या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्याचे टाके उसवले असताना बूट-चप्पलांना टाके मारून आपले जगणे सावरणारी बोरिवलीची वीस वर्षांची सुरेखा स्वाभिमानाने उभी आहे. वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यामुळे चर्मकार समाजातील सुरेखाने परंपरागत व्यवसाय हाती घेतला आणि ती कुटुंबाची आधारवड  झाली. परिश्रम, चिकाटी, धर्य आणि जगण्याची दुर्दम्य उमेद. हा सुरेखाच्या जगण्याचा फॉम्र्युला.

भुसावळच्या एका खेडय़ात जन्माला आलेली सुरेखा वडिलांच्या अपघाती निधनानंतर मुंबईत आली. एवढय़ा मोठय़ा विराट आणि गजबजलेल्या शहरात बोरिवली दौलतनगर इथले आत्याचे घर हाच तिचा एकमेव आधार होता. वडिलांचा बोरिवली इथला चाळीस वर्षांचा बूटपॉलिश व्यवसाय पुढे  न्यायचे, असे तिने ठरविले. तिचे वडील चप्पल, बूट शिवण्याचे दुकान चालवत असत. त्यांच्या मृत्यूनंतर बंद पडलेले दुकान सुरेखाने नव्याने सुरू केले. हेतू इतकाच की चार पसे मिळवल्यामुळे भुसावळला राहणाऱ्या आपल्या कुटुंबीयांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. ‘‘माझे बाबा २००१ साली रेल्वे अपघातात जखमी झाले आणि सहा महिन्यांत ते वारले. त्या धक्क्यामुळे माझी आई भ्रमिष्ट झाली. आणि मी आणि माझा धाकटा भाऊ अक्षरश: पोरके झालो. काही दिवस आजीने आमचा सांभाळ केला. परंतु पोटाची आग शमवण्यासाठी मुंबईला जाण्याशिवाय गत्यंतर नाही असे मला वाटले आणि मी मुंबईची वाट धरली. त्यामुळे मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही,’’  असे सुरेखाने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

बोरिवली पश्चिम इथल्या प्रेमनगर परिसरात सुरेखाचे फुटपाथवर एक छोटेखानी दुकान आहे. रस्त्याच्या वळणावर असलेले हे दुकान रंगीबेरंगी चप्पला, बूट आणि मोज्यामुळे लक्ष वेधून घेते. बूट-पॉलिश हा सुरेखाचा हातखंडा विषय आहे, असे तीच गमतीने म्हणते. फाटलेल्या चपलेला चार टाके पटापट घालण्यात ती प्रवीण आहे. ‘‘मी सकाळी आठ वाजता दुकान सुरू करते. लोक ऑफिस आणि व्यवसायासाठी घाईगर्दीत बोरिवली स्टेशनच्या दिशेने पळत असतात. त्यातला एक ‘अगं, जरा बुटाला पॉलिश करून दे’ असं म्हणतो आणि माझे दिवसाचे काम सुरू होते. दिवसभरात अशी पंधरा-वीस माणसं दुकानात आली की मला बरे पसे मिळतात,’’ असे सुरेखा जेव्हा म्हणते तेव्हा तिच्या डोळ्यात निर्धाराची चमक दिसते. सुरेखाला दर महिन्याला तीन-साडेतीन हजारांचे उत्पन्न मिळते. त्यातले काही पसे ती भुसावळला पाठवते. तिने पाठवलेल्या पशांवर तिच्या कुटुंबीयांचा महिन्याभराचा खर्च निघतो, असे ती अभिमानाने सांगते.

सुरेखा जेवणावर फार खर्च करत नाही. ‘‘मी जे काही मिळेल ते खाऊन दिवस काढते. मी चांगलंचुंगलं खाल्लं तर तिथे गावी आई आणि भाऊ काय खात असतील हा विचार माझ्या मनात येतो,’’ असे सांगताना तिचा आवाज कातर होतो. मुलगी असूनही भररस्त्यावर पुरुषांची मक्तेदारी असलेला व्यवसाय चालवताना तिच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न तिला विचारला असता, ‘‘माझ्याकडे धारदार कोयता आहे, हे ती दबक्या आवाजात सांगते.’’ पुरुषी मानसिकतेचा तिला बऱ्याचदा अनुभव येतो. हल्लीच घडलेला प्रसंगाचा ती उल्लेख करते. ‘‘एका सडकछाप तरुणाने माझ्याकडे मोबाइल नंबर मागितला असता, मी प्रसंगावधान राखून माझ्या मोबाइलवरून वडिलांना फोन करण्याची शक्कल लढवली. यावर त्याने तिथून पळ काढला,’’ हा किस्सा सांगताना तिला हसू आवरत नाही. ‘‘पण मला लुख्यांपेक्षा (हा तिचा शब्द) पसेवाल्यांची भीती वाटते,’’ असं ती आवर्जून नमूद करते.

आपले शिक्षण झाले नाही याची सुरेखाला खंत आहे. ‘‘आजच्या काळात शिक्षण महत्त्वाचे आहे. चांगले शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळेल, असे सुरेखाला वाटते. येत्या दोन वर्षांत दहावीची परीक्षा देऊन बारावीचे शिक्षण घ्यायचे आहे,’’ अशी इच्छा ती व्यक्त करते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on struggle life of surekha
Show comments