहावी, यासाठी रुळांवर घाम गाळून काम करणारा एक वर्ग रेल्वेत नोकरीला आहे. साधारणपणे या वर्गाला गँगमन म्हणूनच ओळखलं जातं. पण त्यातही अनेक प्रकार असतात..

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेमार्गावर दर दिवशी तीन हजारांहून अधिक फेऱ्या चालवल्या जातात. त्याशिवाय मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईबाहेर जाणाऱ्या दीडशेपेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या गाडय़ाही याच मार्गावर धावतात. त्यामुळे मुंबईतील रुळांवर प्रचंड ताण पडतो, यात वाद नाही. हा ताण हलका करण्यासाठी दर रात्री आणि रविवारी विशेष ब्लॉकही घेतले जातात. या ब्लॉकदरम्यान रेल्वे रूळ, त्याखालील खडी, स्लीपर, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आदी सगळ्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. ही देखभालदुरुस्ती करण्यासाठी रेल्वेकडे असलेले मनुष्यबळ कमी आहे, अशी तक्रारही नेहमीच होत असते. पण अपुऱ्या मनुष्यबळातही रेल्वेची देखभालदुरुस्ती योग्य पद्धतीने करण्यासाठी ही माणसे झटत असतात.

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

साधारणपणे सामान्य प्रवाशांना रुळांवर काम करणारी ही माणसे गँगमन या नावाने माहीत असतात. पण या गँगमनव्यतिरिक्तही अनेक नावांनी ही माणसे ओळखली जातात. त्यात गँगमन, पॉइंट्समन, की-मन, खलासी, अशा अनेक पदांचा समावेश असतो. रेल्वेसारख्या संस्थेतील उतरत्या भाजणीतील ही शेवटची फळी! पण या शेवटच्या फळीवरच रेल्वेची पूर्ण मदार आहे. वास्तविक ही फळी हाच रेल्वेचा कणा आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, तरी या फळीचे महत्त्व कमी झालेले नाही. आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांकडेही तंत्रज्ञान आल्यानंतर गुप्तहेरांचे महत्त्व काही काळ कमी झाले होते. पण प्रत्यक्ष दुसऱ्या देशात जाऊन हेरगिरी करून मिळवलेली माहिती ही एखाद्या उपग्रहाच्या छायाचित्रांमधून मिळणाऱ्या माहितीपेक्षा किती तरी पटींनी जास्त महत्त्वाची असते, हे हळूहळू लोकांना कळायला लागले. गुप्तचर यंत्रणांमधील गुप्तहेराचे महत्त्व जेवढे आहे, तेवढेच महत्त्व या रुळांवरील माणसांना आहे.

या रुळांवरील माणसांमध्ये सर्वात महत्त्वाचा माणूस म्हणजे गँगमन! रुळांवर कोणतेही काम चालले असले, तरी या माणसांची गँग तिथे असतेच. स्लीपर बदलण्यापासून रूळ बदलण्यापर्यंत किंवा खडी साफ करण्यापासून ते रुळांचे सांधे जोडण्यापर्यंत अनेक कामे या गँगमनना करावी लागतात. याआधी याच सदरात दिल्याप्रमाणे कामाच्या गरजेनुसार गँगमधील लोकांची संख्या किमान २० ते कमाल ४५ पर्यंत असू शकते. त्यात चार माणसे काम चालू असलेल्या भागांच्या दोन टोकांना थोडय़ा थोडय़ा अंतरावर शिटय़ा घेऊन उभी असतात. ही माणसे येणाऱ्या गाडीबद्दल आपल्या गँगमधील इतर कामगारांना सूचना देत असतात.

गँगमनबरोबरच रुळांवर काम करणाऱ्यांमध्ये पॉइंट्समेन आणि की-मन या दोघांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रूळ एकमेकांना छेदतात, अशा ठिकाणी असलेल्या पॉइंटमध्ये काही बिघाड झाल्यास हे पॉइंट्समन तातडीने या ठिकाणी जातात. सिग्नल आणि रूळ या दोन्ही यंत्रणांसाठी पॉइंट क्लीअर असणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे पॉइंटमध्ये बिघाड झाला की, या पॉइंट्समनला धावावेच लागते.

गाडीतून जाताना खिडकीत किंवा दरवाजात उभे असताना किंवा प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी उभे असताना रुळांमधून दोघादोघांच्या जोडीने चालणारे आणि लाल डगला घातलेले रेल्वेचे कामगार अनेकांनी पाहिले असतील. रेल्वेच्या भाषेत यांना की-मेन म्हणतात. त्यांना ठरवून दिलेल्या सेक्शनमध्ये की-मेन गस्त घालत असतात. त्यांच्याकडे पाना, एक मोठा हातोडा अशी अवजारे असतात. स्लीपर आणि रूळ यांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवणाऱ्या फिशप्लेट्स आणि कीज् यांची तपासणी करणे अत्यावश्यक असते. हे काम की-मेन करीत असतात. या कीज् अनेकदा त्यांच्या जागेवरून निसटल्या असतात. कधी कधी त्या सैल होतात. रुळांच्या बाजूला पडलेल्या या चाव्या फिशप्लेट्समध्ये टाकून त्या हातोडय़ाने घट्ट बसवणे हे काम सातत्याने त्यांना करावे लागते. त्यांच्याकडील पोतडीत चामडे किंवा रबराच्या पट्टय़ा असतात. या चाव्या घट्ट बसाव्यात यासाठी या पट्टय़ा फिशप्लेट्सखाली लावल्या जातात.

ही माणसं उन्हातान्हात, पाऊसवाऱ्यात दर दिवशी त्यांना दिलेल्या सेक्शनमध्ये रुळांवर न चुकता चालत असतात. रुळांवर उन्हात किंवा पावसात चालणे ही गोष्ट किती कठीण आहे, हे ती करणाऱ्यांनाच ठाऊक! बरे, हे नुसतेच चालणे नसते. रुळांवर दिसणाऱ्या कोणत्याही अनियमित गोष्टीकडे त्यांना लक्ष द्यावे लागते.

ही माणसे रेल्वेचा कणा आहेत, असे वारंवार बोलले जाते. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवर अनेक ठिकाणी रुळांवर रुळाचे तुकडे, ओव्हरहेड वायरचे खांब वगैरे टाकून दुर्घटना घडवण्याचे प्रयत्न झाले होते. हे प्रयत्न या रुळांवरील माणसांमुळेच टळले होते. मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद एकदा जाहीरपणे म्हणाले होते की, तंत्रज्ञान कितीही विकसित झाले, तरी गस्तीवर असलेल्या गँगमनसारखी माहिती दुसरे कोणीच देऊ  शकत नाही. त्यामुळे त्यांनी या गँगमनच्या गस्तीही वाढवल्या होत्या.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही या गँगमनच्या उपयुक्ततेबद्दल नेहमीच गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. असे असूनही कमी असलेली गँगमनची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्याकडूनही काहीच भरीव झालेले नाही. नुकतेच रेल्वेमंत्र्यांनी मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी रेल्वेमार्गावरील घातपात रोखण्यासाठी जीपीएससारख्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. उपग्रहांद्वारे रुळांवर लक्ष ठेवता येईल, पण रुळांमध्ये काही गडबड असेल, तर ती तातडीने दुरुस्त करून रेल्वेमार्ग गाडय़ांसाठी तयार ठेवण्याचे काम उपग्रहांना करता येणारे नाही. त्यासाठी ही रुळांवरील माणसेच लागतील.

तुमच्या-आमच्या जीवनाशी निगडित असलेल्या, नव्हे, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या रेल्वेला चालती ठेवण्यासाठी ही रुळांवरील माणसे घाम गाळत असतात. रापलेला चेहरा, कपाळावरून कानशिलांमागे सरकणारी घामाची धार, अवजारे हाताळून हातांना पडलेले घट्टे, अशा अवतारात असलेली ही माणसे साधारण सारखीच दिसतात. विंदा करंदीकरांच्या ‘स्वेदगंगा’ कवितेतील हा ‘स्वेदबिंदू’ कोणाच्या खिजगणतीतही नसतो. तो आपला मुकाटय़ाने जीवनवाहिनी वाहती ठेवण्यासाठी रुळांवर फिरत असतो..

रोहन टिल्लू @rohantillu

 tohan.tillu@expressindia.com

Story img Loader