जगन्नाथ चाळ

वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून साने गुरुजींपर्यंतच्या अनेक थोर पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जगन्नाथ चाळ म्हणजे अनेक दिग्गजांची कर्मभूमी होती. या चाळीच्या इतिहासात डोकावल्यानंतर हे सारे संदर्भ अंगावर रोमांच आणतात.

ब्रिटिशांच्या गुलामगिरीचे फास देशभरात घट्ट आवळले जात होते. त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिश राजवटीच्या विरोधात असंतोष धगधगू लागला होता. त्याच दरम्यान मुंबईही कात टाकत होती. अनेक नव्या वास्तू उभ्या राहात होत्या. आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच त्यावेळचे व्हिक्टोरिया टर्मिनस आकाराला येत होते. लोकल गाडय़ांसाठी फलाट बांधण्यासाठी अनेक मंडळी राबत होती. त्यापैकीच एक जगन्नाथ सावे. फलाटासाठी मोठय़ा प्रमाणावर बर्माटिकचा वापर करण्यात येत होता. फलाट उभारणी झाल्यानंतर व्यवसायाने सुतार असलेल्या जगन्नाथ सावे यांनी अशाच स्वरूपाचे लाकूड सामान मोठय़ा प्रमाणावर खरेदी केले आणि गिरगावातील फणसवाडीमध्ये जगन्नाथ चाळींची उभारणी केली. जगन्नाथ सावे यांनी एकूण १४ चाळी उभ्या केल्या. काही बैठय़ा, तर काही एक आणि दोन मजली इमारतींचा चाळींमध्ये समावेश आहे. दोन चाळींच्या मध्यभागी अंगण, रहिवाशांना पाण्याचा प्रश्न भेडसावू नये म्हणून विहीर अशी चाळींची रचना. प्रत्येक चाळीतील घराचा आकार निरनिराळा, काही खोल्या लहान, तर काही मोठय़ा. १०८ जगन्नाथ चाळ, ११४ जगन्नाथ चाळ, आणि १२६ जगन्नाथ चाळ या नावाने या चाळी ओळखल्या जाऊ लागल्या. क्रांतिकारक, मुरब्बी समाजसेवक, साहित्यिक, पत्रकार, कलावंत असे निरनिराळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे रहिवासी या चाळीत लहानाचे मोठे झाले.

देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडला होता. त्यामुळे देशभरात ब्रिटिशांविरुद्ध असंतोष खदखदत होता. त्यातूनच अनेक चळवळी उभ्या राहात होत्या. क्रांतिकारक आक्रमक होत होते. मुंबईतही ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठू लागला आणि या चाळींतील काही तरुणांनी या चळवळींमध्ये उडी घेतली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचाराने भारावलेल्या काही तरुणांनी धर्मैक्य संरक्षक संस्था स्थापन केली आणि १८९६ मध्ये जगन्नाथ चाळीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. हा मुंबईमधील तिसरा सार्वजनिक गणेशोत्सव. टिळकांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या गणेशोत्सवात व्याख्यानाच्या माध्यमातून जगजागृतीचा महायज्ञ जगन्नाथ चाळीत सुरू करण्यात आला होता. लोकमान्य टिळक, रा. रा. गजानन भास्कर वैद्य, संत वाङ्मयाचे अभ्यासक ल. रा. पांगारकर, न. चिं. केळकर, रावबहाद्दूर चिंतामणराव वैद्य, नाटय़ाचार्य कृ. प्र. खाडिलकर, संस्कृत पंडित डॉ. बेलवलकर, काशिनाथशास्त्री लेले, ल. ब. भोपटकर, अच्युतराव कोल्हटकर, बॅ. मोहम्मद अली जिना आदी मातब्बर व्यक्तींची व्याख्याने ऐकण्यासाठी चाळीमध्ये प्रचंड गर्दी होत असे. याच चाळीतील रहिवासी भास्कर यज्ञेश्वर खांडेकर आणि नरहरपंत जोशी पदे रचत आणि मेळे सादर करत.

विशेष म्हणजे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके याच चाळीतील रहिवासी. वासुदेव बळवंत फडके यांनी चाळीमध्ये गुप्तपणे क्रांतीची ज्योत पेटविली होती. ब्रिटिशांविरोधात आवाज उठविण्यासाठी ‘क्रांतीच्या मार्गावर’ ही पुस्तिका अत्यंत गुप्तपणे प्रकाशित करण्यात येत होती. ही पुस्तिका जगन्नाथ चाळीमध्ये पोहोचताच बाहेरच्या व्यक्तीला कळणार नाही अशा पद्धतीने घराघरामध्ये तिचे सामुदायिक वाचन करण्यात येत असे. ब्रिटिशांविरोधातील काही गुप्तपत्रांचे घरोघरी वाटपही केले जात होते. देशभरात ब्रिटिशांविरोधात कोणत्या चळवळी सुरू आहेत, क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरोधात केलेल्या कारवायांची इत्थंभूत माहिती चाळीमध्ये पोहोचत होती. राष्ट्र सेवा दलाच्या विचारसरणीची अनेक मंडळी या चाळीत होती. काही तरुण राष्ट्र सेवा दलाच्या शाखांमध्ये नित्यनियमाने जात होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची अनेक मंडळीही याच चाळीत वास्तव्यास होती.

वेदशास्त्रामध्ये पारंगत असलेले कृष्णशास्त्री भाटवडेकर, कवी केशवसूत, प्रख्यात इतिहास संशोधक त्र्यं. शं. शेजवलकर, नटवर्य भाऊराव दातार, ‘केसरी’चे बातमीदार अनंत ऊर्फ दाजीबा पिटकर, गायनाचार्य अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य गणपतराव बेहरे, प्रख्यात हार्मोनिअम वादक पी. मधुकर पेडणेकर अशा  नामवंत व्यक्तींचे या चाळींमध्ये वास्तव्य होते. त्यामुळे जगन्नाथ चाळींना एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.

वामनराव ढवळे हे या चाळीतील आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. प्रसिद्ध साहित्यिकांचा त्यांच्या घरी राबता असायचा. ज्येष्ठ पत्रकार आणि ग्रंथकार त्र्यंबक विष्णू पर्वते याच चाळींमध्ये तरुणांसाठी चर्चा मंडळ चालवीत होते. ज्येष्ठ समाजसेवक साने गुरुजी काही काळ या चाळींमध्ये वास्तव्यास होते. गुरुजींच्या विचाराने प्रेरित झालेले चाळीतील रहिवासी रा. रा. धोंडोपंत सप्रे यांच्या निवासस्थानी साने गुरुजींचे वास्तव्य होते. दुसऱ्या महायुद्धासाठी ब्रिटिशांनी भारतीयांची भरती सुरू करताच महात्मा गांधींनी वध्र्याला वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. त्यावेळी गांधीजींनी पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांचे नाव घोषित केले. त्यानंतरच्या काळात आचार्य विनोबा भावे यांच्याकडे अनेक तरुण आकर्षित झाले. रा. रा. धोंडोपंत सप्रे यांचाही त्यात समावेश होता. अनेक दिग्गज व्यक्तींचा राबता असलेली ही चाळ एक पुराणवास्तू असल्याची आजच्या रहिवाशांची भावना आहे.

काळ बदलला आणि काळाबरोबर चाळीतील परिस्थिती बदलत गेली. गणेशोत्सवाबरोबर नवरात्रोत्सव आणि अन्य उत्सवही मोठय़ा प्रमाणावर साजरे होऊ लागले. आजघडीला व्याख्याने, मेळे, पोवाडे असे कार्यक्रम होत नसले तरी मुलांचा सर्वागीण विकास व्हावा यादृष्टीने चाळींमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. उत्सवांच्या निमित्ताने लहान मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प चाळकऱ्यांनी सोडला आहे. भविष्यात एखादा उत्तम वक्ता, चित्रकार अथवा एखादा क्रीडापटू घडावा यादृष्टीने विविध स्पर्धाचे आयोजनही करण्यात येत आहे. एकेकाळी समाजात आपला ठसा उमटविणारे रहिवासी आज चाळीत नाहीत. पण त्यांच्या आठवणींना आजही जगन्नाथ चाळींमध्ये उजाळा दिला जात आहे.

prasadraokar@gmail.com