अनिश पाटील
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुणे आयसिस मॉडय़ूल प्रकरणातील संबंधित अनेक संशयितांची राज्यातून धरपकड केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणणाऱ्या तपास यंत्रणा या मॉडय़ुलला नेमके कोणाकडून अर्थसहाय्य होत होते याचीही तपासणी करीत आहेत. घातपाती कारवायांसाठी परदेशातून पाठवण्यात आलेल्या निधीतही दहशतवाद्यांनी अफरातफर केल्याचे अनेक किस्से आहेत.
पुण्यातील येरवडा तुरुंगात ८ जून २०१२ रोजी हत्या झालेला कतिल सिद्धीकी पैशाच्या लालसेपोटीच इंडियन मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला होता. याबाबतची कबुली त्याने महाराष्ट्र दहशवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या चौकशीत दिली होती. यासिन भटकळ त्याच्यावर पैसे खर्च करायचा. भटकळसोबत असताना चांगले खायला मिळायचे म्हणून तो त्याच्यासोबत राहायचा. घातपाती कारवाया करण्यासाठी भटकळने दिलेले एक लाख रुपये कतिलने त्याच्या प्रेयसीवर उडवले होते. दिल्ली जामा मशीद परिसरात २०११ मध्ये झालेला गोळीबार व २०१० मधील चिन्नास्वामी स्टेडियम बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आलेल्या सिद्धीकीने मालकाकडून कामासाठी मिळालेले पैसे प्रेयसीवर उडवले होते. त्यामुळे मालकाने त्याला नोकरीवरून काढून टाकले होते.
हेही वाचा >>> मुंबई: ट्रेलरच्या अपघातामुळे शीव – पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी
इंडियन मुजाहिद्दीनचा त्यावेळचा भारतातील प्रमुख यासिन भटकळ याचीही तीच गत आहे. भटकळला देशात घातपाती कारवाया करण्यासाठी त्यांच्या म्होरक्यांकडून पाकिस्तान व आखाती देशातून हवालामार्फत पैसे यायचे. पण गेल्या दोन दशकात देशभरात झालेल्या बहुसंख्य स्फोटांत सहभाग असलेल्या यासीन भटकळलाही बांधकाम व्यावसायिक होण्याचा मोह आवरता आलेला नाही. त्याने परदेशातून आलेला इंडियन मुजाहिद्दीनचा पैसा काही बांधकामात गुंतवला होता. याचा सुगावा लागलेल्या एटीएसने अधिक खोलात जाऊन तपास केला होता. त्यावेळी नालासोपारा येथील एका बांधकामस्थळी त्याने १४ लाख रुपये गुंतवल्याचे उघडकीस आले होते. याची कल्पना त्याच्या म्होरक्यांनाही नव्हती. त्याच्या म्होरक्यांनी २०१० साली बॉम्बस्फोटांच्या प्रकरणांत देशभरात अटक झालेल्या इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांच्या कायदेशीर खर्चासाठी हे पैसे पाठवले होते. मात्र, यासिनने घोटाळा केला. तरुणांची माथी भडकवणारा यासिन भटकळ स्वत: मात्र त्याच्याच संघटनेतील त्याच्या म्होरक्यांना असा गंडा घालत होता.
हेही वाचा >>> मुंबईत झिकाचा रुग्ण सापडला; चेंबूरमधील सोसायट्यांमध्ये वैद्यकीय तपासणी सुरू
घातपाती कारवायांसाठी मिळालेल्या पैशांचा वैयक्तिक वापर करणाऱ्यांची संख्या कमी नाही. या यादीत पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी एटीएसने अटक केलेल्या मिर्झा हिमायत बेग याचाही समावेश आहे. बेगने स्फोटांपूर्वी श्रीलंकेतील कोलंबोत फैय्याज कागजी व अबू जुंदालकडून दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते, ही माहिती एटीएसने न्यायालयापुढे सादर केली होती. या प्रशिक्षणानंतर भारतात परत आलेल्या बेगला परदेशातून १२.५ लाख रुपये घातपाती कारवायांसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील १० लाख रुपये त्याने ठरल्याप्रमाणे वापरले. पण उर्वरित अडिच लाख रुपये त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही. बेगने या अडिच लाख रुपयांतून वैयक्तिक कर्ज फेडले होते. घातपाती कारवायांसाठी परदेशातून येणाऱ्या पैशांवर हात मारणे इंडियन मुजाहिद्दीनच्या सदस्यांसाठी काही नवीन नाही. हा पैसाही त्यांच्या म्होरक्यांच्याही खिशातून येत नसल्यामुळे त्याचे पुढे काय होते, याचे त्यांनाही काही पडलेले नसते. त्यांना फक्त घातपाती कारवाया करण्यात रस असतो. त्यामुळे भविष्यातही हे प्रकार चालूच राहणार आहेत.