नऊ दशकांच्या इतिहासात बहुमान लाभलेल्या पाचव्या महिला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिटवून सुख माझे उभी स्तब्ध आता

अपरिमित कृपेचा रे टिळा लाव माथा

अपरिचित उदासी खोल प्राणात जागो

प्रभु, तव करुणेचा दीप शब्दांत लागो..

शब्दांमधली अर्थतरलता आपल्या काव्यातून व्यक्त करीत गेली काही दशके मराठी मानस अधिक भावसमृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी या कालावधीत हे संमेलन होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या यवतमाळ येथे रविवारी झालेल्या बैठकीत डॉ. ढेरे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. साहित्य संमेलनाच्या नऊ दशकांच्या इतिहासामध्ये अध्यक्षपदाचा बहुमान लाभलेल्या त्या पाचव्या महिला साहित्यिक ठरल्या आहेत.

संशोधन आणि ललित साहित्यातही डॉ. अरुणा ढेरे यांची कामगिरी मोठी असली, तरी त्यांच्या कवितांचा ठसा अमीट आहे. वडील आणि ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याकडून त्यांना वैचारिक वारसा लाभला होता. पण, समाजसंस्कृतीच्या संशोधनात मानवी मनाचा शोध घेण्यात त्यांना अधिक रस वाटला. या अंतर्मनातील अनेक सूक्ष्म भावतरंग त्यांच्या काव्यात अगदी सहजतेने उमटत गेले.

संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ज्येष्ठ साहित्यिकाची सन्मानाने निवड करावी, अशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नुकतीच घटना दुरुस्ती केली आहे. त्याची अंमलबजावणी लगेचच करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यानुसार ही निवड करण्यात आली.

या संमेलनाध्यक्षपदासाठी निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे नाव आघाडीवर होते. पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महानोर हे उद्घाटक होते. संमेलनाचे उद्घाटक झाल्यानंतर आता अध्यक्षपद भूषविणे योग्य वाटत नाही, अशी भूमिका मांडत महानोर यांनी संमेलन अध्यक्षपदाच्या स्पध्रेतून माघार घेतली होती. त्यामुळे ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर, डॉ. अरुणा ढेरे आणि प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी या तिघांची नावे निश्चित करून महामंडळाच्या बठकीत प्राधान्यक्रम देण्याचे ठरविण्यात आले. त्यामध्ये बहुतांश सदस्यांची पसंती ध्यानात घेऊन डॉ. ढेरे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आणि निवड झाली..

साहित्य महामंडळाच्या बठकीमध्ये संमेलनाच्या तारखा आणि संमेलनातील कार्यक्रमांची ढोबळमानाने रूपरेषा निश्चित करण्यात आली. त्यानंतर संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा आला. अरुणा ढेरे, प्रभा गणोरकर आणि प्रेमानंद गज्वी ही तीन नावे ठरवून सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. दुपारी पावणेदोनच्या सुमारास महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी अरुणा ढेरे यांच्याशी संपर्क साधून ‘तुमच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे’, असे कळविले. ‘मला संकोच वाटतोय’, असे ढेरे यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर १५ मिनिटांनी पुन्हा संपर्क साधण्यात आला तेव्हा ढेरे यांनी अध्यक्षपदासाठी संमती दिली, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

सर्जनशील कवयित्री, संशोधक-लेखिका

सर्जनशील कवयित्री आणि संशोधनात्मक लेखन करणाऱ्या लेखिका, असा डॉ. अरुणा ढेरे यांचा लौकिक आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक-साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा वारसा त्यांना लाभला. घरातच त्यांना वस्तुनिष्ठ संशोधनाचे बाळकडू मिळाले. मूळ पिंड कवितेचा असला तरी संशोधनाची वाट त्यांनी आपल्या लेखनातून प्रशस्त केली.

अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ रोजी झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी एम.ए. आणि पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेतले. १९८३ ते १९८८ या कालावधीत त्यांनी पुणे विद्यापीठात अध्यापन केले.

कवयित्री ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या सहवासातून अरुणा ढेरे यांची वैचारिक आणि साहित्यिक बैठक समृद्ध झाली. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. याशिवाय स्फुट लेखसंग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा ‘विस्मृतिचित्रे’ हा ग्रंथ गाजला. स्वातंत्र्यपूर्व काळात विशेष कार्य केलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केले आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृती आणि साहित्यविषयक समित्यांवर ढेरे यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. लोकसाहित्य समिती, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था या संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठीच्या ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत आहेत.

                                       अरुणा ढेरे यांची साहित्यसंपदा

वैचारिक

  • अंधारातील दिवे
  • उंच वाढलेल्या गवताखाली
  • उमदा लेखक, उमदा माणूस
  • उर्वशी
  • कवितेच्या वाटेवर
  • काळोख आणि पाणी
  • जाणिवा जाग्या होताना
  • जावे जन्माकडे
  • त्यांची झेप त्यांचे अवकाश
  • पावसानंतरचं ऊन
  • प्रकाशाचे गाणे
  • प्रतिष्ठेचा प्रश्न
  • प्रेमातून प्रेमाकडे
  • महाद्वार
  • लोक आणि अभिजात
  • लोकसंस्कृतीची रंगरूपे
  • विवेक आणि विद्रोह
  • डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार
  • विस्मृतिचित्रे
  • शाश्वताची शिदोरी
  • शोध मराठीपणाचा (सुभाष केळकर यांच्याबरोबर सहलेखन-मुख्य लेखक- दिनकर गांगल)
  • स्त्री आणि संस्कृती

कथासंग्रह

  • अज्ञात झऱ्यावर
  • काळोख आणि पाणी
  • कृष्णकिनारा
  • नागमंडल
  • प्रेमातून प्रेमाकडे
  • मन केले ग्वाही
  • मनातलं आभाळ
  • मैत्रेयी
  • रूपोत्सव
  • लावण्ययात्रा
  • वेगळी माती, वेगळा वास

कवितासंग्रह

  • निरंजन
  • प्रारंभ
  • मंत्राक्षर
  • यक्षरात्र
  • बंद अधरों से

संपादन

  • दुर्गा भागवत: व्यक्ती, विचार आणि कार्य
  • स्त्री-लिखित मराठी कविता
  • स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०)
  • स्त्री-लिखित मराठी कथा
  • इंदिरा (इंदिरा संतांच्या कवितांचा संग्रह) या पुस्तकाची प्रस्तावना

पुरस्कार-सन्मान

  • नागपूर येथील डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यास आणि अमेरिकेतील डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान
  • सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
  • लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार
  • पुण्यातील साहित्यदीप प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार
  • ‘स्त्री-लिखित मराठी कविता’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग्रंथ पुरस्कार
  • मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार

                                      

डॉ. अरुणा ढेरे यांच्या कविता

माझ्या मित्रा ऐक ना,

मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,

अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ

बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा

तीव्रमधुर तिथला वाऱ्याचा वावर

आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही

कितीदा पाहिलेय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही!

 

आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही

पण थांब, घाई करू नकोस,

अर्धे फुललेले बोलणे असे अध्र्यावर खुडू नाही.

 

हे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;

स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी,

तर प्रेमिक असशील,

समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात

धपापतेय माझे काळीज,

तर मग तू कोण असशील?

 

स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,

हाती देशील तर पती असशील,

आणि चालशील जर माझ्यासोबत

त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे

समजून हेही, की ते हाती येईल, न येईल,

पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे

आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल,

तर मग तू कोण असशील ?

मित्र असशील माझ्या मित्रा!

 

काय होते?

इतक्या असंख्य सद्भावना जन्म घेतात मनामध्ये,

अनोळखी माणसांसाठीसुद्धा किती भरून येते

पंख फुटल्या अंगाने शुभेच्छा येतात वस्तीला,

या साऱ्यांचे नंतर काय होते?

एका तरी फुलाचे मरण

लांबते का एखादा क्षण?

एकटे पोळणारे दु:ख अनिकेत

येते का सांत्वनाच्या सावलीत?

करुणेनं भिजतो का थोडा

निर्दयतेचा काठ?

थांबते का एखादी विनाशाची लाट?

सगळे भवतालच मोडून, चिरडून चाललेले

पाचोळ्यासारखे झालेले कुठलेही नाते

मनातल्या सद्भावनांचे आणि शुभेच्छांचे

खरेच मग काय होते?

 

जाणारा जात नाही रिकामा

जाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही

हे खरे आहे

खरे नाही त्याचे सारे मागे ठेवणे

आणि एकटय़ाने अगदी रिकामे निघून जाणे

जाताना आपल्या अदृश्य हातांनी

उचलतो तो कधी आपल्या जिवलगांची नीज

उचलतो कुणाची स्वस्थता

सहज ओढून नेतो जीवनाचे दिलासे

आणि संघर्षांचे धैर्य

पायांखालच्या जमिनीचा

विश्वासच कधी हिरावतो कायमकरता

उगवता उगवता राहून जाते

त्याच्या श्वासाच्या वाऱ्यावाचून बरेच काही

त्याच्या स्नेहाच्या ओलीविना

काही ठायीच सुकून जाते

कधी तो नेतो चोरून संबंधांची अर्थपूर्णता

आणि थंड वास्तवामधली सृजनाची धुगधुगी

कधी कधी तर तो बरोबर नेतो

मुक्या बीजांमधले संभव

आणि जन्मांचे शकुनही घेऊन जातो

जाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही हे खरे नाही

साहित्यात महिला कुठेही कमी नाहीत. त्या पदाला शोभेल असे मोठे कार्य करतच आहेत. त्यांची प्रतिनिधी म्हणून हे पद स्वीकारताना खूप आनंद होत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये साहित्य आणि साहित्यिक दर्जा एवढेच निकष असले पाहिजेत.     – डॉ. अरुणा ढेरे, नियोजित अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन

बहुमान असा..ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष यांनी २००१ मध्ये इंदूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर १७ वर्षांनी अरुणा ढेरे यांच्या रूपाने संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान महिला साहित्यिकेला लाभला आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये ज्येष्ठ कवयित्री कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर – १९६१), विदुषी दुर्गा भागवत (कराड – १९७५), ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके (आळंदी, पुणे – १९९६) आणि ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष (इंदूर – २००१) यांना बहुमान लाभला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aruna dhere akhil bharatiya marathi sahitya sammelan
Show comments