कामत चाळ, गिरगाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रांतिकारक आणि समाजसुधारकांच्या वास्तव्यामुळे कामत चाळीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी भारतात वेगाने हालचाली झाल्या होत्या. मुंबईमध्येही चळवळीचे वारे वाहात होते. कामत चाळही स्वातंत्र्य चळवळीचे एक केंद्र बनली होती. स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने गुप्त बैठका, काही क्रांतिकारकांचे जाणे-येणे चाळीत होते. 

ब्रिटिशपूर्व काळात सात बेटांच्या मुंबईत बैलगाडी, घोडागाडी, बग्गी हीच वाहतुकीची मुख्य साधने होती. भारतात ब्रिटिश राजवट सुरू झाली आणि अल्पावधीतच मुंबईत ट्राम धावू लागली. सुरुवातीच्या काळात ट्रामला घोडे जोडलेले असायचे. घोडे ट्राम खेचायचे आणि ट्रामचा प्रवास सुरू व्हायचा. त्यामुळे हळूहळू मुंबईत बैल आणि घोडय़ांची गरज वाढत गेली आणि अल्पावधीतच त्यांची संख्या वाढली. त्यामुळे बेटावर काही ठिकाणी तबेले, गोठे उभे राहिले. या जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आताच्या ठाकूरद्वार परिसरातील स. का. पाटील उद्यानाच्या अलीकडच्या परिसरात समुद्रकिनाऱ्यालगतच हिरवळीचा प्रदेश होता. त्या जागी गाय, बैल, घोडे यांना चरण्यासाठी सोडण्यात येऊ लागले. कालांतराने हा परिसर मोठी चरणी म्हणून ओळखला जाऊ लागला. कालांतराने मुंबईत रेल्वे आली. मोठय़ा चरणीच्या पलीकडून जाणारी झुकझुक गाडी पाहण्यासाठी मुंबईकर गर्दी करीत. गिरगाव परिसरात उभारण्यात आलेले रेल्वे स्थानक चरणीच्या जवळच होते. त्यामुळे या रेल्वे स्थानकाला चर्नी रोड असे नाव देण्यात आले. आजही हे रेल्वे स्थानक चर्नी रोड या नावानेच परिचित आहे.

मुंबईमधील दळणवळणाची साधने बदलत गेली आणि मुंबईमधील वाहतूक गतिमान बनत गेली. घोडागाडी, बैलगाडय़ांचे प्रमाण कमी होत गेले आणि चरणीची गरज जवळजवळ संपुष्टात आली. मुंबईत झपाटय़ाने होत असलेला विकास आणि त्यामुळे निर्माण होणारी रोजगाराची संधी यामुळे गावखेडय़ातील तरुण मोठय़ा संख्येने रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत डेरेदाखल होऊ लागले. या मंडळींच्या निवाऱ्याची गरज लक्षात घेऊन अनेक व्यापारी आणि समाजधुरीणांनी मुंबई बेटावर चाळी उभारायला सुरुवात केली होती. अशीच एक चाळ १८६०च्या दरम्यान मोठय़ा चरणीच्या जागी उभी राहील. कोकण, पुणा आणि आसपासच्या परिसरांतून मुंबईत डेरेदाखल झालेल्या अनेक कुटुंबांनी या एक आणि दुमजली चाळींमध्ये मुक्काम ठोकला.

एका रांगेत एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या सहा कौलारू चाळी. या सहा इमारती टप्प्याटप्प्याने बांधण्यात आल्या असल्या तरी या सर्व मिळून एकच चाळ. काही खोल्या लहान तर काही मोठय़ा, काही चाळीत पहिल्या मजल्यावरील घरांमध्ये पोटमाळे अशी या चाळींची रचना. या इमारती ‘ए’ ते ‘एफ’ या इंग्रजी आद्याक्षराने ओळखल्या जातात. त्या काळी मुंबईत आलेल्या ब्राह्मणांचे ‘ई’ आणि ‘एफ’ इमारतींमध्ये वास्तव्य होते. त्यामुळे ‘ई’ आणि ‘एफ’ या चाळी ‘भटाचा गाळा’ म्हणून परिचित झाल्या. त्यापुढे छोटी अंगणवजा मोकळी जागा. एकेकाळी ही अंगणवजा मोकळी जागा मातीची होती. कालौघात तेथे फरशा बसविण्यात आल्या. रहिवाशांची पाण्याची गरज लक्षात घेऊन चाळीच्या एका कोपऱ्यावर खोदलेली विहीर. चाळीच्या मुख्य आधारासाठी वापरलेले मोठमोठे लाकडाचे खांब आणि लाकडी कठडे यामुळे ही चाळी पटकन नजरेत भरते. अशी ही गिरगावच्या ठाकूरद्वार नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेली कामत चाळ.

क्रांतिकारक आणि समाजसुधारकांच्या वास्तव्यामुळे कामत चाळीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी भारतात वेगाने हालचाली झाल्या होत्या. मुंबईमध्येही चळवळीचे वारे वाहात होते. कामत चाळही स्वातंत्र्य चळवळीचे एक केंद्र बनली होती. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके १८६० ते १८६५ या काळात कामत चाळीत वास्तव्यास होते. तर भारतीयांचा अनन्वित छळ करणाऱ्या वॉल्टर चार्स रॅण्डला यमसदनी पाठविणारे चाफेकर बंधू १८९५ ते १८९६ या काळात कामत चाळीमध्ये राहात होते. स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने गुप्त बैठका, काही क्रांतिकारकांचे जाणे-येणे चाळीत होते. ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी समाजाला एकत्र आणण्याची गरज लक्षात घेऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि लोकमान्यांपासून प्रेरणा घेऊन कामत चाळीमध्ये १८९६ पासून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून कामत चाळीने जनजागृतीचा वसा घेतला होता. दिग्गज नेत्यांची व्याख्याने, कीर्तन, नाटक, मेळे यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत होती. चाळीत सुरू करण्यात आलेला रामदासी मेळा हादेखील चाळकऱ्याचा एक संकल्पच होता. स्वातंत्र्योत्तर काळातही कामत चाळीने कार्यशील तरुणांची परंपरा जपली होती. समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे, कामगार चळवळीतील अग्रणी श्रीपाद अमृत डांगे अशी मान्यवर मंडळींचे या चाळीमध्ये वास्तव्य होते. त्यामुळे मुंबईत संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला आणि कामत चाळीमधून या चळवळीलाही मोठे योगदान मिळाले. या चळवळीदरम्यान चाळीतील महिलांनी आंदोलकांना पोळी-भाजीची रसद पुरविल्याची घटना आजही काही वृद्ध महिला जुन्या आठवणींना उजाळा देताना अभिमानाने सांगतात. केवळ स्वातंत्र्याच्या किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला कामत चाळीने कार्यकर्ते दिले असे नाही. तर अनेक कलावंत आणि अन्य क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटवणारी मंडळीही कामत चाळीत घडली आणि नावारूपाला आली. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प घडविणारे शिल्पकार विष्णू गणेश सहस्रबुद्धे, समाजसुधारक तात्या पणशीकर, रत्नपारखी दत्तात्रय जोशी, रंगभूषाकार अशोक पांगम, मुंबईमधील पहिली मूक-बधिरांची शाळा चालविणारे प्रा. दाते, लेखक-दिग्दर्शक आणि नाटय़ कलावंत देवेंद्र पेम या मंडळींचा

त्यात समावेश आहे. चाळीची ही परंपरा आजची पिढी पुढे घेऊन जात आहे. चाळीचा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी सध्याची तरुण पिढी धडपडत आहे. त्यामुळेच व्रतस्थ तरुणांची चाळ असाच कामत चाळीचा उल्लेख करावा लागेल.

prasadraokar@gmail.com