मराठी विदुषीचा ग्रंथ नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातर्फे प्रकाशित
थोर मराठी-इंग्रजी कवी अरुण कोलटकर यांच्या काव्य प्रतिभेचा समग्र वेध घेणारा ग्रंथ अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातर्फे प्रकाशित झाला आहे. दोन्हीं भाषांत विलक्षण ताकदीच्या कविता लिहिणाऱ्या कोलटकरांचा आणि त्याचप्रमाणे मराठी कवितेचा हा गौरव मानला जात आहे. तब्बल ५० वर्षांनंतर कोलटकरांच्या कवितेचे गारूड अद्याप देशी-परदेशी अभ्यासकांवर आणि रसिक वाचकांवर आहे. हेच ‘बॉम्बे मॉडर्न’ या ग्रंथामुळे सिद्घ होत आहे.
कोलटकर हे साठोत्तरी काळातले मराठी- इंग्रजी अशा दोन्ही भाषांत महती मिळालेले कवी. नव्या वाङ्मयीन जाणिवा जागवणाऱ्या लघु-अनियतकालिक चळवळीचे अग्रेसर कवी म्हणून कोलटकरांची ओळख झाली. ‘अरुण कोलटकरांच्या कविता’ या काव्यसंग्रहाचा पुष्कळ बोलबोला झाला. त्यांच्या ‘जेजुरी’ या इंग्रजी काव्यसंग्रहाला १९७८ मध्ये मानाचा कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे समीक्षकांचे आणि साक्षेपी वाचकांचे त्यांच्या कवितेकडे लक्ष गेले. ‘जिकी वही’ या काव्यसंग्रहामुळे कोलटकरांचे कविपण पुन्हा नजरेत भरले.
कोलटकरांच्या कवितांचा समग्र अभ्यास करण्याचे नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठाच्या प्राध्यापिका आणि संशोधक अंजली नेल्रेकर यांनी १०-१२ वर्षांपूर्वी ठरविले. आणि कोलटकरांचे प्रकाशक व विख्यात साहित्यिक अशोक शहाणे यांचे साहाय्य घेतले.
नेल्रेकर या नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठात ग्रंथांचा इतिहास हा विषय शिकवतात. कानडी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या नेल्रेकर यांना मराठी साहित्याविषयी आस्था आहे. मराठी साहित्याला महानगरीय पर्यावरण देणारी आणि एकीकडे देशी प्रेरणा जोपासत असताना आंतरराष्ट्रीय प्रभाव पचवणारी कोलटकरांच्या कविता हा बॉम्बे मॉडर्न चा प्रतिपाद्य विषय आहे.
कवितेचे भाषातंर जवळपास अशक्य आहे. अरुण कोलटकरचे वैशिष्टय़ म्हणजे मराठी कविता लिहिताना त्याच्या प्रेरणा अस्सल मराठी असायच्या आणि इंग्रजी कवितेचा बाज अस्सल इंग्रजी असायचा. हे फार दुर्मीळ आहे. एकेकदा अरुण गमतीने म्हणायचा, ‘माझ्या पेन्सिलीला दोन्ही बाजूंनी टोक आहे. एक टोक मराठीसाठी आणि दुसरे इंग्रजीसाठी.’ खऱ्या अर्थाने अरुण हा बायिलग्वल कवी होता.
– अशोक शहाणे, प्रयोगशील साहित्यिक आणि प्रास प्रकाशनचे प्रमुख