मुंबईचा पाषाणइतिहास
कॉलम्नर बसॉल्ट हे एक भौगोलिक आश्चर्य भाईंदरच्या खाडीमुखाजवळ वसलेल्या उत्तन- डोंगरी परिसरात पाहायला मिळते. उभे कातल्याप्रमाणे दिसणारे असे हे पाषाण आहेत. संपूर्ण डोंगरच उभाच्या उभा एखादी पट्टी घेऊन कापलेल्याप्रमाणे भासमान होते.
पासष्ट दशलक्ष वर्षांपूर्वीच्या झालेल्या ज्वालामुखींच्या महाउद्रेकानंतर मादागास्कर बेटांजवळून पुढे सरकत असताना हजार वर्षांत झालेला दुसरा उद्रेकदेखील काहीशे वर्षांत थंडावला. तेव्हापासून आजवर पुन्हा नवा उद्रेक झालेला नाही. दुसऱ्या उद्रेकानंतरच्या सुमारे सहा लाख वर्षांमध्ये मुंबईवरील हा लाव्हाचा थर मोठय़ा भूस्तरीय हालचाली थांबल्याने अधिकाधिक पक्का होत गेला. अर्थात असे असले तरी तो महाभूखंड महासागरावर तरंगत ईशान्येच्या दिशेने सरकण्याचा प्रवास सुरूच होता.. या प्रवासात सुमारे चाळीस लाख वर्षांपूर्वी भारतीय खंड उत्तर खंडाला येऊन भिडला. या भिडण्याच्या जबरदस्त वेगामुळे अस्तित्वात असलेला तेथिस नावाचा महासागर भूमीच्या पोटात गिळंकृत होत असताना त्यातील गाळ व वाळू वरच्या दिशेने उचलली गेली. तेथिसचा उरलेला अवशेष म्हणजे सध्याचा भूमध्य समुद्र. एखादा कागद दोन्ही बाजूंनी मध्याच्या दिशेने सरकवला असता त्याच्या जशा घडय़ा पडतील तशा घडय़ा असलेला एक महाकाय पर्वत नैसर्गिक उलथापालथीमध्ये वरती आला, त्याचेच नाव हिमालय. हिमालय हा सह्य़ाद्रीपेक्षा उंच असल्याने अनेकदा तो फार प्राचीन असावा, असा (गैर)समज आहे. मात्र हिमालय हा जगातील सर्वात तरुण पर्वत आहे, ही वस्तुस्थिती आहे. तुलनेने सह्य़ाद्री हा आजोबाच ठरावा!
महाज्वालामुखीमधून झालेल्या मुंबईच्या निर्मितीनंतर सर्वदूर सापडणारा सर्वात मोठा पाषाणखंड म्हणजे बसॉल्ट. मुंबईच्या या बसॉल्टचे वय ६५ दशलक्ष वर्षे आहे. पाषाण तयार होत असतानाची आजूबाजूची परिस्थिती आणि वातावरण याचा हवामानशास्त्रीय, रासायनिकादी परिणामांच्या प्रक्रियेत विविध प्रकारच्या पाषाणांची निर्मिती होते. दख्खन पठाराच्या संदर्भात अभ्यास करताना भूगर्भतज्ज्ञांना असे लक्षात आले की, पठाराचा बराचसा भाग क्षितिजरेषेला समांतर असला तरी पनवेलच्या पुढच्या बाजूस पश्चिमेच्या दिशेने त्याला उतार आहे. भूगर्भामध्ये होणाऱ्या हालचालींमुळे पृथ्वीच्या एका बाजूस असा ताण निर्माण होतो तेव्हा तसाच ताण पलीकडच्या बाजूसही निर्माण होतो. म्हणूनच आफ्रिकेमध्ये पूर्वेच्या दिशेने जमिनीला असलेला उतार पाहायला मिळतो.
मुंबईच्या पोटात सापडणारा बसॉल्ट हा अतिसूक्ष्म कणांनी तयार झाला आहे. अलीकडेच मुंबई विद्यापीठामध्ये बहि:शाल शिक्षण विभागातर्फे आयोजित प्रदर्शनात मुंबई मेट्रोच्या कामादरम्यान घेतलेले या बसॉल्टचे विविध नमुने मुंबईकरांना पाहता आले. उत्तर मुंबईमध्ये म्हणजेच खास करून मढ ते गोराई- उत्तन परिसरात महाज्वालामुखीनंतर हजार वर्षांनंतर झालेल्या नव्या उद्रेकातील लाव्हाप्रवाह पाहायला मिळतात. त्यामुळे इथे सापडणारे पाषाण थोडे वेगळे आहेत. ते राखाडी किंवा पिवळसर रंगाचे ट्रॅकाइट आणि ऱ्हायोलाइट आहेत. ऑर्थोक्लेज किंवा प्लॅजियोक्लेज प्रकारची फेल्स्पार खनिजे असलेला तो ट्रॅकाइट आणि क्वाट्र्झ अधिक ऑर्थोक्लेज फेल्स्पार असलेला तो ऱ्हायोलाइट अशी त्याची वर्गवारी केली जाते. ट्रॅकाइट आणि ऱ्हायोलाइट पाषाण आधिक्याने आम्लधर्मी आहेत. हे गेल्या काही लाख वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये झालेले हे रासायनिक बदल असावेत. केवळ तेवढेच नव्हे, तर या पाषाणांची होणारी धूप हीदेखील विविध प्रकारच्या भौगोलिक रचनांसाठी कारणीभूत ठरते.
असेच कॉलम्नर बसॉल्ट हे एक भौगोलिक आश्चर्य भाईंदरच्या खाडीमुखाजवळ वसलेल्या उत्तन- डोंगरी परिसरात पाहायला मिळते. उभे कातल्याप्रमाणे दिसणारे असे हे पाषाण आहेत. संपूर्ण डोंगरच उभाच्या उभा एखादी पट्टी घेऊन कापलेल्याप्रमाणे भासमान होते. अशी भौगोलिक रचना जगात दुर्मीळ मानली जाते. कॉलम्नर बसॉल्ट असलेले ठिकाण नॉर्दन आर्यलड व कॅलिफोर्निआमध्ये संरक्षित घोषित केले आहे, तर आपल्याकडे अगदी अलीकडेपर्यंत उत्तनच्या कॉलम्नर बसॉल्टची खडी करण्याचे काम नित्यनेमाने सुरू होते. हा परिसर वेळीच संरक्षित घोषित होणे महत्त्वाचे आहे.
लाव्हारस थंड होण्याच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या विशिष्ट ताणामुळे हे असे सरळसोट कापल्याप्रमाणे दिसणारे पाषाण तयार होतात, ते वरच्या बाजूने पंचकोनी किंवा अष्टकोनी असतात. लाव्हारसाच्या आडव्या पातळीवर काटकोनात भेगा पडत जातात आणि अशी रचना तयार होते. अशाच प्रकारची कॉलम्नर बसॉल्टची रचना कांदिवली- मालाड पूर्वेस रहेजा टाऊनशिपच्या टेकडीवर पाहाता येते. अंधेरी पश्चिमेस असणारी गिल्बर्ट हिल हीदेखील कॉलम्नर बसॉटच आहे. भाईंदरला उत्तनकिनारी असलेल्या कॉलम्नर बसॉल्टचा वापर वसई किल्ल्याच्या बांधकामासाठी आणि भाईंदरहून थेट गोव्याला नेऊन तोफगोळ्यांच्या निर्मितीसाठी करण्यात आल्याच्या नोंदी आजही पोर्तुगीज दफ्तरात पाहायला मिळतात.
विनायक परब @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com