यंदा पर्जन्यमान कमी असेल हा वेधशाळेचा अंदाज गृहीत धरून मुंबई महापालिकेने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी चालवली आहे. या संदर्भात लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. जूनच्या पावसाचा अंदाज घेऊन जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात हा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुण्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटीओरॉलॉजी (आयआयटीएम) या संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. २००९ मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला होता. यंदा १५ कोटी रुपये खर्चून हा प्रयोग पुन्हा केला जाणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे, मात्र अपुरा पाऊस पडल्यास पुढील वर्षी पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन पालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा करून पाहण्याचे ठरवले आहे. आयआयटीएममधील तज्ज्ञांशी गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीनंतर पालिकेत प्रयोगाचे निश्चित झाले. या पावसासाठी पालिकेत लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.  
कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी गेल्या काही वर्षांतील पावसाचे स्वरूप, ढगांची उपलब्धता, प्रयोगानंतर पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उभारणी तसेच पावसाची दर तासागणिक नोंदणी करणे आवश्यक आहे.
याबाबतीत आयआयटीएम पालिकेला तांत्रिक सहकार्य करत आहे, असे आयआयटीएमचे विभागाचे मुख्य डॉ. जे. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
आधीच तयारी का?
कृत्रिम पावसासाठी ढगांची आवश्यकता असते. मुंबईत जून-जुलैमध्ये पावसाचे प्रमाण इतर काळाच्या तुलनेत चांगले असल्याने कृत्रिम पावसासाठी पोषक वातावरण मिळू शकते. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानातून ढगांवर मीठ (वाफेचे पाण्याच्या थेंबात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेला घटक) फवारावे लागते. या कामासाठी निविदा काढून त्याला प्रतिसाद व त्यातून कंपनी निवडण्याच्या कामासाठी किमान महिन्याभराचा अवधी आवश्यक आहे.
कृत्रिम पावसासाठी ही केवळ तांत्रिक पातळीवरील तयारी आहे. जून महिन्यात पावसाचा अंदाज घेतल्यावरच याबाबत अंतिम निर्णय घेता येईल. जूनमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले तर हा प्रयोग केला जाणार नाही, मात्र गरज पडल्यास मदतीला असावी म्हणून तांत्रिक तयारी सुरू आहे
 रमेश बांबळे, जलविभाग अभियंता
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा