गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडी उत्सवाला बाजारू स्वरूप आल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढू लागला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘आयडियल सांस्कृतिक’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या पुढाकाराने प्रदूषणरहित दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सिने, चित्रपट आणि मालिकांमधील कलावंत सहभागी होत आहेत.
कृष्णाष्टमीच्या दिवशी, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता लालबाग मार्केटमधील गणेश मंदिराजवळ या उत्सवाला सुरुवात होईल. मराठी सिने कलावंत ‘आकाशगंगा’ बसमधून लालबाग, परळ, वरळी परिसरात फिरणार आहेत. या दिवशी अनेक ठिकाणी सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत दहीहंडी सराव शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या शिबीरस्थळी जाऊन हे कलावंत पथनाटय़ाच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. तसेच १८ ऑगस्टला दादरच्या छबिलदास गल्लीमध्ये पथनाटय़ सादर करतील
स्पेनचे पथक आज मुंबईत
आपल्या कलेचे दर्शन मुंबई-ठाणेकरांना घडविण्यासाठी स्पेनचे पथक ठाण्यात दाखल झाले आहे. शनिवारी सायंकाळी हे पथक मुंबईत येत असून विशिष्ठ पद्धतीने मानवी मनोरे रचून कलेचे प्रदर्शन मुंबईकरांना घडविणार आहेत. दहीहंडी उत्सावावरून निर्माण झालेले वादळ शमताच उंच मानवी मनोरे रचण्यात तरबेज असलेले स्पेनचे पथक ठाण्यात दाखल झाले आहे.ठाणेकरांप्रमाणेच मुंबईकरांनाही हा थरार अनुभवता यावा यासाठी हे पथक शनिवारी सायंकाळी ६ वाजता ताडदेव येथे दाखल होणार आहे.