मराठी विज्ञान परिषद

समाज आणि वैज्ञानिक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच मराठी भाषा आणि मराठी भाषिक अधिक संपन्न होणार हे मार्गदर्शक तत्त्व डोळ्यांसमोर ठेवून पाच दशकांहून अधिक काळ विज्ञान प्रबोधनाचे व्रत घेऊन कार्यरत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेला यंदाचा कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्या निमित्ताने..

वैज्ञानिकांनी समाजभिमुख व्हावे आणि समाजाने विज्ञानमुख व्हावे ही काळाची गरज ओळखून मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करत असल्याची घोषणा परिषदेचे पहिले अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रामचंद्र साठे आणि कार्यवाह मधुकर गोगटे यांनी २४ एप्रिल १९६६ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या वास्तूमध्ये जाहीर सभा भरवून केली आणि इथूनच परिषदेचा विज्ञान प्रबोधनाचा प्रवास सुरू झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत भरारी घेण्याची पहिल्या टप्प्यात असताना, शतकानुशतके रूढी, परंपरांचा पगडा असलेल्या समाजात आधुनिक विज्ञान विचारसरणी रुजवण्यासाठी आणि विज्ञानाचे बहुतांश संदर्भ, माहिती ही इंग्रजीत उपलब्ध असल्याने केवळ भाषेच्या अडसरतेमुळे मराठी भाषिक विज्ञानापासून दुरावला जाऊ नये, यासाठी विज्ञानाचा प्रसार मराठीतून करणारी मराठी विज्ञान परिषद ही एकमेव संस्था गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ सातत्याने कार्यरत आहे.

एकेकाळी नायगावच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आठवडय़ाचा एक दिवस संध्याकाळी तासभर जाऊन कार्यालय चालविणाऱ्या परिषदेचे शीव-चुनाभट्टी येथे दुमजली असे विज्ञान भवन साकारले आहे. पहिल्या वर्षी २,६७४ रुपये जमा आणि ८,१४५ रुपये खर्च असणारी परिषद आता एक कोटी रुपये जमाखर्चापर्यंत येऊन पोहोचली आहे. राज्यभरात ७२ आणि राज्याबाहेर चार असे एकूण ७६ ठिकाणी परिषदेचे विभाग सध्या सुरू आहेत.

परिषदेचे मुखपत्र म्हणून ओळख असलेली पत्रिका ही सर्वदूर ग्रामीण भागातील सभासदांशी संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम ठरले. परिषदेच्या स्थापनेपासून अखंडपणे गेली ५२ वर्षे प्रकाशित होत असलेले हे मासिक या घडीला एकमेव वैज्ञानिक मासिक आहे, असे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप हेर्लेकर मोठय़ा अभिमानाने सांगतात. सुरुवातीला केवळ २५ रुपये वार्षिक वर्गणीतून सुरू झालेले हे मासिक सध्याच्या घडीला २५० रुपये वार्षिक वगर्णीमध्ये उपलब्ध केले जाते. प्रादेशिक वृत्तपत्रांमधून विज्ञानाला दिले जाणारे अपुरे महत्त्व आणि वैज्ञानिक किंवा संशोधकांकडून वापरात असलेली किचकट भाषा यातून मार्ग काढत मराठी जनांना विज्ञानाचे आकलन व्हावे या खटाटोपातून सुरू केलेली ही पत्रिका परिषद आजही आर्थिक तूट असूनही दर महिन्याला नित्यनेमाने छापत आहे.

विज्ञान साहित्यिकांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, नवोदित विज्ञान साहित्यिक निर्माण व्हावेत आणि याद्वारे विज्ञान प्रसाराला गती मिळावी या त्रिसूत्री उद्देशातून साकारलेल्या आणि संपूर्णपणे विज्ञान विषयाला वाहिलेले विज्ञान संमेलन परिषदेने स्थापनेपासूनच भरवण्यास सुरुवात केली. पुढे या संमेलानाचा वाढता पसारा पाहता याचे अधिवेशनात रूपांतरण करण्यात आले. गेल्या ५० वर्षभरात राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्य़ांत अधिवेशन भरवले गेले आहे. संमेलनात परिसंवाद, व्याख्याने, चर्चासत्रे, विज्ञान गप्पा, विज्ञान कथाकथन, प्रदर्शन, शैक्षणिक सहल आदी कार्यक्रमांमधून विज्ञानाशी निगडित विविधांगी विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी तज्ज्ञांकडून मांडण्यात येते.विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी परिषदेने शहरांपासून ते खेडय़ापाडय़ापर्यंत विज्ञान मित्र अभ्यासक्रम, विज्ञान प्रयोग मेळावा, वयात येताना मुलामुलींसाठी, विज्ञान खेळणी शिबिरे, पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा, गणिताविषयी विविध उपक्रम, बाल विज्ञान संमेलन, शालेय बगिचा, विज्ञान शिक्षण संधी आणि व्यवसाय मार्गदर्शन असे नानाविध उपक्रम गरजेनुसार सुरू केले आणि ते टिकवलेही. समाजोपयोगी विज्ञान या संकल्पनेंतर्गत सौर ऊर्जेचा वापर, शहरी शेती, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, निर्धरचुली आदी प्रकल्प संस्थेच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहेत. दैनंदिन समस्या सोडविण्यासाठीही विज्ञान उपयोगात आणून अनेक पर्याय परिषदेने उपलब्ध केले.परिषदेने विज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून पाणी वाचवा-वॉशर बसवा, वीज वाचवा-फ्यूज बसवा असे प्रयोग केले आहेत.

तसेच गळक्या नळांमधून वाया जाणाऱ्या पाण्याचे मूल्यमापन करून आवश्यक तेथे नळ विद्यार्थ्यांनी दुरुस्त केले. पाच वर्षे सातत्याने केलेल्या उपक्रमांमुळे सुमारे ५०० शाळांमध्ये पाण्याबाबत जागरूकता आणण्यात यश आले. या प्रयोगाचे तात्कालिक राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी कौतुकदेखील केले.

विज्ञानाचे प्रतिबिंब मराठी साहित्यामध्ये तोकडय़ा प्रमाणातच आहे. तेव्हा विज्ञान हे नाटक-एकांकिकेच्या माध्यमातूंन मांडले गेले तर अधिक चांगल्यारीतीने समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचू शकते, या उद्देशातून परिषदेने विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची मुभा नसते. प्रयोग केलाच नाही तर त्यामागच्या विज्ञानाचे आकलन कसे होणार? तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन शालेय विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी देण्यासाठी शनिवारी ‘विज्ञानवारी’ नावाचा उपक्रम परिषदेने सुरू केला.

परिषदेच्या विविध भागांमधून सातत्याने होणाऱ्या या उपक्रमांमुळे अगदी जागतिक स्तरावरील संशोधकांपासून ते शेतकरी, साहित्यिक, गृहिणी, विद्यार्थी, युवा असे विज्ञानप्रेमी जोडले गेले. एका अर्थाने परिषद संशोधक आणि समाज यांच्यामधील दुवा बनली आहे.

मराठी विज्ञान परिषदेने लोकांमधील संशोधक वृत्तीला खतपाणी घालण्यात आणि संशोधनाला पूरक वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. परिषदेच्या माध्यमातून संशोधकांची फळी निर्माण व्हावी आणि संधोधन कार्य घडावे, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे. मात्र यासाठी आवश्यक यंत्रणा उभारणे आणि राबविणे लोकांच्या मदतीच्या टेकूवर चालणाऱ्या संस्थेच्या आवाक्याबाहेर आहे. त्यातूनही धडपड करून संस्थेने संशोधनात्मक कार्यास सुरुवात केली असून सध्या दोन विज्ञानप्रेमी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य करत आहेत. संशोधन कार्याला बळ देण्यासाठी परिषदेला आर्थिक पाठबळाची गरज आहे. कालानुरूप मराठी विज्ञान परिषदेने उपक्रमांचे स्वरूप बदलत पाच दशकांहूनही अधिक काळ विज्ञान प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले. पण सध्याच्या डिजिटल इंडियाच्या काळातही जबाबदार व्यक्तींकडून केली जाणारी अशास्त्रीय विज्ञाने, अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार आणि विज्ञानाची केली जाणारी गळचेपी यावरून अजूनही या समाजाला मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान प्रबोधनाची गरज असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

शैलजा तिवले Shailaja486@gmail.com 

Story img Loader