जमनालाल बजाज पुरस्कार सोहळय़ात अरुण जेटली यांचे प्रतिपादन

‘गांधीजींनी ब्रिटिशांना भारताबाहेर घालवले का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. मात्र, गांधीजींनी इंग्रज देश सोडून जातील अशी परिस्थिती निर्माण केली. त्याचप्रमाणे उद्योग आणि इतर क्षेत्रात पारदर्शकता निर्माण होण्यासाठी परिस्थिती निर्माण करावी लागेल. केवळ विकासाने गरिबी हटणार नाही, तर त्यासाठी सामाजिक कार्याचीही गरज आहे’ असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी व्यक्त केले. विकासप्रक्रियेतून संसाधने तयार होतील, पण गरिबांची बाजू मांडण्यासाठी सातत्याने सामाजिक कार्य घडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जमनालाल बजाज फाऊण्डेशनतर्फे ४० वा जमनालाल बजाज पुरस्कार ग्रामीण विकास विज्ञान समितीच्या सचिव शशी त्यागी, छत्तीसगड येथील जनस्वास्थ संस्थेचे योगेश जैन, दिल्ली येथील सलाम बालक ट्रस्टच्या संस्थापिका डॉ. प्रवीण नायर आणि पॅलेस्टाइन येथील अल-अक्सा विद्यापीठाच्या फ्रेंड विभागाचे संचालक डॉ. झियाद मेदूख यांना पुरस्कार देण्यात आला. या वेळी उद्योजक राहुल बजाज, फाऊण्डेशनच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष जस्टीस सी. एस. धर्माधिकारी, विश्वस्त मंडळ, सल्लागार सदस्यांचे मंडळ उपस्थित होते.

‘एक मूलभूत प्रश्न कायम समोर येतो. गरिबी दूर कशी करायची? गरिबी दूर करण्यासाठी मुळात स्रोतांची गरज आहे. त्यासाठी वाढीची किंवा विकासाची गरज असते. मात्र फक्त विकास किंवा वाढ गरीबी दूर करू शकत नाही. तेथे काम करणारी माणसे लागतात. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांचे हे वैशिष्टय़ आहे की त्यांनी अत्यंत कठीण परिस्थिती असणारी क्षेत्र निवडून काम करत आहेत,’ असेही जेटली म्हणाले.

दिल्ली येथे शाळाबाह्य़ मुलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या डॉ. नायर म्हणाल्या, ‘आपल्याकडे रस्त्यावर राहणारी मुले हा शासकीय पातळीवर सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. या मुलांसाठी ठोस काही उपाय किंवा योजना नाहीत. मात्र, त्यांच्याकडे गुणवत्ता असते, अनेक कौशल्ये असतात. त्यांना दिशा मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांचे शिक्षण हे त्यांना रोजगार मिळवून देईल.

वंचित घटकांसाठीच्या योजना परिपूर्ण नाहीत

‘भारतात वंचित असणाऱ्या घटकांसाठी, गरजूंसाठी अनेक योजना शासनाने तयार केल्या आहेत. मात्र तरीही या योजना सर्व समावेशक नाहीत. अशा वेळी उद्योग, देणग्या असेच स्रोत काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना उभे करावे लागतात,’ अशी खंत पुरस्कार विजेत्यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

 

Story img Loader