केईएम रुग्णालयात गेली ४२ वर्षे कोमात असलेल्या परिचारिका अरुणा शानभाग यांची प्रकृती शुक्रवारी अधिकच खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. गेले तीन दिवस त्या न्यूमोनियामुळे आजारी होत्या. शुक्रवारी त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने ताबडतोब अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. अरुणा यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृ ती अजूनही गंभीर असली तरी स्थिर असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक चार हेच जणू एकेकाळी याच रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या अरुणा शानभाग यांचे घर बनले आहे. गेली ४२ वर्षे कोमात असलेल्या अरुणा यांची काळजी केईएमचा कर्मचारी परिवार घेतो आहे. त्यांना न्यूमोनियाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांची काळजी घेणाऱ्या परिचारिका वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्यावर करण्यात आलेल्या चाचण्यांमधून त्यांना न्यूमोनिया असल्याचे तसेच फुप्फुसांना संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले. शुक्रवारी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. सध्या त्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृ ती नाजूक असली तरी आता स्थिर आहे, असे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वीही अरुणा शानभाग यांची प्रकृती खालावली होती. त्या वेळीही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. शानभाग यांना इच्छामरण द्यावे, अशी याचिकाही त्यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका पिंक विराणी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. १९७३ मध्ये केईएम रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असताना अरुणा शानभाग यांच्यावर रुग्णालयातील सफाई कर्मचारी सोहनलाल वाल्मीकी याने बलात्कार केला होता. बलात्कारानंतर त्याने त्यांच्या गळ्याभोवती चैन आवळून धरून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून कोमात असलेल्या शानभाग यांची सुश्रूषा केईएमचा परिवार अगदी आपलेपणाने करतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा