पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात डिजीटल पद्धतीने विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देताना त्यावर नाव सुद्धा न टाकल्याने अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – ‘…त्याच हेतूने पंतप्रधानांना मुंबईला बोलवलंय’, शिवसेनेची भाजपावर आगपाखड, एकनाथ शिंदेंनाही केलं लक्ष्य!
काय म्हणाले अरविंद सावंत?
हा कार्यक्रम राज्यशासन आणि मुंबई महापालिकेचा आहे. भाजपाचा नाही. दुर्दैवाने पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अनेकदा वावरताना दिसत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम भाजपाचा आहे, असं त्यांना वाटतं. काही वेळापूर्वीच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मला निमंत्रण द्यायला आले होते. यापत्रिकेवर मी सोडून मुंबईच्या पाच खासदारांच नाव आहे. यामध्ये दोन मिंधे गटाचे आणि तीन भाजपाचे आहेत. तसेच या पत्रिकेच्या पाकिटावरही माझं नाव नाही. काही दिवसांपूर्वीही मला एक निमंत्रण पत्रिका आली होती, त्यावर केवळ अरविंद सावंत असे लिहिले होते. माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे साधं खासदारही लिहीलं नव्हत. त्यामुळे हा कार्यक्रम कोणाचा आहे आणि कशासाठी आहे? हे अतिशय स्पष्टपणे जनतेपुढे आलं आहे. हा कार्यक्रम फक्त मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रसिद्धी करण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरूनही टीकास्त्र सोडले. ”आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारे प्रकल्प तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेले आहेत. आज फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येत आहे. ‘खोटं बोला पण रेटून बोला’ यामध्ये माहीर असेलल्या भाजपाचा हा उपक्रम आहे, असेही ते म्हणाले.