डॉ. अरुणा ढेरे यांचा प्रश्न
‘‘सहिष्णुता आणि उदारता ही भारतीय संस्कृतीची मूळ मूल्ये आपण पुढे नेणार आहोत की नाही?’’ असा प्रश्न ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी विचारला.
मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (नायगाव शाखा)आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते डॉ. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या.
मी वडिलांनी तयार केलेल्या पुस्तकांच्या घरात वाढले. आईने म्हटलेली गाणी ऐकली. घरातल्या अशा वातावरणाने मला साहित्याच्या प्रेमात पाडले. संत-पंत साहित्याने आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी दिली. एवढेच नव्हे तर नामदेव ढसाळ, ग्रेस यांसारख्या कवींच्या कवितांमुळे वाचन समृद्ध झाले, असे डॉ. ढेरे म्हणाल्या.
संशोधनात वाचनापलीकडच्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, असे नमूद करून डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘साधनांच्या पलीकडे आपल्याला जायला हवे, कारण संस्कृतीची नवी रचना त्यातून करता येते. त्यातूनच नवीन सांस्कृतिक भूगोल ज्ञात होतो. म्हणून संस्कृतीचा अंतर्वेध घेतला पाहिजे.’’ प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी माणूस असावा अशी शिकवण चांगुलपणा असलेल्या माणसांनी आपल्याला दिली आहे. म्हणून विपरीत गोष्टी घडत असल्या तरी समाज पुढे चाललाय तो विश्वासू माणसांमुळेच, असे मतही त्यांनी व्यक्त केले. साहित्यात योगदान देणाऱ्या संस्थांनी माझा लेकीसारखा केलेला सत्कार म्हणजे माझे कोडकौतुकच आहे, अशा भावनाही डॉ. ढेरे यांनी व्यक्त केल्या. प्रास्ताविक साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे यांनी केले. अशोक बेंडखळे यांनी स्वागत केले. कोमसापच्या केंद्रीय उपाध्यक्षा नमिता कीर यांनी डॉ. ढेरे यांचा परिचय करून दिला.
‘माझ्या लेकीचा सत्कार!’
मधु मंगेश कर्णिक यांनी डॉ. ढेरे यांचा सत्कार करताना, ‘‘सर्वाना बरोबर घेऊन जाणारे ते साहित्य असे म्हणणाऱ्या, प्रगल्भ प्रतिभा असलेल्या माझ्या लेकीचा सत्कार मी करतोय,’’ असे गौरवोद्गार काढले. डॉ. बाळ फोंडके, डॉ. महेश केळुस्कर आणि डॉ. सूर्यकांत आजगावकर यांनी डॉ. ढेरे यांच्या कविता, ललित आणि चरित्रात्मक वाङ्मय असा विविधांगी साहित्य प्रवास उलगडून दाखवला.