द्वीपसमूह म्हणजे बेटांचा समूह. यातली गंमत अशी की, प्रत्येक बेट हे चारही बाजूंनी पाण्यानं वेढलेलंच असतं (नाही तर त्याला बेट कसं म्हणणार?) तरीही त्याच पाण्यानं वेढलेली आजूबाजूची बेटं एकमेकांसारखीच असतात.. पण ही सगळी एकमेकांच्या शेजारपाजारची बेटं एकसारखी असूनही प्रत्येकाचा आकार निराळा, प्रत्येकाची तऱ्हा निराळी.. असा हा समूह. चित्रकार जर एकमेकांचे नातेवाईक किंवा थेट गुरू/शिष्य नसूनही – म्हणजे निरनिराळेच असूनसुद्धा- केवळ कलाविचारांच्या सखोलतेमुळे एकमेकांशी जोडले जात असतील, तर दृश्यकलावंतांची ही मैत्रीसुद्धा अशीच- बेटसमूहासारखी असल्याचं लक्षात येऊ शकेल.
यावर कुणी म्हणेल : कसं काय लक्षात येऊ शकेल? त्यांच्या मैत्र्या कशा आहेत किंवा होत्या याकडे कोण कशाला पाहील? पाहिल्याशिवायच कसे काय निष्कर्ष काढता येणार?
या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे सध्या ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ या गॅलरीच्या एका भागात येत्या २२ एप्रिलपर्यंत भरलेलं ‘दॅट फोटो वुइ नेव्हर गॉट’ हे प्रदर्शन! प्रदर्शनाचं नावच, दृश्यकलावंतांच्या या मैत्र्या ‘अदृश्य’च कशा राहिल्या आणि त्याचं ठसठशीत दर्शन झालं नाही, अशा विचारातून आलेलं आहे. पण त्या अदृश्य-मैत्र्यांचं दर्शन घेण्याचा विडाच शिल्पा गुप्ता यांनी उचलला. त्यासाठी, ‘एशिया आर्ट आर्काइव्ह’ या हाँगकाँगस्थित संस्थेचे दिल्ली प्रतिनिधी सबीह अहमद यांच्याकडे चित्रकारांनी सोपवलेल्या कित्येक फोटो आणि दस्तावेजांच्या भल्याथोरल्या संग्रहातून निवड करणं- त्या निवडलेल्या फोटो/ कागदपत्रांची मांडणी करणं आणि त्यातून या मित्रत्वसंबंधांना – किंवा ‘बेटसमूहा’ला – दृश्यरूप देणं असा मार्ग शिल्पा गुप्ता यांनी स्वीकारला. वरवर पाहाता हे प्रदर्शन कंटाळवाणं वाटेल. पण भारतीय आधुनिक कलेबद्दल कुतूहल असेल, फोटो पाहण्यासोबतच वाचण्याचीही तयारी असेल, तर मात्र हे चित्रकार कसे होते, त्यांची एकमेकांशी जुळणी कशी होती, हे पाहाता येईल.
उदाहरणार्थ, हे दृश्य पाहा :
मुंबईचे (दिवंगत) प्रभाकर बरवे तसंच सुधीर पटवर्धन, नलिनी मलानी यांचे फोटो इथं आहेत. यापैकी बरवे यांचा एक मित्रसमूह होता. त्यात दिलीप रानडे आणि शकुंतला कुलकर्णी हेही होते; शकुंतला शांतिनिकेतनातही शिकत होत्या आणि के जी सुब्रमणियन यांच्या कलेचं इंगित जाणू शकलेल्या त्या वेळच्या फार थोडय़ा मुंबैकर चित्रकारांपैकी त्या होत्या; त्याच वेळी हे सुब्रमणियन बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाविभागाच्या कला-विचारावरही प्रभाव टाकत होते आणि तेव्हा तिथं गुलाममोहम्मद शेख हे रतन परिमू यांच्या साथीनं कलेतिहास विभाग अधिकाधिक समृद्ध बनावा यासाठी प्रयत्न करत होते. नीलिमा शेख या गुलाम यांच्या सहचरी. त्याही चित्रकार. दोघेही ‘ग्रूप १८९०’ या (सन १९६२ मध्ये स्थापन होऊन अल्पकाळच टिकलेल्या) चित्रकार-समूहाचे सदस्य. त्यात बडोद्याशी संबंध आलेले अनेक चित्रकार. हिम्मत शहा, जे. स्वामिनाथन हे जसे या ग्रूपमधले, तसेच नसरीन मोहम्मदी आणि तिचे सहचर जेराम पटेल हेही. नीलिमा शेख, अर्पिता सिंग, माधवी पारेख आणि नलिनी मलानी यांनी १९८० च्या दशकात ‘फोर विमेन आर्टिस्ट्स’ या नावानं प्रदर्शनं भरवली; त्यापैकी नलिनी मलानी या सुधीर पटवर्धन आणि गीव्ह पटेल यांच्याशी नेहमी चर्चा करणाऱ्या. त्या तिघांनी ठरवून अनेक पुस्तकं वाचली. अशा वाचावयाच्या पुस्तकांची यादीही केली. काही पुस्तकांतल्या मजकुरावर खुणा करून, त्या मुद्दय़ांवर ऊहापोह केला.
वाचन आणि चित्रकला यांचं नातं आज इंग्रजीपुरतं दिसतं, पण १९६० ते ८० या काळात ‘वृश्चिक’ सारखं गुजराती नियतकालिक आधुनिक चित्रकलेला, तिच्यामागल्या प्रेरणांना यथार्थपणे समजून घेऊन प्रतिसाद देत होतं. गुलाम शेख, भूपेन खक्कर हे चित्रकार त्यात लिहीत होते.. हे नियतकालिक लहानपणी, परवडत नसताना प्रसंगी रद्दीतून मिळवणारे, वाचणारे चित्रकार म्हणजे अतुल दोडिया!
.. चित्रकारांच्या एकमेकांशी असलेल्या संपर्क-संबंधांची ही गोष्ट वाढतच जाते. हे एवढं सारं, दोन भिंती आणि दोन टेबलं यांमधल्या फोटो आणि कागदपत्रांतून प्रकट होत राहातं.
‘केमोल्ड’चेच तीन भाग पाडण्यात आल्यानं इथं तीन प्रदर्शनं भरली आहेत. अन्य दोन प्रदर्शनांत दिल्लीतलं ‘फोटोइंक’ हे कलादालन चालवणाऱ्या देविका दौलतसिंग यांच्या संग्रहातल्या- अनेक छायाचित्रकारांनी अनेक कलावंतांच्या टिपलेल्या- व्यक्तिचित्रणात्मक फोटोंचा समावेश आहे. तर तिसरं प्रदर्शन ‘छायाचित्राचा पुरावा’ असं आहे. यातलं ‘नानासाहेब पेशव्यांच्या तोतयाचे चित्र’ मराठीजनांना साद घालेल, पण प्रदर्शनाचा मूळ हेतू चित्रं/छायाचित्रं/दस्तऐवज यांतली सीमारेषा किती म्हणजे किती अस्पष्ट असू शकते, हे दाखवून देण्याचा आहे.
सह्याद्रीतून लडाखकडे..
ज्योत्स्ना संभाजी कदम यांनी सह्याद्रीचं अवलोकन अनेकदा केलं. त्या मूळच्या बदलापूरच्या, त्यामुळे बालपणही डोंगरटेकडय़ा पाहात गेलं. पुढल्या काळात चित्रकार संभाजी कदम हे अध्यापक, गुरू, पती अशा विविध नात्यांनी लाभलेल्या ज्योत्स्ना कदम यांनी पॅलेटनाइफनं, जाडसर रंगलेपन करीत सह्याद्री रंगवला. कानांत, अंगात भिनलेला मृदुंगाचा नाद या या पर्वतराजीच्या दगडांतूनही शोधला. तीन-चार रंगांची नादमय आवर्तनंच त्यांच्या त्या सह्याद्री-चित्रांतून दिसत. पण त्यांचं यंदाचं- ताज्या चित्रांचं प्रदर्शन मात्र याहूनही निराळं!
या प्रदर्शनातली अमूर्ताकडे हळुहळू झुकणारी चित्रं ही लडाखचा पर्वतीय वाळवंटी निसर्ग पाहून केली आहेत, एवढंच या चित्रांचं वेगळेपण नव्हे. सुगमतेकडून अमूर्ताकडे, हा प्रवास एकाच मालिकेत टप्प्याटप्प्यानं विकसित होताना दिसतो, हेही या चित्रमालिकेचं एकमेव वैशिष्टय़ नव्हे. लडाखच्या निसर्गाला ज्योत्स्ना कदम यांनी दिलेला प्रतिसाद हा त्या निसर्गाइतकाच शांत, या निसर्गासोबत फुललेल्या संस्कृतीतल्या निरागस आध्यात्मिक वातावरणाप्रमाणेच अनाग्रही आहे.. गांभीर्य कोणत्याही पर्वतातून प्रतीत होतंच, पण लडाखच्या गांभीर्याचा निराळा पोत ओळखून ज्योत्स्ना कदम यांनी चित्र-प्रतिसाद दिला आहे. त्यातही कॅनव्हासवरली चित्रं अधिक थेटपणे निसर्गदर्शन घडवणारी, तर कागदावरली- विशेषत निळसर छटा वापरलेली चित्रं
अधिकाधिक अमूर्त असल्याचं इथं दिसेल. लडाखमधला प्रकाश अनेकदा नाटय़पूर्ण भासतो, ती नाटय़पूर्णताही अनेक दृश्यांत पिवळसर-तांबूस (ऑकर) रंगाच्या छटांमधून नेमकी उमटली आहे.
लायन गेटजवळ, ‘कैखुश्रू दुभाष मार्ग’ असं नाव असलेल्या (मूळचा ‘रॅम्पार्ट रो’) रस्त्यावर, अडोर हाउस इमारतीत पहिल्या मजल्यावर- ‘आर्टिस्ट्स सेंटर’मध्ये हे प्रदर्शन २६ मार्चपर्यंत पाहाता येईल.