मराठवाडय़ासाठी पाणी सोडणार
पिकांना जीवदान देण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग राज्यातील काही भागांमध्ये केल्यावर आता पुणे आणि नाशिक परिसरातील धरण क्षेत्रामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. नाशिकमध्ये पाऊस पडल्यावर मराठवाडय़ासाठी पाणी सोडले जाईल, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. सुमारे आठ हजार गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती यंदा निर्माण होण्याची भीती खडसे यांनी व्यक्त केली.
राज्यात अनेक भागात कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरु असून काही भागात त्यामुळे हलका पाऊस पडला. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग आता मोठय़ा शहरांच्या परिसरातील धरणांचा पाणीसाठा वाढविण्यासाठी करण्यात येणार आहे. पुण्यानजीकच्या परिसरात ढगाळ वातावरण असून कृत्रिम पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे खडसे गुरुवारी पुण्याला जात असून हवामान खात्याने हिरवा कंदील दाखविल्यास तेथे प्रयोग सुरु होतील, असे त्यांनी सांगितले.
पुणे परिसरात सात धरणे आहेत, तेथे पाऊस झाल्यास फायदा होईल. त्याचबरोबर नाशिक पट्टय़ातील धरणांमध्ये पाऊस झाला तर मराठवाडय़ातील धरणांसाठी पाणी सोडता येईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नजर आणेवारीचे काम महसूल विभागाकडून सुरु असून पुढील आठवडय़ात त्याचे तपशील येतील. त्यानंतर केंद्राच्या निकषांनुसार ३३ टक्क्य़ांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान असलेली दुष्काळी गावे जाहीर केले जातील आणि स़्थायी आदेशानुसार मदत दिली जाईल, अशी माहिती खडसे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा