‘नयन तुझे जादूगार’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मानापमान’ अशा विविध संगीत नाटकांतून व्यावसायिक रंगभूमीवर आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांना या वर्षीचा ‘संगीताचार्य बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
संगीत नाटय़क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला दरवर्षी राज्य शासनातर्फे संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. रोख पाच लाख रूपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा या पुरस्कारासाठी अरविंद पिळगांवकर यांची निवड करण्यात आली. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुरस्कार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाटय़शास्त्राचे धडे घेतले. १९६४ साली आलेल्या ‘यशवंतराव होळकर’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘नयन तुझे जादूगार’, ‘घनश्यान नयनी आला’, ‘बावनखणी’, ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकांबरोबरच ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत विद्याहरण’, ‘रामराज्य वियोग’, ‘संगीत शारदा’ अशा संगीत नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. नाटकातील अभिनयाबरोबरच संगीत प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याआधी फैय्याज, ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद सावकार आणि जयमाला शिलेदार यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा