कुलदीप घायवट
जपान, ऑस्ट्रेलियासह जगातील बहुतांश देशात सागरी जीवांची उत्पत्ती वाढवण्यासाठी, जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कृत्रिम समुद्री भिंत (आर्टिफिशियल रिफ) तयार करण्यात आली आहे. तशीच कृत्रिम भिंत आता सागरी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पातील निवडक सहा ठिकाणी उभी करण्यात येणार आहे. महापालिका, कांदळवन कक्ष आणि सी एस आय आर – राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (एनआयओ) यांच्याद्वारे डिसेंबरअखेरपासून कृत्रिम समुद्री भिंत उभी करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेने हाती घेतलेला सागरी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्प अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरत आलेला आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या कामांमुळे वरळी आणि हाजीअली समुद्र किनाऱ्यावरील प्रवाळ बाधित होण्याची शक्यता होती. तसेच, समुद्रातील जैवविविधतेचा ऱ्हास होण्याची चिन्हे दिसू लागली. परिणामी, नोव्हेंबर २०२० मध्ये वरळीतील १८ प्रवाळ वसाहती आणि हाजीअली येथील ३२९ प्रवाळ वसाहतींचे राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेने कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात स्थलांतरित केले होते. मात्र, तरीही हाजीअली येथे ‘फॉल्स पिलो’ प्रवाळ आणि अन्य समुद्री जीव आढळून आले. प्रकल्पाचे काम सुरू असूनही येथील जैवविविधता तग धरून आहे. त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यात सागरी जीवांच्या उत्पत्तीस अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी येथे कृत्रिम समुद्र भिंत तयार करण्यात येणार आहे.
सागरी किनारी मार्गावरील वरळी, प्रियदर्शनी पार्क, हाजीअली येथील निवडक सहा ठिकाणी एनआयओने कृत्रिम समुद्री भिंतीचे काम हाती घेतले आहे. यात महापालिका, कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानचा सहभाग आहे. हे काम नोव्हेंबरमध्ये सुरू होणार होते. मात्र, काही अडचणीमुळे आता डिसेंबरअखेरपासून या कामाला गती येणार आहे, अशी माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्य अभियंता मंतय्या स्वामी यांनी दिली.
हा प्रकल्प सुमारे ८८ लाखांचा असून त्यापैकी एनआयओला आतापर्यंत सुमारे ५२ लाखांचा निधी जारी केला आहे.- वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष