पश्चिम रेल्वेवर १००च्या आसपास आणि मध्य रेल्वेवर १२१च्या आसपास असलेल्या गाडय़ांच्या मदतीने दर दिवशी तीन हजारांच्या आसपास सेवा चालवल्या जातात. एकाच वेळी चर्चगेट स्थानकात शिरणाऱ्या दोन गाडय़ा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कशा येतात?..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे, ९ वाजून २८ मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल आज प्लॅटफॉर्म क्रमांक चारऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरून रवाना होणार आहे’.. सकाळी सकाळी ही उद्घोषणा झाली की, प्रवाशांच्या संतापाचा पारा चांगलाच चढतो. पुन्हा जिने चढून गर्दीतले धक्के खात खात धावत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची कसरत करावी लागते. नेहमीच्या प्लॅटफॉर्मवर येणारी नेहमीची गाडी अचानक दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आल्याने अनेकदा ती चुकतेही. मग मागची त्याहूनही भरून आलेली गाडी, त्यातील अनोळखी गर्दी, त्यामुळे झालेली चिडचिड यांचे पर्यवसान अखेर रेल्वेच्या नावाने शिव्या मोजण्यात होते. सटोडिये ज्याप्रमाणे शेअर मार्केटमधल्या त्या सतत फिरणाऱ्या पट्टीवर लक्ष ठेवून असतात किंवा व्हॅलेण्टाइन्स डेच्या दिवशी होतकरू आशिक ज्याप्रमाणे कॉलेजच्या गेटवर लक्ष ठेवतात तसेच संध्याकाळी चर्चगेट किंवा मुंबई सीएसटी अशा मोठय़ा स्थानकांवर प्रवासी इंडिकेटरखाली डोळ्यात प्राण आणून आपली गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर उभी राहणार हे बघत उभे असतात. पण नेमकी कोणती गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, हे ठरतं कसं?
खरं तर साधारणपणे कोणती लोकल कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, हे आधीपासूनच ठरलेले असते. पण कधी कधी काही अडचणींमुळे गाडीचा प्लॅटफॉर्म बदलावा लागतो. त्यामागे अनेक कारणं असतात. लोकल गाडय़ा रात्रीच्या वेळी मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या सायिडग लाइन्स, कारशेड इत्यादी ठिकाणी उभ्या असतात. या प्रत्येक गाडीला एक विशिष्ट क्रमांक असतो. ती गाडी सकाळी कारशेड किंवा सायिडगमधून निघाली की, त्याची सूचना टीएमएस कक्षात दिली जाते. तिथे त्या गाडीची नोंद होते. उदाहरणार्थ वांद्रे कारशेडमधून ९३३२५ क्रमांकाची गाडी निघते. ती वांद्रे स्थानकात पहाटे चारच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर जाईल, हे नियोजन असते. ही गाडी ४.०३ विरार म्हणून इंडिकेटरवर लागते. मग ती विरारला पोहोचल्यानंतर कोणती लोकल म्हणून निघणार हे सगळं संगणकीय प्रणालीद्वारे एकदम निश्चित केलेलं असतं. मग त्या गाडीच्या किती फेऱ्या दिवसभरात होणार, ती गाडी चर्चगेटला किती वेळा येणार, विरार किंवा बोरिवली येथे किती वेळा येणार, कोणत्या फेरीनंतर ती कारशेडमध्ये वा सायिडगला जाणार, हे या संगणकीय प्रणालीवर निश्चित केलेलं असतं.
कधी कधी ही वांद्रय़ाहून विरारला निघालेली गाडी परतीच्या फेरीवर असताना काही कारणांमुळे गाडी खोळंबून राहते. अशा वेळी त्या गाडीच्या मागच्या गाडय़ा दुसऱ्या मार्गावरून पुढे काढल्या जातात. मग या गाडीचं संपूर्ण दिवसासाठी तयार केलेलं वेळापत्रक विस्कटतं. या गाडीसमोरील अडचण दूर झाली की, ही गाडी पुन्हा सेवेत येते. मरिन लाइन्सपर्यंत पोहोचते. आता चर्चगेट स्थानकात चार प्लॅटफॉर्म आहेत. त्यापकी दोनवर जलद गाडय़ा आणि दोन वर धिम्या गाडय़ा थांबतात. पण या चार प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या गाडय़ा जाण्यासाठी डाऊन धिमी आणि डाऊन जलद या दोनच मार्गिका असतात. तसंच चर्चगेटपर्यंत येण्यासाठीही अप धिमी व अप जलद या दोनच मार्गिका आहेत.
आता गंमत बघा, जलद मार्गावरून चर्चगेटकडे येणारी गाडी चर्चगेटला प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आणायची असेल, तर ती सरळ येऊ शकते. पण हीच गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आणायची, तर डाऊन जलद मार्गिका ओलांडून ती न्यावी लागते. तीच गत प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून सुटणाऱ्या गाडीची! ही गाडी डाऊन जलद मार्गावर येण्यासाठी या गाडीला अप जलद मार्गिका ओलांडावी लागते. कोणत्याही गाडीला दुसरी मार्गिका ओलांडण्याची गरज पडते, तिथे हा टीएमएस कक्ष सक्रिय होतो. चर्चगेटकडे येणारी गाडी मरिन लाइन्सच्या पुढे आयकर कार्यालयाच्या इमारतीजवळ येऊन थांबते. कंट्रोल रूममधून तिला लाल सिग्नल दिला जातो, कारण चर्चगेट स्थानकातील दोन्ही प्लॅटफॉर्मवर गाडी उभी असते. आता प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील गाडी प्लॅटफॉर्ममधून बाहेर पडली की, कंट्रोल रूममधल्या त्या मोठय़ा पॅनलवर कंट्रोलरला ती दिसते. त्या गाडीने या अप दिशेकडे येणारी गाडी ओलांडली की, अप दिशेकडील गाडीला पुढे जाण्याचा सिग्नल मिळतो आणि ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येऊन विसावते. तोपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून सुटणाऱ्या गाडीची वेळ झालेली असते. आणि तोपर्यंत अप जलद मार्गावरही एक गाडी येऊन थांबते. मग प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील गाडी निघते आणि अप दिशेला येणारी गाडी प्लॅटफॉर्म चारवर जाऊन थांबते. हे सगळं कंट्रोलरच्या नियंत्रणाने चालत असतं आणि दिवसभर अव्याहत चालू असतं.
चर्चगेट स्थानकाची रचना ही मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या तुलनेत खूपच सोपी आहे. सीएसटीला उपनगरीय गाडय़ांचे सात आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे ११ प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे इथे टीएमएस कक्षात युद्धपातळीवर काम चालू असतं. हार्बर मार्गावरील गाडय़ांसाठी दोन प्लॅटफॉर्म, धिम्या गाडीसाठी ३-४-५ क्रमांकांचे प्लॅटफॉर्म आणि जलद गाडीसाठी ५-६-७ क्रमांकांचे प्लॅटफॉर्म ठरवले आहेत. यातील पाच नंबरचा प्लॅटफॉर्म जलद आणि धिम्या अशा दोन्ही गाडय़ांसाठी वापरला जात असल्याने त्याचे नियोजन अधिकच किचकट बनते.
सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल गाडय़ांना सिग्नल देताना लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वाहतुकीचाही बारकाईने विचार करावा लागतो. संध्याकाळी पाचच्या सुमारास सीएसटीहून सुटणाऱ्या अंबरनाथ गाडीचं उदाहरण घ्या. या गाडीच्या मागोमाग डेक्कन क्वीन सुटत असल्याने ही गाडी फक्त दादर आणि ठाणे या स्थानकांवर थांबते. ठाण्यापुढे ही गाडी धिम्या मार्गावर वळवून सर्व स्थानकांत थांबवत नेली जाते. ही सोय केवळ डेक्कन क्वीन पुढे काढण्यासाठी आहे. अनेकदा एखादी जलद गाडी भायखळ्यापर्यंत धिम्या मार्गावरून नेतात. त्या वेळी एखादी मेल-एक्स्प्रेस त्या गाडीच्या बाजूने धडधडत पुढे काढतात आणि ही जलद गाडी भायखळ्यानंतर पुन्हा जलद मार्गावर वळवतात. हे सर्व नियंत्रण कंट्रोलर करत असतो. एका अर्थी रेल्वेचं सुकाणू आपल्या हाती घेऊन दर दिवशीच्या जंजाळातून ही सेवा चालवणारा तो कॅप्टनच म्हणायला हवा!
@rohantillu
Email – tohan.tillu@expressindia.com