महाराष्ट्रातली ‘चित्रकथी’, बिहारच्या मिथिला प्रांतातली ‘मधुबनी’ अशा पारंपरिक शैली, लघुचित्रशैलींपैकी कांगडा शैलीतील डोंगरदऱ्या, राजपूत शैलींमधील शोभिवंत प्राणी (हत्ती/ घोडे/ उंट), मुघल शैलींच्या उत्तरकाळातील चित्रांमधले रानपक्षी/ कोंबडय़ा.. असे विविध घटक जणू काही सहजपणे एकसंध करून प्रतिभा वाघ यांची ताजी चित्रं घडली आहेत. ‘जणू काही सहजपणे’ एवढय़ाच कारणानं म्हणायचं की, हे काम वाटतं तितकं सहज नाही. विविध लघुचित्र आणि लोकचित्र शैलींचा दृश्यसंस्कार प्रतिभा वाघ यांनी स्वीकारलेला आहेच; पण रेखन, रंगलेपन, रंगनिवड या वैशिष्टय़ांतून स्वत:ची काहीएक पद्धत गेल्या काही वर्षांत पक्की केलेली आहे, म्हणून त्यांना हा एकसंधपणा साधता आला. या चित्रांचं प्रदर्शन ‘अवनि’ या नावाने ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या पहिल्या वातानुकूल दालनात ६ नोव्हेंबरच्या सोमवापर्यंत खुलं राहणार आहे.
हे प्रदर्शन आणि ‘जहांगीर’च्या वातानुकूल विभागातच पुढल्या दोन दालनांमध्ये भरलेली प्रदर्शनं, यांमध्ये योगायोग म्हणावा असं एक साम्य आहे : ही तिन्ही प्रदर्शनं भारतीय शैलींचा कोणत्या ना कोणत्या पातळीवरून उपयोग करणारी आहेत. पण अर्थातच, तिन्ही प्रदर्शनांमधली रंगचित्रं ही जलरंग, तैलरंग, अॅक्रिलिक अशा पाश्चात्त्य साधनांनीच सिद्ध झालेली आहेत. रंगलेपनाचं तंत्रही त्यामुळे अर्थातच पाश्चात्त्य म्हणावं असं आहे. हे पाश्चात्त्य तंत्र भारतीय चित्रकारही सुमारे २०० वर्षांपूर्वीपासून आत्मसात करू लागले, म्हणून आपल्याला आता ते ‘परकं’ वाटत नसेल. पण मुद्दाम पारंपरिकच रंग वापरायचे, असं हल्ली कुणी नाही केलं, तरी चित्रांमधला पारंपरिक शैलीचा भाग अबाधित राहतो आणि या चित्रांचा आशय भारतीय असू शकतो, हेही तिन्ही प्रदर्शनांतून दिसतंच! पहिल्या दालनात प्रतिभा वाघ यांच्या ‘अवनि’ या प्रदर्शनातून कृषी संस्कृती, प्राण्यांना कुटुंबाचे घटक मानणारी आणि निसर्गाविषयी कृतज्ञ असणारी- ‘अवनि’ म्हणजे पृथ्वीला आई मानणारी संस्कृती हा आशयाचा भाग आहे. दुसऱ्या दालनात, हैदराबादच्या अर्पिता रेड्डी यांनी ‘समुद्रमंथन’ हा विषय एखाद्या महाकाव्यासारखा मानून त्यावर आधारित चित्रं केली आहेत. तर तिसऱ्या दालनात कोलकात्याचे प्रदीप दास यांनी, आधुनिक शहरं- त्यावरली वसाहतवादी छाप आणि एकविसाव्या शतकातली गर्दी, जागाटंचाई, त्यातून होणारे प्रश्न या साऱ्याच्या चित्रणात मध्येच- अगदी ‘स्टिकर चिकटवल्या’सारखा- मुघल आणि राजपूत शैलीच्या लघुचित्रांमधल्या माणसांच्या वा प्राण्यांच्या प्रतिमांचा वापर केला आहे. त्या लघुचित्रांच्या काळातला ऐषाराम आता परकाच वाटतो. त्या काळापासून आजपर्यंत, जगण्याविषयीची दृष्टीच बदलत गेली हे मान्य करावं लागतं.. ही कबुली प्रेक्षकालाही चित्रं पाहताना आपणहून/ मनापासून द्यावी, असा परिणाम प्रदीप दास यांच्या चित्रांमधल्या विरोधाभासामुळे होतो.
अमूर्त-शोधाचे दोन प्रवाह..
दिवंगत चित्रकार श्यामेन्दु सोनवणे आणि तरुण, उभरता चित्रकार प्रवीण मिसाळ यांची प्रदर्शनं, हे अमूर्त-शोधाचे दोन प्रवाहच म्हणायला हवेत. श्यामेन्दु सोनवणे यांचं निधन २०१३ साली झालं, त्यानंतर कुटुंबीयांनी भरवलेल्या या प्रदर्शनात त्यांची अनेक उपलब्ध कामं पाहायला मिळतात. यातून सोनवणे हे केवल अमूर्ताकडे वाटचाल करीत होते. अगदी १९८०-९०च्या दशकातली त्यांची मुक्त फटकाऱ्यांची चित्रं, त्यातली निबीड रचना हे याची साक्ष देतात. पण पुढल्या काळात ते ठरावीक चौकोनीसर आकारांच्या छोटय़ा फटकाऱ्यांमध्ये रमले. नंतर तर अधिक विविधरंगी, वाळूत पसरलेल्या खडय़ांसारख्या आकारांची चित्रं श्यामेन्दु यांच्या नावाशी जुळली.. त्यातून त्यांनीही समुद्रकिनाऱ्याचा दृश्य अमूर्त भागच स्वीकारला. हा सारा प्रवास ‘जहांगीर’च्या सभागृह दालनात, ६ नोव्हेंबपर्यंत पाहता येईल.
प्रवीण मिसाळ हा ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मधून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर निव्वळ अर्थार्जनासाठी या शिक्षणाचा वापर करण्याऐवजी, त्या शिक्षणालाही स्वत:च्या कामातून प्रश्न विचारू लागला. सुमारे दशकभरानंतर त्याच्या चित्रांचं प्रदर्शन ‘हिरजी जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये (जहांगीरच्याच मधल्या जिन्याने पहिला मजला) ५ नोव्हेंबरच्या रविवार अखेपर्यंत भरलं आहे. यापैकी अनेक चित्रांमध्ये एकरंगीपणा -जो कुणाही चित्रकारासाठी अत्यंत अवघडच मानला जातो- तो वापरण्याचं धाडस प्रवीण मिसाळ यांनी केलं आहे. कोकणातल्या पावसाळी डोंगरांचा पोपटीहिरवा, गडद शेवाळलेल्या डोहाच्या आतला काळसर हिरवा, समुद्रतळातला मोरपंखीच पण गडदफिकट होत जाणारा निळा, उदास संध्याकाळचा तांबूसकरडा असे हे मिश्र छटांचे रंग आहेत. त्यातलं छटावैविध्य मुद्दाम पाहिल्याखेरीज काही जणांना दिसणारही नाही. अन्य चित्रांमध्ये मात्र अंधारातली प्रकाशाची बेटं आहेत, मनात स्वत:बद्दल/ आयुष्याबद्दल आलेल्या विचारांमधून आजवरचं आपलं गणित कसं होतं याचं जणू चिन्हांकित समीकरण असावं तशी काही चित्रं आहेत.. काही चित्रांमध्ये अगदी बसची तिकिटंसुद्धा आहेत. प्रवीण मिसाळ यांचं स्वत:ला चोहीकडून धसाला लावणं, स्वत:ला खोदत राहणं आणि निव्वळ तंत्र किंवा शैली म्हणून कुठल्याही गोष्टीचा स्वीकार न करता (पदव्युत्तर शिक्षणामुळे शैली/ तंत्रं यांची भरपूर माहिती असतानासुद्धा,) ‘नवं’ शोधत राहणं, ही वैशिष्टय़ केवळ चित्रप्रेक्षकालाच नव्हे, तर जगाकडे कुतूहलानं पाहणाऱ्या कुणालाही भिडावीत, अशीच आहेत.