केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या मुलाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या मुलास मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने अटक केली आहे. माझ्या मित्राला कर्ज वाढवून द्या, असे त्याने बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकास सांगितले होते. जपजिवसिंग चढ्ढा (२८) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे.
  काही दिवसांपूर्वी नरिमन पॉइंट येथील बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकाला एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा मुलगा रोहन जेटली बोलतोय असे सांगितले. माझ्या मित्राची कंपनी आहे. त्याने ५ कोटींचे कर्ज तुमच्या बँकेतून घेतले असून त्याला अधिक कर्ज द्या आणि कर्जाची मुदत वाढवून द्या, असे त्याने बँकेच्या व्यवस्थापकाला सांगितले. माझा मित्र तुम्हाला भेटायला येईल असेही त्याने सांगितले. मात्र व्यवस्थापकाला संशय आला आणि त्याने नरिमन पॉइंट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंद्रुमार गोपाळे आणि त्यांच्या पथकाने बँकेत सापळा लावला. या वेळी जपजिवसिंग स्वत: बँकेत आला आणि मला रोहन जेटली याने पाठवले आहे असे सांगितले. या वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच रोहन जेटलीच्या नावाने फोन केल्याचे निष्पन्न झाले. त्याने ट्र कॉलरवर आपले नाव रोहन जेटली नोंदवले होते, तर व्हॉट्सअ‍ॅपवरही त्याने रोहन जेटली यांचे छायाचित्र लावले होते. व्हॉट्सअ‍ॅपवरही ‘गेट वेल सून डॅडी’ असे स्टेटस ठेवले होते. अरुण जेटली आजारी आहेत. याचा फायदा घेत त्याने आपणच रोहन जेटली आहोत, असे भासविण्यासाठी हे स्टेटस ठेवल्याचे गोपाळे यांनी सांगितले. गोव्यातील काही कॅशिनोचालकांनाही त्याने अशा पद्धतीने फोन करून लाखो रुपयांचे क्रेडिट वाढवून घेतले होते, असे पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक दिनकर भोसले, दिलीप फुलपगारे, नितीन पाटील आदींच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून या ठकसेनास अटक केली. आरोपी हा व्यावसायिकाचा मुलगा असून त्याची दक्षिण मुंबईत अनेक दुकाने आहेत.