नक्षलवादविरोधी कारवाईच्या ठिकाणी नियुक्ती व्हावी यासाठी फारसे कुणी इच्छुक नसते. परंतु नियुक्ती झाल्यावर नक्षलवादविरोधी कारवायांसोबतच वेगळा मार्ग स्वीकारत त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणारे सोलापूरचे विद्यमान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना यंदाचा राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार जाहीर झाला आहे.
याशिवाय अशाच पद्धतीने आपल्या कामाचा ठसा उमटविणारे सनदी अधिकारी राजेंद्र भारुड, आर. विमला, भारतीय वन सेवेतील अधिकारी गुरु प्रसाद तसेच मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त शरद उघाडे यांनाही हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
गडचिरोली-गोंदिया विभागाचे उपपोलीस महानिरीक्षक हे पद रिक्त असतानाही त्या ठिकाणी कुणी जाऊ इच्छित नव्हते. परंतु अंकुश शिंदे यांनी या पदावर नियुक्ती व्हावी, अशी विनंती केली. नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्य़ांतील अधीक्षकांच्या मदतीने नक्षलवादी चळवळींचा माग काढला. अनेक नक्षलवादी कारवाईत मारले गेले. पण त्याचवेळी सशस्त्र दूरचौक्यांवर फक्त नक्षलवाद्यांचा माग नको तर या परिसराचा विकास कसा होईल याकडेही लक्ष पुरविले. या परिसरातील तरुण-तरुणींना महाराष्ट्र दर्शन घडवणे, त्यांच्यासाठी क्रीडा स्पर्धा, नोकऱ्यांच्या संधी शोधणे आदी उपक्रम या पोलीस दूर चौक्यांतून राबविले गेले. शाळा अर्धवट सोडलेले अनेक तरुण-तरुणी या दूर चौक्यांमध्ये विविध उपक्रमात सहभागी होताना दिसू लागले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांचे कार्यालय तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे उपक्रम गडचिरोलीतील ५८ तर गोंदियातील नऊ दूरचौक्यांवर राबविले गेले. गायरापट्टी, पेंढारी, हेदरी, तडगाव आणि धमरांचा या पाच दूरचौक्यांवर नोंदल्या गेलेल्या या तरुणांची संख्या ६२३ इतकी होती. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळेच शिंदे अरुण बोंगिरवार पुरस्काराचे मानकरी ठरले. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारिख, जेएसडब्ल्यू फौंडेशनच्या संगीता जिंदाल, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि यशदाचे महासंचालक आनंद लिमये यांच्या समितीने ही निवड केली.
उत्कृष्ट प्रशासक
ग्रामीण भागात सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कमी खर्चात पद्धत अमलात आणणारे राजेंद्र भारुड, महिलांचे राहणीमान आणि आहाराबाबत सतर्कता निर्माण करणाऱ्या आर. विमला, इको पर्यटनाद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊन वन्यजीवांचे संरक्षण करण्याची कामगिरी बजावलेले गुरु प्रसाद आणि मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे शरद उघाडे यांचीही अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.