प्रायोगिक नाटय़चळवळीतील एक अग्रणी नाव असलेल्या अरुण काकडे यांची ९४ व्या नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रविवारी झालेल्या नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत अरुण काकडे यांच्या नावावर एकमत झाले आणि त्यांचे नाव घोषित करण्यात आले. मात्र फेब्रुवारी २०१४ मध्ये होणारे हे नाटय़ संमेलन कुठे होईल, याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसून २१ ऑक्टोबर रोजी पुन्हा चर्चा करून हे ठिकाण जाहीर करण्यात येईल, असे नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले. अध्यक्षपदासाठी कीर्ती शिलेदार आणि डॉ. तारा भवाळकर यांचीही नावे चर्चेत होती.
नाटय़ संमेलन नागपुरात होण्यासाठी पाठपुरावा करू; सामंत यांची हमी

अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षांची निवड आणि नाटय़ संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची आणि कार्यकारिणीची बैठक रविवारी नाटय़ परिषदेच्या कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत संमेलनाध्यक्षपदासाठी तीन नावांची चर्चा झाली. मात्र कीर्ती शिलेदार आणि डॉ. तारा भवाळकर यांची नावे चर्चेत मागे पडली आणि एकमताने अरुण काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, असे परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.
फेब्रुवारी २०१४ मध्ये होणाऱ्या या नाटय़ संमेलनाच्या आयोजनासाठी सातारा, पंढरपूर आणि नागपूर या शाखांकडून नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे प्रस्ताव आले आहेत. यंदा पहिल्यांदाच नाटय़ परिषदेने आयोजनासाठी उत्सुक शाखांचे अहवाल मागवले असून या तीनही शहरांची पाहणी केली आहे. या शाखांकडे संमेलनाच्या आयोजनासाठी पायाभूत सुविधा आहेत का, याची खातरजमा करण्यात आल्यानंतरच त्यांच्यापैकी एका शाखेला यजमानपद देण्यात येणार असल्याचे नाटय़ परिषदेच्या सूत्रांनी सांगितले. मात्र याबाबत खूप चर्चा होऊनही कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. परिणामी २१ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली असून त्यानंतरच संमेलनाच्या स्थळाबाबतची घोषणा होईल, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा