डॉ. सविता नायक मोहिते लिखित ‘श्याम बेनेगल: एक व्यक्ती… एक दिग्दर्शक’ हे पुस्तक नुकतेच रोहन प्रकाशनने प्रकाशित केले. या पुस्तकातील एका प्रकरणात बेनेगल यांनी आपल्या चित्रपटप्रवासावर भाष्य केले आहे. त्याचा हा संपादित अंश त्यांच्याच शब्दांत…

जाहिरातींतून प्रवेश

मी ‘लिंटास’ या जाहिरातीच्या कंपनीमध्ये दाखल झालो. जी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीशी संलग्न असलेली भारतातील सर्वात जास्त जाहिराती बनवणारी कंपनी होती. माझ्या सुदैवाने त्यांच्या लक्षात आले की, ‘कॉपी रायटिंग’पेक्षा मला चित्रपट-निर्मितीमध्ये अधिक आवड आहे. त्यामुळे त्यांनी मला जाहिरात चित्रफितीच्या सुपरव्हिजनचे काम दिले. पहिल्याच वर्षी मी जवळजवळ ऐंशी जाहिरात चित्रफिती बनवल्या. त्या काळात टेलिव्हिजनचे माध्यम उपलब्ध नसल्यामुळे सर्व जाहिराती, माहितीपट व काही बातमीपत्रे ही सिनेमागृहामध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखवली जात असत…. देशभरातील ग्रामीण भागात या जाहिरातीच्या निमित्ताने आम्ही फिरत असू. त्यावेळी मला खऱ्या अर्थाने आपल्या देशाची ओळख झाली. विविध पातळ्यांवर जाऊन लोकसंपर्काची संधी, त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न, त्यांची ताकद हे सर्व जवळून अनुभवता आले.

veteran filmmaker shyam benegal pioneer of parallel cinema in india
‘समांतर’ चळवळीचा शिलेदार
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Image of Shaan's residential building
Singer Shaan : प्रसिद्ध पार्श्वगायक शान राहत असलेल्या निवासी इमारतीला आग, ८० वर्षांची महिला गंभीर

देशाला जाणून घेण्याचा प्रवास

… आपल्या देशाबद्दल, आपले लोक, त्यांच्या क्षमता, त्यांची दुर्बलता, त्यांची ताकद या सर्वांबद्दल खोल जाणीव निर्माण झाली. त्याचा डॉक्युमेंटरीज करताना खूप फायदा झाला. आपला देश खऱ्या अर्थाने कळला. ग्रामीण भारत, शहरी भारत, आदिवासी भारत या सर्वांचे दर्शन झाले. ज्याप्रमाणे नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’च्या माध्यमातून आपल्या देशाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तसाच काहीसा हा माझ्यासाठीदेखील एक प्रवासच होता… आपल्या देशाला जाणून घेण्याचा! आपल्या देशाला दारिद्र्य, जातीयवाद, वर्ण व वर्गभेद या सर्व गोष्टींनी ग्रासलेलं उघड्या डोळ्यांनी दिसत होतं. त्यामुळे एक चित्रपट निर्माता म्हणून हे विषय माझ्या चित्रपटांमध्ये येणे हे ओघाने आलेच.

‘समांतर’ चळवळीचा शिलेदार

माझा पहिला चित्रपट ‘अंकुर’ हा अस्पृश्यता, जमीनदारी या विषयावर आधारित होता. तो काही प्रचारकी सिनेमा नव्हता. पण ती कथा समाजव्यवस्थेतील भेदावर आधारित होती. तसेच ‘निशांत’ हीदेखील सरंजामशाही विषयावरील कथा होती. आपण त्या व्यवस्थेमध्ये पूर्णत: अडकलेलो होतो.

‘मंथन’ हा सहकाराची ताकद दाखवणारा, सत्य परिस्थितीवर आधारित चित्रपट होता. आपल्या देशाला पुढे जाण्याचा सहकार हा मार्ग असू शकेल, हे सुचवणारी ती कथा आहे. हे सर्व देशाच्या विकासाशी, लोकांच्या प्रश्नाशी भिडलेले विषय होते. याचा अर्थ असा नाही की, मी फक्त समस्यांवर आधारितच चित्रपट बनवू इच्छित होतो. पण ते आपोआपच माझ्या आतमध्ये मुरलेले बाहेर पडत होते, माझ्या कामात प्रतीत होत होते. माझ्याकडून फक्त मनोरंजनात्मक चित्रपट निर्माण होणे त्यामुळे शक्य नव्हते.

स्वत:ची वेगळी ओळख

सत्यजित राय यांचा ‘पाथेर पांचाली’ बघितल्यानंतर मलादेखील माझा आवाज सापडला असे म्हणायला हरकत नाही. कारण चित्रपटनिर्मिती करण्याचे ध्येय असले तरी मला केवळ मनोरंजनात्मक पठडीतील सिनेमा बनवण्यामध्ये अजिबात स्वारस्य नव्हते. मला माझे स्वत:चे असे वेगळे काहीतरी बनवायचे होते, ज्याचा वास्तवाशी संबंध असेल, लोकांच्या खऱ्या आयुष्याच्या धाग्याची ज्यात वीण असेल…

सत्यजित राय यांच्या चित्रपटांची भाषा, त्यांचे व्याकरण हे अतिशय अभिरुची-संपन्न असे. त्यात गरजेच्या पलीकडील जास्तीच्या एकाही शब्दाला जागा नसे. जरी त्यांचे चित्रपट भारतीय संस्कृतीशी जोडलेले होते, तरी त्यांचा अभिनिवेश हा वैश्विक होता. सत्यजित राय यांनी परदेशी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचा बराच अभ्यास केला होता. त्यांच्या कामाने ते अतिशय प्रभावित झालेले होते. तरीही त्यांनी स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली, यातच त्यांचे मोठेपण आहे…

सत्यजित राय यांच्या चित्रपटांनी जरी मी प्रभावित झालो असलो तरी तो अनुभव घेऊन, चित्रपटाचं तंत्रज्ञान आत्मसात करून मला माझी स्वत:ची भाषा, स्वत:चे वेगळेपणाचे विचार मांडण्याचे कौशल्य तयार करणे गरजेचे होते. मला कोणाचेही केवळ अनुकरण करायचे नव्हते. स्वत:चे जगणे, आलेले अनुभव हे प्रत्येकाचे वेगळे असतात. त्याची घुसळण होऊन जे बाहेर निघेल त्यातून स्वत:चा मार्ग शोधणे, स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे क्रमप्राप्त असते.

चित्रपट रंजन करणारा असला पाहिजे

‘कोणीतरी सांगितले म्हणून मी कधीच चित्रपटनिर्मिती केली नाही. कथेची कल्पना, त्यातील सार, त्यातील माणसा-माणसांमधील परस्परसंबंध, त्याची सामाजिक प्रासंगिकता मनाला भिडली तरच मी त्या कलाकृतीत उतरतो, अन्यथा नाही. त्यात भावभावनांचा खेळ हवा. माझ्याप्रमाणेच माझ्या प्रेक्षकांना माझी कथा आपली वाटायला हवी असा माझा प्रयत्न असतो. त्यासाठी मला संगीत, नृत्य आणि गरज पडल्यास नाटय़ वापरण्यास काहीच हरकत नसते. पण त्याचा सत्याशी संबंध असावा. केवळ सवंग करमणुकीसाठी भडक नाट्यमयता मी वापरणार नाही. माझ्या कथेतील प्रत्येक व्यक्तिमत्त्व- मग ते नायक, खलनायक किंवा इतर कोणीही असले तरी माझा त्या प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचाच असतो. आयुष्य किंवा व्यक्ती फक्त कृष्णधवल कधीच नसतात. त्यातील ‘ग्रे शेड्स’ समजावून घेण्यात मला रस आहे. आणि अंतिमत: माझा चित्रपट हा आशावादी विचार मांडत संपावा याबद्दल मी आग्रही असतो. पण हे करत असताना चित्रपट हा रंजन करणारा असलाच पाहिजे, नाहीतर तो माहितीपट होईल.

Story img Loader